चागोस : हिंदी महासागरातील ब्रिटिशांचा द्वीपसमूह. मॉरिशसच्या ताब्यातील ही बेटे १९६५ मध्ये सेशेल बेटांकडे आल्यामुळे ती हिंदी महासागरातील ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी या नवीन वसाहतीचा एक भाग बनली आहेत. मालदीव बेटांच्या दक्षिणेस ही सु. ४०० किमी. असून भोवतालच्या पाण्यात मासळी भरपूर सापडते. तसेच किनाऱ्यावर नारळीचे वृक्ष भरपूर आहेत. खोबरेल तेल हे येथील प्रमुख उत्पादन असून सुके खोबरे, ग्वानो खत आणि मासळी यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. खोबरेल तेलाच्या विपुलतेमुळे या बेटांचा उल्लेख कधी कधी ‘ऑइल आयलंड्‌स’ असाही केला जातो.

येथील पाच मुख्य प्रवाळ कंकणद्वीपे म्हणजे द्येगो गार्सीआ, पेरूस बान्युस, सॉलोमन, थ्री ब्रदर्स आणि सिक्स आयलंड्‌स ही होत. यांपैकी शेवटची दोन निर्जन आहेत. चागोसपैकी आग्नेयीचे द्येगो गार्सीआ हे सर्वांत मोठे बेट असून (सु. १२० चौ. किमी.) त्याच्या चंद्रकोरीच्या आकारामुळे ते एक उत्तम बंदर बनले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथे ब्रिटिशांचा हवाई तळ होता. १९६५ पासून हे ब्रिटन व अमेरिका यांच्या संयुक्त संरक्षण योजनेपैकी एक महत्त्वाचे ठाणे झाले आहे. या तळाचा विस्तार करण्याच्या अमेरिकेच्या योजनेला ब्रिटनने मान्यता दिली असून आता हा अमेरिकेचा एक मोठा आरमारी तळ होत आहे.

अमेरिकेने हिंदी महासागरात असे मोठे आरमारी तळ उभारण्यात भारत, श्रीलंका, टांझानिया वगैरे अलिप्ततावादी विकसनशील देशांनी विरोध केला आहे. हिंदी महासागर हे शांततेचे क्षेत्र असावे, अशी या देशांची भूमिका आहे. अमेरिकेने तळ उभारल्यामुळे हा महासागर बड्या राष्ट्रांच्या सत्तास्पर्धेचे क्षेत्र होईल, अशी भीती या देशांना वाटते.

कापडी, सुलभा