चावडी : गावातील शासकीय कारभाराचे–ग्रामपंचायतीचे–केंद्रस्थान म्हणून भारतीय ग्रामजीवनात ‘चावडी’ या संस्थेला परंपरागत महत्त्व आहे. ‘चौहाट’ या संस्कृत शब्दावरून ‘चावडी’ हा शब्द बनला असावा. गावात शासकीय प्रमुख असलेला पाटील किंवा कोतवाल याची कचेरी या चावडीत भरत असे. देऊळ, धर्मशाळा यांच्याप्रमाणेचावडी ही लहान-मोठ्या अशा सर्वच गावांत दिसून येत असे. गावगाड्याचे विषय सामूहिक रीत्या चर्चिण्याकरिता, गावातील तंटेबखेड्यांच्या बाबतीतील न्यायनिवाड्याकरिता लोक चावडीवर जमत. त्याबद्दलच्या तक्रारींची नोंदही चावडीवर होत असे. करवसुलीसाठी आलेला कारकून, पोलीसपाटील, रामोशी, पांथस्थ वगैरे चावडीवर मुक्काम करीत. चावडीवर मनोरंजनार्थ, गप्पागोष्टी करण्यासाठी तसेच भजन-कीर्तनासाठी ग्रामस्थ जमत. अलीकडे समाजमंदिर, बस-स्थानक इ. समुदाय-केंद्रे अस्तित्वात आल्याने चावडीचे महत्त्व कमी झाले आहे. ग्रामपंचायतीप्रमाणेच व्यक्तीवर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून जातपंचायतीलाही पूर्वी महत्त्व होते. म्हणून प्रत्येक जातीची अशी वेगळी जातचावडी त्या त्या जातीच्या वस्तीत दिसून येत असे. जातपंचायतीचे अधिकार आधुनिक काळात नाहीसे झाले असले, तरी जातीचे हितसंबंध जपण्याच्या आवश्यकतेनुसार व जातीय भावनेस अनुसरून आजही काही गावांत जातपंचायत व जातचावडी अस्तित्वात आहेत. सार्वजनिक चावडीस पंचायत कचेरी हे नाव अलीकडे प्राप्त झाले आहे.

काळदाते, सुधा