चिंचिल्ला : कृंतक गणाच्या चिंचिल्लिडी कुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव चिंचिल्ला लॅनिजर आहे. चिली आणि बोलिव्हियातील अँडीज पर्वताच्या ३,०००–६,००० मी. उंचीवरील खडकाळ आणि ओसाड प्रदेशात हा राहतो.
याच्या शरीराची लांबी २३–३८ सेंमी. शेपटी झुपकेदार, ८–१५ सेंमी. लांब पुढचे पाय आखूड, मागचे लांब गालफडात पिशव्यांचे अवशेष असतात. अंगावरचे केस रेशमासारखे मऊ व अतिशय दाट असतात पाठीकडचा रंग निळसर किंवा तपकिरी करडा, त्यावर पुसट काळसर खुणा, खालचा भाग पिवळसर पांढरा असतो. मिशा लांब असतात.
हे बिळात राहणारे असून त्यांचे विस्कळित जमाव असतात. हे शाकाहारी असून राहत असलेल्या प्रदेशांत मिळणारे धान्य, फळे, बिया आणि वनस्पती खातात. ते ढुंगणावर ताठ बसून भक्ष्य हातात धरतात.
यांचा जोडा जन्मभर टिकतो. मादीची वीण वर्षातून दोनदा होते आणि सु. ११२ दिवसांच्या गर्भावधीनंतर तिला दर खेपेस सामान्यतः दोन पिल्ले होतात. ५–८ महिन्यांत पिल्ले जननक्षम होतात. आयुर्मान बहुतकरून १० वर्षांचे असते.
चिंचिल्ल्याच्या मऊ केस असलेल्या कातड्याला एके काळी फार मागणी असे व चांगली किंमतही येत असे. चिलीमधून एका वर्षांत दोन लक्षांवर कातड्यांची निर्यात होत असे. माणसाने चामड्याकरिता यांची फार हत्या केल्यामुळे ते जवळजवळ नामशेष झाले होते, पण चिली सरकारने त्यांना संरक्षण दिल्यामुळे त्यांची संख्या हल्ली वाढत आहे.
चिंचिल्ला-पालनाचा धंदा हल्ली जगात इतरत्र बऱ्याच ठिकाणी चालू आहे.
कर्वे, ज. नी.
“