चिंगडाऊ : चीनच्या ज्याउजो उपसागरावरील आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असे बंदर. लोकसंख्या सु. १९ लाख (१९७०). हे पीकिंगच्या आग्नेयीस ५५२ किमी. आहे. शँटुंग प्रांतातील या औद्योगिक व व्यापारी शहरात सुती व रेशमी कापडगिरण्या, रेल्वे एंजिने, बोटी, यंत्रे, साबण, सिमेंट इत्यादींचे कारखाने असून येथून कोळसा आणि सोयाबीन यांची मोठी निर्यात होते. १८७७ मध्ये आरमारी तळ उभारल्यापासून या मूळच्या मच्छीमारी खेड्याचे महत्त्व वाढले. १८९४ ते १९१४ पर्यंत जर्मन अंमलाखाली हे सुंदर आधुनिक शहर बनले. पहिल्या महायुद्धानंतर १९२२ पर्यंत व पुन्हा १९३७ ते ४५ पर्यंत ते जपानच्या ताब्यात होते. येथे शँटुंग विद्यापीठ आहे.
ओक, द. ह.