चिंगाटी : शेवंडा, चिमोरा इ. कवचधारी प्राणी ज्या डेकॅपोडा गणातील आहेत, त्याच गणात चिंगाट्यांचाही समावेश होतो. चिंगाट्या सामान्यतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात राहतात. गोड्या पाण्यातही त्या राहतात. त्यांचे कित्येक वंश व शेकडो जाती आहेत.

चिंगाटी

चिंगाटीचे शरीर सडपातळ असून ती पोहणारी आहे. ती आकारमानाने जरी लहान असली, तरी उष्ण कटिबंधातील चिंगाट्या लहान शेवंड्याएवढ्या मोठ्या होतात. त्यांचे रंग सामान्यतः फिक्कट असतात. पण पर्यावरणाला अनुसरून ते बदलत असतात. शरीराचे शिरोवक्ष (डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने बनलेला शरीराचा भाग) आणि उदर असे दोन भाग असतात. शरीर दबलेले असून बहिःकंकाल कॅल्शियममय नसतो. शिरोवक्षाच्या शीर्ष भागावर लांब शृंगिका (सांधे असणारी लांब स्पर्शेंद्रिये) आणि लघुशृंगिका यांची प्रत्येकी एक जोडी असते. दोन सवृंत (देठ असलेले) डोळे असतात. वक्ष वरून आणि दोन्ही बाजूंनी पृष्ठवर्माने (पाठीचा काही अथवा सगळा भाग झाकणाऱ्या ढालीसारख्या कायटिनमय संरचनेने) झाकलेले असते. त्याच्यावर सडपातळ पायांच्या पाच जोड्या असतात. शिरोवक्षाच्या मानाने उदर बरेच लांब व खंडयुक्त असते. उदरावर चांगल्या वाढलेल्या प्लवपादांच्या (पोहण्याकरिता असलेल्या पायांच्या) पाच जोड्या असून त्यांचा पोहण्याकरिता उपयोग होतो. प्लवपादांची सहावी जोडी मोठी असून ती उदराच्या पश्च (मागील) टोकाशी असते तिला पुच्छपाद म्हणतात. उदराचा शेवटचा खंड-पुच्छखंड-आणि पुच्छपाद मिळून एक मोठे प्लवांग (पोहण्याकरिता उपयोगी पडणारे इंद्रिय) मिळून एक मोठे प्लवांग (पोहण्याकरिता उपयोगी पडणारे इंद्रिय) बनलेले असून त्याला पुच्छपक्ष म्हणतात. चिंगाटी नेहमी सरळ पुढे पोहत जाते, पण शत्रूची भीती वाटल्यावर पुच्छपक्षाचे जोराने फटकारे मारून ती वेगाने मागे जाते.

लहान प्राणी आणि वनस्पती हे चिंगाट्यांचे भक्ष्य होय, पण त्या स्वतः मासे आणि इतर मोठ्या प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात.

मादी आपली अंडी प्लवपादांना चिकटविते. इतर आर्थ्रोपोडांप्रमाणेच चिंगाटीच्या अंड्यातून अगदी लहान डिंभ (प्राण्याची भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यपणे क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर पडतो. त्यांचे निर्मोचन (कात टाकण्याची क्रिया) होऊन काही काळाने त्याचे दुसऱ्या एका डिंभात रूपांतर होते. अशा तऱ्हेने कित्येक डिंभावस्थांतून गेल्यावर प्रौढ प्राणी तयार होतो.

चिंगाट्यांच्या मच्छीमारीत भारताचा सर्व जगात (अमेरिकेच्या खालोखाल) दुसरा क्रमांक लागतो. मच्छीमारीत भारतात एकूण जितके कवचधारी प्राणी पकडले जातात त्यांपैकी ९०% चिंगाट्या असतात.

चिंगाट्या ताज्या, गोठविलेल्या, सुक्या, हवाबंद डब्यांत किंवा उकडून व कवच काढून विकतात. त्यांच्या सुकविलेल्या डोक्यांपासून व कवचांपासून सुकटीसारखा पदार्थ बनवून जनावरांचे खाद्य म्हणून विकतात. 

पहा : आर्थ्रोपोडा क्रस्टेशिया.

जमदाडे, ज. वि.