चामखीळ : (चर्मकीलक, कच्छपी). त्वचेवर मर्यादित क्षेत्रात, अंकुरात्मक प्रवृद्धी (वाढ) झाल्यास तिला चामखीळ म्हणतात. या प्रवृद्धीवर बारीक बारीक मोड आल्यासारखे दिसतात.
प्रकार : चामखिळीचे अनेक प्रकार आहेत : (१) विषाणुसंसर्गजन्य (व्हायरसाच्या संसर्गामुळे होणारा), (२) रतिरोगजन्य (गुप्तरोगामुळे होणारा), (३) क्षयजंतुजन्य आणि (४) वृद्ध व्यक्तींमध्ये दिसणारी. यांशिवाय चामखिळीचा आकार व स्वरूप यांवरूनही तिचे प्रकार कल्पिलेले आहेत. चामखीळ उत्पन्न करणाऱ्या कारणानुरूपही तिचे प्रकार मानतात : उदा., डांबराची अथवा काजळीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांत उत्पन्न होणारी चामखीळ.
(१) विषाणुसंसर्गजन्य : अधिक प्रमाणात दिसणारा चामखिळीचा हा प्रकार एका विशिष्ट विषाणुसंसर्गामुळे होतो. या चामखिळी हात व बोटांची मागील बाजू या ठिकाणी विशेषकरून दिसतात. वसतिगृहांत एकत्र राहणाऱ्या लहान मुलांत या संसर्गजन्य चामखिळी अधिक प्रमाणात दिसतात. त्या चामखिळी पुढे आपोआप नाहीशा होत असल्यामुळे त्यांची विशेष चिकित्सा करावी लागत नाही.
(२) रतिरोगजन्य : (कीलक). हा प्रकार बहुधा पूयप्रमेहात (परमा या रोगात) दिसतो. मणिच्छेद (शिश्नाच्या सर्वांत पुढील भागावरील त्वचेचे पातळ आवरण) आणि योनिमुख येथील त्वचा व श्लेष्मकला (शरीरातील विविध पोकळ्यांतील अस्तरत्वचा) यांच्या संयोगस्थानाच्या सतत ओलसर राहणाऱ्या भागांत या प्रकारच्या चामखिळी दिसतात. या चामखिळी लाल, मऊ, ओलसर असून फुलकोबीसारख्या अंकुरात्मक दिसतात. या चामखिळींचे कारणही एखादा विषाणूच असावा, असा तर्क आहे. केव्हा केव्हा जीभ व गालाच्या आतल्या भागातही अशाच प्रकारच्या चामखिळी दिसतात. मूळच्या रतिजन्य रोगावर पूर्ण उपचार केल्यास या चामखिळी नाहीशा होतात.
(३) क्षयजंतुजन्य : या चामखिळी शरीरावर कोठेही दिसतात. त्या कोरड्या असून क्षयाच्या चिकित्सेनंतर त्या पूर्ण बऱ्या होतात.
(४) वृद्धावस्थेत दिसणारी : वृद्धावस्थेत मान, चेहरा, पापण्या या ठिकाणी चामखिळी दिसतात. मरणोत्तर परीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयजंतुसंसर्ग झाल्यास हातावर आणि डांबर, काजळी यांमध्ये कामे करणाऱ्या व्यक्तीत त्या पदार्थांचा संबंध सतत येणाऱ्या त्वचेवरही चामखिळी उत्पन्न होतात. या चामखिळी चपट्या असून त्यांचा स्नेहग्रंथीशी (तैलयुक्त पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथीशी) संबंध असतो.
चिकित्सा : मूळ कारण नाहीसे झाल्यास चामखिळी आपोआप बऱ्या होतात, पण जरूर तर तीक्ष्ण शस्त्राने त्या मुळासकट काढून टाकल्यास पुन्हा उद्भवत नाहीत. क्ष-किरण, मोरचूद, ॲसिटिक अम्ल अथवा विजेच्या वा इतर साधनांनी चामखीळ जाळून टाकता येते.
ढमढेरे, वा.रा.
आयुर्वेदीय चिकित्सा : चामखीळ नहाणीसारख्या शस्त्राने उकरून काढून टाकावी आणि सूर्यकांताच्या किरणांनी, क्षाराने किंवा अग्नीने उकरलेला भाग जाळावा.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
पशूंतील चामखीळ : पशूंमधील चामखिळी म्हणजे मनुष्याप्रमाणेच बाह्यत्वचेवर होणारी एक प्रकारची लहान मोठी अर्बुदे (गाठी) म्हणता येतील. आत तंत्वात्मक ऊतक (समान रचना व कार्य असलेला तंतुमय पेशीसमूह) असून त्यावर उपकला (शरीराचा सर्वांत वरचा वा आतला पृष्ठभाग झाकणारी एक प्रकारची त्वचा) अस्तराचे आवरण असलेल्या या गाठी असतात. काही चामखिळींचा देठ स्पष्ट दिसतो, तर काही त्वचेत रुतलेल्या असतात. सर्व प्रकरच्या पाळीव जनावरांमध्ये या कमीअधिक प्रमाणात होतात.
गुरे व घोडे यांना होणाऱ्या चामखिळी प्रामुख्याने व्हायरसामुळे होतात आणि त्या संसर्गजन्य आहेत, असे दिसून आले आहे. दोन्ही जातींतील रोगकारक व्हायरस वेगवेगळे आहेत. लहान वयाच्या गुरांत डोक्यावर, डोळ्यांभोवती आणि मानेवर चामखिळी दिसून येतात. त्या कोरड्या, शृंगी (शिंगासारखी त्वचा असलेल्या) व फुलकोबीसारख्या दिसतात. गाईमध्ये त्या स्तनाग्रावर दिसतात. क्वचित अन्ननलिका व जालिका (रवंथ करणाऱ्या जनावराच्या पोटाचा जाळीदार अस्तर असलेला दुसरा कप्पा) यांमध्येही दिसतात. घोड्यामध्ये नाकपुड्यांभोवतालचा भाग, नाकपुड्या व ओठ यांवरच त्या बहुधा दिसून येतात आणि त्यांना सहसा देठ असत नाही. चामखिळी पाच ते सहा महिने टिकतात व सर्वसाधारणपणे आपोआप बऱ्या होतात.
मांजरापेक्षा कुत्र्यामध्ये चामखिळी जास्त प्रमाणात होतात व त्या अंगावर कुठेही होऊ शकतात. कुत्र्यामध्ये ज्या वेळी त्या हिरड्या, गालांची आतील बाजू व ओठ यांवर येतात तेव्हा त्यांचे पुंजके दिसतात. या ठिकाणी त्यांची वाढ जलद होते. पहिली चामखीळ झाल्यावर दाेन-तीन महिन्यात कुत्र्याचे सबंध ताेंड भरून त्यांची संख्या शंभराच्या वरही जाते. शरीराच्या इतर भागांवर त्यांची वाढ त्यामानाने बरीच कमी असते. कुत्र्याप्रमाणे शेळ्यांमध्येही त्या तोंडावर व ओठावर दिसतात.
गुरांतील चामखिळींवर अँथिओमलीन ह्या गुणकारी औषधाची स्नायूमध्ये अंतःक्षेपणे (इंजेक्शने) देतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ऊतकसंवर्धन तंत्र (शरीराबाहेर पेशी वाढविण्याची पद्धती) वापरून प्रतिरक्षक (रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणारी) लस तयार करण्यात आली आहे व ती उपयुक्त आहे. घोड्यामध्ये आत्मलस (व्यक्ती अगर पशूमधील विशिष्ट रोगकारक सूक्ष्मजंतू किंवा व्हायरस यापासून तयार केलेली लस) उपयुक्त ठरली आहे. शस्त्रक्रिया करूनही चामखीळ काढतात.
दीक्षित, श्री. गं.