चांपानेर माला : गुजरातमधील चांपानेरजवळच्या भागात आढळणार्‍या रूपांतरित (बदललेल्या) खककांचाया थरांना डब्ल्यू. टी. ब्लॅनफोर्ड यांनी चांपानेरचे थर असे नाव दिले (१८६९). त्यांनाच चांपानेर माला म्हणतात. मुख्यत: क्वॉर्ट्झाइट, ⇨ पिंडाश्म, स्लेट व चुनखडक यांसारखे कमी अधिक रूपांतरित खडक या मालेत आहेत. तिच्यातील मोतीपुरा नावाचा हिरवा, ठिपकेदार व शोभिवंत संगमरवर प्रसिद्ध आहे. जोतवाडा व जांबुघोडा येथील खडकांमध्ये मॅग्निजाची धातुके (कच्ची धातू) आहेत. पंचमहालातील शिवराजपुरच्या खाणीतील गोंडाइट खडकांमधून मॅंगॅनिजाची धातुके कित्येक वर्षे काढली जात आहेत. हे खडक धारवाड कालीन आहेत. पूर्वी ते अरवलीच्या खडकांशी सलग होते.

पहा : धारवाडी संघ

ठाकूर, अ. ना.