चिकू : (१) फुलाफळांसह फांदी, (२) उलगडलेले फूल, (३) उभे कापलेले फळ, (४) बी.

चिकू  : (हिं. चीकू, सापोटा क. चिकू हणु इं. सॅपोडिला प्लम लॅ. ॲक्रस सॅपोटा कुल-सॅपोटेसी). सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. याची शारीरिक लक्षणे ⇨ सॅपोटेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. पुष्पमुकुटावर उपांगे नसतात तीन संदलांचे एक अशी दोन मंडले व सहा प्रदलांचे एकच मंडल असते. केसरदलांच्या एकाच मंडलातील बारापैकी सहा वंध्य असून ती इतरांशी एकांतरित (एकाआड एक) असतात [→ फूल]. मृदू फळे मगजयुक्त (गरयुक्त), ५–७ सेंमी. व्यासाची, गोलसर, अंडाकृती, साधारणः फिकट तपकिरी रंगाची बिया ४-५ काळ्या, चकचकीत, किंचित चापट असतात. फळ गोड, खाद्य व पौष्टिक आहे. कच्चे फळ कडक असून खरवडल्यास त्यातून टॅनीनयुक्त चीक येतो. या झाडाच्या सालीतूनही चीक येतो. दक्षिण मेक्सिकोत व मध्य अमेरिकेत झाडाच्या खोडावर तिरप्या त्याचा खाचा पाडून चीक गोळा करतात. हा चीक गाळून, गरम करून व कुसकरून त्याला इष्ट आकार देतात. याला व्यापारात चिकल गम असे नाव आहे. एका झाडापासून दरसाल दोन-तीन किग्रॅ. चीक मिळतो. च्युइंग गम बनविण्यासाठी चिकल गम हा पूरक घटक म्हणून वापरतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दरवर्षी मेक्सिकोतून सु. २,००० टन चिकल गमची आयात होते.

चिकूच्या १२-१३ जाती भारताच्या निरनिराळ्या भागांत लागवडीखाली असल्या, तरी त्यांचा आपापसातील फरक अजून स्पष्ट झालेला नाही. निरनिराळ्या जातींच्या झाडांवर मुख्यतः गोल आणि अंडाकृती फळे येतात. दोन्ही प्रकारची फळे एकाच झाडावर एकाच वेळी किंवा वर्षांतील निरनिराळ्या ऋतूंमध्ये आढळतात. पश्चिम किनाऱ्यावर आढळून येणाऱ्या निरनिराळ्या जातींपैकी ‘काळी पत्ती’ जातीची फळे उत्कृष्ट असतात. त्यांचा आकार लंबगोल आणि मगज खोड व स्वादिष्ट असतो. याच भागातील ‘छत्री’ या दुसऱ्या जातीची फळे लंबगोल असून काळी पत्तीच्या खालोखाल चांगली असतात. ‘क्रिकेट बॉल’ किंवा ‘कलकत्ता मोठी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातीची फळे क्रिकेटच्या चेंडूसारखी मोठी, मध्यम प्रतीची, दाणेदार मगजाची व मध्यम गोड असतात. या जातीची झाडे ३०० मी.पेक्षा कमी उंचीवरील कोरड्या हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढतात. दक्षिण भारतात वाढणाऱ्या जातीत ‘द्वारापुडी’ या जातीची फळे क्रिकेटच्या चेंडूसारखीच पण आकाराने लहान असतात. ‘किर्तवर्ती’ या आंध्र प्रदेशातील लोकप्रिय जातीच्या फळाचा आकार लंबगोल, साल खरखरीत व चव गोड असते. आंध्र प्रदेशातील व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या ‘पाला’ या जातीची फळे गोल लंबगोल, लहान, पातळ सालीची आणि स्वादिष्ट असतात. भारतात चिकू सर्वत्र लोकप्रिय आहे.

पाटील, शा. दा.

हवामान  :  चिकूची लागवड उष्णकटिबंधीय हवामानात समुद्रकिनारपट्टीतील जमिनीत, १५०–३०० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशांत करतात. दक्षिण भारतातील उष्ण आणि दमट हवामानातही समुद्रसपाटीपासून १,००० मी. उंचीवरील प्रदेशातसुद्धा चिकू चांगला वाढतो. झाडाला अतिशीत हवामानापासून अपाय होतो आणि ४३·३° से.पेक्षा जास्त उष्ण हवामानात फुले व फळे करपतात.

जमीन  :  चिकूला निरनिराळ्या प्रकारची जमीन चालते. त्याचा मुळवा खोल नसतो. समुद्रकिनारपट्टीतील रेताड, सच्छिद्र, तांबडी पठारावरील गाळवट दख्खनमधील खाली मुरूम असणारी पाण्याचा निचरा होणारी मध्यम काळी जमीन चिकूला चांगली असते.

 

लागवड  : गुटीची अथवा भेट कलमे लावून लागवड करतात [⟶ कलमे]. भेट कलमे खिरणीच्या खुंटावर करतात. लागण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ६०× ६०× ६० सेंमी. मापाच्या खड्‌ड्यांत करतात. खड्डे भरपूर पावसाच्या प्रदेशात १०–१२ मी. आणि कोरड्या क्षेत्रात ७-८ मी. हमचौरस अंतरावर काढतात. कलमे पावसाळ्याच्या आधी किंवा नंतर ऑक्टोबर ते जानेवारी या मुदतीत लावतात. कलमाजवळ काठी रोवून त्याला आधार देतात.

  

आंतर मशागत : पावसाळ्यानंतर कलमांच्या रांगांमधील मोकळी जमीन नांगरतात. झाडांच्या आळ्यांतली जमीन खणतात.

छाटणी  :  चिकूच्या झाडाला निसर्गतः योग्य जागी फांद्या फुटून त्याला समतोल आकार मिळतो. त्यामुळे सुरूवातीला छाटणी करण्याची आवश्यता नसते. मात्र कलमाच्या जोडाखाली खुंटावर फुटणाऱ्या फांद्या नियमितपणे काढाव्या लागतात. पुढे झाडावर वाळलेल्या फांद्या दिसल्या, तर त्याही छाटून काढतात.

खत : पावसाळ्यात झाडांच्या रांगांमधल्या मोकळ्या जमिनीत तागाचा किंवा धैंचाचा बेवड करतात. चिकूच्या एक वर्षाच्या झाडाला अंदाजे २५ किग्रॅ. शेणखत व अर्धा किग्रॅ. पेंड देतात. हे प्रमाण दरवर्षी ५ किग्रॅ. शेणखत व अर्धा किग्रॅ. पेंड या प्रमाणात वाढवीत जाऊन दहाव्या वर्षानंतर प्रत्येक झाडाला वर्षाला ७५ किग्रॅ. शेणखत, ८ किग्रॅ. पेंड आणि अडीच किग्रॅ. हाडांची भुकटी देतात. चिकूला वर्षातून दोन वेळा फुले-फळे येतात म्हणून त्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे मध्ये व पावसाळ्यानंतर डिसेंबरमध्ये असे वर्षातून दोन वेळा खत देतात. शेणखत जमिनीवर पसरतात आणि पेंड व हाडांची भुकटी आळ्याच्या कडेने गोल चर काढून त्याच्यात दडपतात. लगेच पाणी देतात. पुढे जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात दर १२–१५ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ८–१० दिवसांनी पाणी देतात.

फळे  :  कलमाला साधारणपणे चौथ्या वर्षी फळे येऊ लागतात. व्यापारी दृष्ट्या चिकूचे आयुष्य ४० वर्षे धरतात, पण जुनी ७५ वर्षांची भरपूर फळे देणारीही झाडे आढळतात. चिकू सदापर्णी असून त्यावर वर्षभर थोड्या थोड्या दिवसांनी नवीन पालवी आणि मोहोर फुटतो. फळ पक्व व्हावयाला ४-५ महिने लागतात. जरी वर्षभर थोडी फार फळे येत असली, तरी भरपूर फळे डिसेंबर ते फेब्रुवारी आणि मे ते जून या काळातच येतात. दक्षिण भारतात जानेवारी ते जून आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात भरपूर फळे येतात. फळे झाडावरच पूर्ण पिकू देत नाहीत कारण पक्षी अशा फळांची नासाडी करतात किंवा ती झाडावरून पडून नुकसान होते. तयार झालेल्या फळावर फिकट पिवळा नारिंगी किंवा तपकिरी रंग येतो आणि सालीवरून तपकिरी भुकटीसारखा थर निघू लागतो. नखाने खरवडल्यास सालीचा रंग पिवळसट दिसतो व सालीतून चीक निघत नाही. पूर्ण वाढ झालेली फळे देठासकट एकएक हाताने तोडून लगेच उबदार जागेत ठेवतात. ती नरम व खाण्यास योग्य होण्यासाठी पाच-सहा दिवस लागतात.


उत्पन्न  :  चौथ्या वर्षी चिकूच्या दर झाडापासून सरासरीने २०० पर्यंत फळे मिळतात. ही फळसंख्या दरवर्षी वाढत जाऊन सात-आठ वर्षांनी ७००–८०० व २० वर्षांनी १,५००–२,००० पर्यंत जाते. काही जातींच्या दर झाडापासून २,५००–३,००० पर्यंत फळांचे कमाल उत्पन्न मिळू शकते.

विक्री  :  जरी निश्चित प्रमाण ठरलेले नसले, तरीसुद्धा चिकूच्या फळांची त्यांच्या आकारमानाप्रमाणे मोठी फळे ५ सेंमी. किंवा त्यापेक्षा जास्त व्यासाची, मध्यम ३-५ सेंमी. व्यासाची आणि लहान ३ सेंमी. पेक्षा कमी व्यास असलेली अशी प्रतवारी करण्यात येते. गोल व लांबट फळांची वर्गवारी निरनिराळी करतात. विक्रीसाठी पाठविण्याची फळे तोडून घेतल्यावर लगेच बांबूच्या करंडीत भाताचा पेंढा किंवा गवत यांच्या थरांत बसवून करंडी बंद करतात व पिकलेली पण चांगली जून झालेली कठीण फळे १०°  ते १३° से. तापमानात साठविल्यास ५-६ आठवडे चांगल्या प्रकारे टिकू शकतात.

गुप्ता, पु. कि.

 

रोग  :  चिकूवर सहसा गंभीर रोग आढळत नाहीत. काही वेळा फळकूज, फांद्यांवरील गाठी व काजळी हे रोग आढळतात. फळकूज या फयाटॉप्थोरा पामीव्होरा  या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होणाऱ्या रोगाने फळे लिबलिबीत होऊन सुरकुतात. रोगप्रतिकारासाठी झाडाच्या जमिनीलगतच्या रोगट फळांच्या फांद्या छाटतात. पावसाळ्यापूर्वी डायथेन झेड-७८ यासारखी कवकनाशके झाडावर फवारतात. फांद्यावरील गाठी हा रोग आनुवंशिक आहे असे मानतात. निरोगी झाडांपासून कलमे करणे हा त्यावर उपाय आहे. काजळी रोग म्हणजे पानांच्या वरील बाजूंवर कॅप्नोडियम  जातीच्या कवकाची काळी वाढ आढळते. पानांवर पिठ्या कीटकाचा उपद्रव असल्यास त्यांच्या शरीरांतून झिरपणाऱ्या चिकट पदार्थावर हे कवक वाढते म्हणून कीटकनाशके फवारून कीटकाचा नाश करतात.

कीटक उपद्रव : या झाडाला खोडकिडा, पिठ्या व खवले कीटक यांचा उपद्रव होतो. खोडकिड्यांचा उपद्रव अगदी तुरळक असतो. हा कीटक झाडाचे खोड पोखरून नुकसान करतो. यावर उपाय म्हणून याने पाडलेले भोक शोधून त्याच्यात घासलेटमध्ये भिजविलेला बोळा बसवून भोकाचे तोंड मातीने बंद करतात. पिठ्या कीटक कोवळ्या फांद्यांवर, पानांच्या खाली आणि फळांच्या देठांवर आढळतात. ते झाडांतील रस शोषून नुकसान करतात व काजळी रोगवाढीला मदत करतात. यावर उपाय म्हणून झाडावर निकोटीन सल्फेट आणि पाण्यात विरघळणाऱ्या डीडीटीच्या भुकटीच्या विद्रावाचा फवारा मारतात. ३६४ लि. पायात ४० टक्के (अर्धा किग्रॅ.) निकोटीन सल्फेट, २ किग्रॅ. साबण व २ किग्रॅ. पाण्यात विरघळणारी डीडीटी भुकटी असे प्रमाण ठेवतात.

कुलकर्णी, य. स. रूईकर, स. के.

संदर्भ  :  1. Cheema, G. S. Bhatt, S. S. Naik, K. C. Commercial Fruits of India, Calcutta, 1954.      

             2. Sham Singh Krishnamurthy, S. Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.