चाकवत : (हिं. बेथुसाग, बेथुआ गु. चील, तांको क. चक्रवति सं. वस्तुक, चक्रवर्ति इं. गूजफूट, पिगवीड, वाइल्ड स्पिनॅक लॅ. चिनोपोडियम आल्बम कुल-चिनोपोडिएसी. ही लहान (१-२ मी. उंच) ⇨ ओषधी  भारतात आणि इतरत्र शेतात तण म्हणून वाढते. शारीरिक लक्षणे ⇨चिनोपोडिएसी  कुलात वर्णन केल्याप्रमाणे सर्व भाग काहीसे भुरकट पाने जाडसर व खोड साधारण पिंगट व रेषांकित व शाखायुक्त फुले लहान हिरवट असून नोव्हेंबरात येतात बी चपटे व करडे असते. पानांमध्ये पोटॅश भरपूर असल्याने ती तांब्याची भांडी स्वच्छ करण्यास वापरतात बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, कॅरोटीन व ‘क’ जीवनसत्त्वही असते. ही वनस्पती शीतल, सारक व कृमिनाशक आहे. पालेभाजी म्हणून या वनस्पतीचा उपयोग करतात.

पाटील, शा. दा.

हिमालयाच्या पश्चिम भागात व महाराष्ट्रात हे पीक घेतात. याला मध्यम काळी निचऱ्याची जमीन लागते. जमीन दोनदा नांगरून हेक्टरी २० – २५ टन शेणखत घालून कुळवितात व ३.६ X १.८ मी. आकाराचे वाफे करून त्यांत हेक्टरी ४-५ किग्रॅ. बी फोकून जमिनीत मिसळून पाणी देतात. पुढे दर ८ दिवसांनी पाणी देतात. बी टाकल्यापासून पाच सहा आठवड्यांनी रोपे पालेभाजी म्हणून विक्रीसाठी उपटून घेतात. या पिकावर रोगराई विशेष आढळत नाही. हेक्टरी ८,००० – ९,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते. क्रमांक ११ या संशोधित नवीन वाणाची पाने हिरवी असून देठ गुलाबी असतात. त्याचे उत्पन्न स्थानिक वाणापेक्षा १६ टक्के अधिक येते.

पाटील, ह. चिं.