चार्ट : विशिष्ट परिस्थिती किंवा विशिष्ट घटकासंबंधीची माहिती दर्शविणारा नकाशा. उदा., हवामानाचा नकाशा. ह्यात विशिष्ट काळातील वातावरणाची स्थिती दाखविलेले असते. तापमान, लोकसंख्या इत्यादींच्या प्रमाणात वेळोवेळी होणारे बदल दाखविणाऱ्या, आलेख पत्रासही चार्ट म्हणतात. तथापि चार्ट म्हणजे मुख्यतः नाविकांसाठी समुद्रपट किंवा समुद्राचा नकाशा होय. त्याच्या साहाय्याने नाविकाला एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत जलपर्यटन तर करता येतेच पण शिवाय सभोवतालच्या प्रदेशाच्या संदर्भात त्याला स्वतःच्या जहाजाचे स्थान निश्चित करता येऊन नौकानयनाची दिशा ठरविता येते. नौकानयनाचे एकूण अंतर व त्यातील संभाव्य धोके ह्यांची कल्पनाही त्याला ह्या समुद्रपटाद्वारे मिळते. अशा चार्टमध्ये जलमार्ग आणि त्यावरील ठिकठिकाणची सागरतळाची रचना, समुद्रकिनाऱ्यावरील दिव्यांची स्थाने, भयसूचक दीपस्तंभांच्या जागा, पाण्यावर तरंगणारे इशाऱ्याचे शंकू इ. कार्यक्षम व सुरक्षित नौकानयनास आवश्यक गोष्टी खुणांनी व चिन्हांनी दाखविलेल्या असतात. चार्टच्या जोडीला त्यात दाखविता येणाऱ्या गोष्टींचे वर्णन व सूचना असलेली पत्रके व पुस्तिकाही नाविकाला पुरविल्या जातात. विमानचालकांनाही त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी दाखविणारे चार्ट पुरविलेले असतात. चौदाव्या शतकात वापरात असलेल्या नाविकांच्या चार्टांत दिशादर्शक रेषा, रेखावृत्तांशी सारखाच कोन करून जाणाऱ्या ऱ्हंब रेषा व उपयुक्त सूचना असत. या नकाशासाठी कोणतेही प्रक्षेपण असे वापरलेले नसे. परंतु देशांचे किनारे व बंदराबंदरांमधील अंतरे बरीच बिनचूक दिलेली असत. हे नकाशे कातड्यांवर किंवा पार्चमेंटवर हाताने काढलेले असत. १५६९ मध्ये मर्केटरचा जगाचा नकाशा प्रसिद्ध झाल्यापासून चार्टवर दिशा दाखविणे फार सोपे झाले. कारण मर्केटरच्या प्रक्षेपणावर काढलेल्या नकाशात दोन ठिकाणी जोडणारी सरळ रेषा दिशाही बिनचूक दाखविते. 

भारतीय दैनंदिन हवामानाचा चार्ट

इंग्लंडच्या जलविद्याखात्याने ब्रिटिश ॲडमिरल्टी चार्ट तयार करुन प्रसिद्ध केले आहेत. ह्या खात्याची स्थापना १७९५ साली झाली. तोपर्यंत जमा झालेली समुद्रविषयक विपुल माहिती व तोपर्यंतचे वापरात असलेले, खाजगी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेले चार्ट लक्षात घेऊन चांगला समुद्रपट तयार करण्याचे श्रेय ईस्ट इंडिया कंपनीत काम करणाऱ्या ॲलेक्झांडर डाल्‍रिंपल या जलशास्त्रज्ञाकडे जाते. त्यानंतर म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी कॅप्टन टॉमस हर्ड व रॉयल नेव्हीचे आरमाराधिकारी सर एडवर्ड पॅरी, सर फ्रॅंसिस बोफर्ट आणि सर विल्यम क्राव्हार्टन इ. जलशास्त्रज्ञांनी इंग्लंडच्या जलविद्याखात्यात मोलाची कामगिरी करून ठेविली आहे. 

अमेरिकेत समुद्रकाठच्या प्रदेशाचे मापन करणारी संस्था १८०७ साली स्थापन झाली व तिची पुनर्घटना पुढे १८४५ साली झाली. या संस्थेने देशाच्या किनाऱ्याला लागून असलेल्या जलभागाचे मापन करून समुद्रपट तयार केले आहेत. पुढे अशा प्रकारचे समुद्रपट तयार करण्याचे व भू-मापन करण्याचे काम अमेरिकेच्या व्यापारखात्याकडे सोपविण्यात आले. याच खात्यातर्फे गल्फ प्रवाहाची उत्पत्ती व त्याचा मार्ग यासंबंधी संशोधन चालू असते. परदेशांतील ज्या ठिकाणी समुद्रकाठांजवळील जलभागाचे मापन झालेले नाही तेथील जलभागाचे आणि पंचमहासरोवरांचे मापन करण्याचे काम नौकानयन खात्याकडे सोपविण्यात आलेले असून, त्यावर आधारित समुद्रपट तयार करण्याचे काम आरमारखात्यातील जलशास्त्र विभागाकडे सोपविण्यात आलेले आहे. परराष्ट्रांनी तयार केलेले समुद्रपट व नकाशे नौकानयन खात्यातर्फे पुनर्मुद्रित केले जातात. 

इंग्लंडच्या जलसंस्थेतर्फे प्रसिद्ध झालेले समुद्रपट ब्रिटिश आरमारातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी जलमापन करून तयार केलेले आहेत. ते तयार करण्यात रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही, रॉयल (पूर्वीची) इंडियन मरीन, दक्षिण आफ्रिकेचे आरमार खाते, रॉयल नेव्ही व मर्कंटाईल मरीन इ. संस्थांच्या कार्याचा उपयोगही करून घेतलेला आहे.


वास्तविक पाहता प्रत्येक राष्ट्रावर आपापल्या समुद्रकिनाऱ्याभोवतीचे समुद्रपट तयार करावयाची जबाबदारी येऊन पडते. बहुसंख्य राष्ट्रांच्या अशा प्रकारच्या जलसंस्था व्यवस्थित कार्य करीत आहेत. या संस्था जलभागमापन, समुद्रपट तयार करणे व नंतर ते प्रसिद्ध करणे इ. कामे करीत असतात. अशा प्रकारे प्रसिद्ध झालेल्या समुद्रपटांची आपापसांत देवघेव करून ही राष्ट्रे परस्परांशी सहकार्य करीत असतात.  

जलमापन करण्याचे काम बरेच अवघड असते. तारा, गट यांच्या साहाय्याने किंवा सोनिक पद्धतीने सर्वप्रथम समुद्राची ठिकठिकाणची खोली मोजण्यात येते. या खोलीचे आकडे मग वासंतिक ओहोटीच्या वेळेस असणाऱ्या समुद्रसपाटीशी प्रमाणित करण्यात येतात. भरती-आेहोटीच्या वेळा आणि त्या वेळी पाण्याच्या पातळीत होणारा बदल, भरतीच्या पाण्याची दिशा व जोर इ. गोष्टी निश्चित ठरविण्यात येतात व अशा रीतीने ठिकठिकाणची स्थिती विचारात घेऊन जलमापनाचे नकाशे तयार करण्यात येतात आणि नंतर ते ॲडमिरल्टीकडे पाठविण्यात येतात. तेथे त्या नकाशांच्या आधारावर समुद्रपट तयार केले जाऊन मग ते प्रसिद्ध करण्यात येतात. तेथे हे नकाशे तयार करीत असताना मूळ दस्तऐवज, प्रचलित चार्ट व जलभागाची अगदी अलीकडे झालेली मोजणी व आधुनिक नकाशे विचारात घेऊनच मग पूर्वी प्रकाशित झालेल्या समुद्रपटांत आवश्यक तो बदल करावा लागतो. समुद्रपट तयार करण्यास लागणारी माहिती संग्रहित करण्यास अनुभव व चातुर्य लागते, कारण कोणत्या पद्धतीने चार्ट तयार केल्यास नाविकास तो अधिक उपयुक्त ठरेल हे धोरण संग्राहकाने ठरवावयाचे असते. एखादी लहानशी क्षुल्लक गोष्टीही चार्टमध्ये दाखविण्याची राहिल्यास त्याचे मोठाले दुष्परिणाम घडून येण्याचा संभव असतो. म्हणून नकाशात मांडलेली सर्व चिन्हे व खुणा पुनःपुन्हा तपासून घ्याव्या लागतात. अशा रीतीने केवळ इंग्लंडमध्येच नव्हे, तर जगातील इतर जलसंस्थांच्या मोजणीदारांनी व शोधकांनी केलेले परिश्रम एका विशिष्ट व व्यापक पद्धतीने सर्व नाविकांच्या उपयोगार्थ सादर करण्यात येतात.  

बऱ्याच जलमार्गांची अजूनही मोजणी झालेली नाही किंवा थोड्या फार प्रमाणात ती झाली असल्यास उपलब्ध झालेली माहिती त्या जलभागांचे समुद्रपट तयार करण्यास अपुरी पडते. अशा जलभागांसाठी तयार झालेले समुद्रपट अत्यंत बारीक रेषांनी काढलेले असतात, त्यामुळे ते वाचताना बरीच काळजी घ्यावी लागते. जनतेसाठी प्रसिद्ध केलेले समुद्रपट प्रसिद्धीच्या वेळी असलेल्या परिस्थितीचे निदर्शक असतात आणि जसजशी नवीन माहिती उपलब्ध होते तसतसे त्यात फेरबदल करण्यात येतात. त्याचप्रमाणे समुद्रपटांत केले जाणारे बदल किंवा समुद्रकिनाऱ्यांवरील दिव्यांची व पाण्यातील खडक दाखविणाऱ्या शंकूच्या स्थानासंबंधीची माहिती, वेळोवेळी परराष्ट्रांनी या बाबतीत प्रसिद्ध केलेली परिपत्रके इ. गोष्टी नाविकास दर आठवड्यास नाविक खात्यातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकाद्वारे विनामूल्य पुरविण्यात येतात. समुद्रपटाबरोबरच काही पूरक-पत्रिका प्रसिद्ध केल्या जातात व त्यांत नौकानयनासाठी मार्गदर्शन, भरती-ओहोटीच्या वेळा, समुद्रकिनाऱ्यांवरील दिव्यांची नोंदी, बिनतारी वेळ-संदेशांची यादी, नौकानयनासंबंधीचे पंचांग, अंतरांची कोष्टके, जागतिक जलमार्ग, वारे, सागरी प्रवाह इ. विषयांवर माहिती दिलेली असते.

 जे समुद्रपट जगातील सर्व नाविकांच्या उपयोगासाठी प्रसिद्ध केले जातात ते पाच प्रकारचे असतात व ते सागरीय, सर्वसाधारण, समुद्रकाठाचे, बंदरांचे आणि प्राकृतिक अशा निरनिराळ्या नावांनी ओळखले जातात. स्थानपरत्वे हे पट मर्केटर किंवा केंद्रीय प्रक्षेपणावर तयार केले जातात. जसजशी नवीन महत्त्वाची माहिती मिळेल तसतसा त्या मुद्रेत फेरबदलही करण्यात येतो. अलीकडे तांब्याच्या पत्र्याऐवजी फोटोलिथोग्राफिक पद्धतीचा उपयोग करतात.

 अमेरिकेच्या समुद्रकाठ व भू-मापन संस्थेतर्फे अटलांटिक व गल्फ किनाऱ्यासंबंधीचे निरनिराळ्या श्रेणींचे चार समुद्रपट आणि पॅसिफिक किनाऱ्यासंबंधीचे तीन समुद्रपट काढण्यात येतात. अटलांटिक व गल्फ किनाऱ्यांविषयक पहिल्या श्रेणीच्या समुद्रपटात बऱ्याच लांबीचा समुद्रकिनारा दाखविण्यात येऊन त्या पटांचा उपयोग काठापासून खुल्या समुद्रात नौकानयन करण्याकडे केला जातो. या श्रेणीच्या समुद्रपटात केवळ समुद्रकिनारा, त्यावरील दिव्यांच्या जागा व इतर आवश्यक ती भौगोलिक माहिती दिलेली असते. दुसऱ्या श्रेणीच्या पटात समुद्रकाठाचे विस्तृत जलपट देण्यात येऊन ते पहिल्या श्रेणीच्या पटापेक्षा तीन पटीने मोठ्या अशा प्रमाणावर काढलेले असतात. त्यामुळे या पटात लहान-लहान प्रदेश अधिक तपशीलात दाखविलेले असतात. त्याच्या साहाय्याने खलाशांना काठाकाठाने नौकानयन करण्यास मदत होते. तिसऱ्या श्रेणीच्या समुद्रपटात दुसऱ्या पटात वापरलेल्या प्रमाणापेक्षा पाच पट मोठे प्रमाण योजून मग पट तयार करण्यात येतात. या समुद्रपटाचे प्रमाण १ = १/ मैल असून त्यात निरनिराळ्या खाड्या व सागरतळाची खोली इ. गोष्टी प्रामुख्याने दिलेल्या असतात. चौथ्या श्रेणीचे समुद्रपट आणखी मोठ्या प्रमाणावर काढलेले असून त्यात केवळ बंदर व त्यासभोवतालचा जलभाग दाखविलेला असतो. असे समुद्रपट केवळ स्थानिक नौकानयनासाठी उपयोगाचे असतात. पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यासंबंधीचे समुद्रपट बऱ्याच अंशी वरील श्रेणींप्रमाणेच आहेत फक्त दुसऱ्या श्रेणीच्या समुद्रपटासाठी वापरलेले प्रमाण मात्र थोडे भिन्न आहे.

 देशाच्या काठाकाठाने चालणारा व्यापार किंवा मोठमोठ्या जलमार्गांवरून होणारा परराष्ट्रीय व्यापार हा समुद्रपटांच्या अनुरोधाने चाललेला असतो. नाविकांप्रमाणेच मासेमारी करण्यासाठी लांबवर जाणाऱ्या कोळ्यांनाही समुद्रपटांचा उपयोग होतो.

 शांततेच्या काळात समुद्रपटाचा उपयोग व्यापारवृद्धीसाठी केला जातो. युद्धकाळात मात्र जर हे समुद्रपट शत्रुपक्षाच्या हाती पडले, तर त्या पक्षाच्या पाणबुडीच्या संचाराला अनुकूल स्थिती निर्माण करून दिल्यासारखे होते व त्यातून मग धोका निर्माण होतो. म्हणून निरनिराळ्या देशांचे समुद्रपट हस्तगत करणे, हे प्रत्येक प्रगत देशाचे आज महत्त्वाचे कार्य होऊन बसले आहे.

 वैमानिकांच्या चार्टांत आकाशमार्ग स्पष्टपणे दाखविलेले असतात. तसेच जमिनीवरील ठळक गोष्टी, प्रमुख लोहमार्ग व रस्ते, जलविभाग इ. आवश्यक गोष्टी दाखविलेल्या असतात. वैमानिकाचा ज्यामुळे गोंधळ होईल असे तपशील गाळलेले असतात. हवाई चार्टांचे आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण करणारी संस्था इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ही होय. तिचे कार्यालय कॅनडात माँट्रिऑल येथे आहे. हवाई चार्टांची आवश्यकता एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जाणवू लागली होती व हवेत तरंगणाऱ्या हवाई जहाजांसाठी काही चार्ट यूरोपात तयार झालेले होते. तथापि १९२७ मध्ये अटलांटिक महासागर विमानाने एकट्याने ओलांडणाऱ्या लिंडबर्गला नाविक व इतर चार्टही वापरावे लागले होते. विमाने कमी वेगाची होती तोवर साधे भूरचनादर्शक टोपोनकाशेही उपयोग पडत, परंतु विमानांचे वेग वाढू लागले तसतसे त्यांच्यासाठी खास नकाशांची आवश्यकता वाटू लागली. आता तर अगदीच वेगळे खास हवाई चार्ट वापरावे लागतात. तथापि नाविक काय किंवा हवाई काय सर्व चार्टांत दिशा व अंतर बिनचूक दाखविणे, हे कोणत्याही चांगल्या नकाशाचे मूलतत्त्व सांभाळावेच लागते.  

वाघ, दि. मु.