चिंगलपुट : (रक्तकमळांचे नगर). तमिळनाडू राज्यातील चिंगलपुट जिल्ह्याचे आणि तालुक्याचे ठाणे. लोकसंख्या ३८,४१९ (१९७१). हे मद्रासच्या दक्षिण नैर्ऋत्येस ५६ किमी.वर पालार नदीवर असून मद्रास—तिरुचिरापल्ली रस्त्यावरील शहर व दक्षिण रेल्वेवरील प्रस्थानक आहे. या शहराने पल्लव, गंग, राष्ट्रकूट, चोल, काकतीय, विजयानगर, कुत्बशाही, मोगल, फ्रेंच, इंग्रज इ. अनेक राजवटी पाहिल्या असून येथील इतिहासप्रसिद्ध किल्ल्यास अठराव्या शतकातील फ्रेंच-इंग्रज सत्तास्पर्धेत मोठे महत्त्व आले होते. यांच्या सभोवती सु. १५० मी. उंचीच्या टेकड्या असून किल्ल्याजवळ मोठा तलाव आहे. येथून जवळच्याच खाणींत मिळणारा, रस्त्यांच्या आणि इमारतींच्या बांधकामासाठी उपयोगी पडणारा दगड बाहेर पाठविला जातो. तांदूळ सडण्याच्या गिरण्या, कुष्ठरोग निवारणकेंद्र, बालगुन्हेगार सुधारगृह यांसाठी हे प्रसिद्ध आहे.
संकपाळ, ज. बा.