चांगशा : चीनच्या हूनान प्रांताची राजधानी आणि ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक महत्त्वाचे केंद्र. लोकसंख्या ८,५०,००० (१९७० अंदाज). हे शीआंग नदीच्या पूर्वतीरावर तुंगतिंग सरोवराच्या दक्षिणेस ७२ किमी. वर वसले असून एक उत्कृष्ट नदीबंदर आहे. मध्य यांगत्सी खोऱ्याचे प्रवेशद्वार आणि बाष्प नौकांचे सीमान्त स्थान म्हणून याला महत्त्व आहे.
चांगशा हे चीनच्या अंतर्भागाशी रेल्वे, रस्ते आणि जलमार्गांनी जोडलेले असून पीकिंग-कॅंटन लोहमार्गावरील ते एक महत्त्वाचे प्रस्थानक आहे. चहाच्या मोठ्या उत्पन्नामुळे हे पाश्चिमात्यांचे आकर्षण बनले होते. हे चीनच्या तांदळाच्या कोठारातील समृद्ध शहर आहे. इ.स.पू. २०२ मध्ये याला बारा वेशी असलेली तटबंदी होती. रेशमी भरतकामयुक्त चित्रे, तेल्या कागदाच्या छत्र्या, फटाके, रेशमी धाग्यापासूनचे कापड, बांबूवरील सुबक कोरीव काम इ. अनेक हस्तव्यवसायांचे हे केंद्र असून येथे अँटिमनी, मॅंगनीज, शिसे, जस्त इ. धातू गाळून निर्यात केले जातात. दुसऱ्या महायुद्धानंतर यंत्रहत्यारे, खाण-उद्योग व शेती अवजारे, औषधी रासायनिक खते, रबर उत्पादने इत्यादिकांचे कारखाने उभारण्यात आले आहेत. शिवाय भात सडणे, लाकूड कापणे, जहाजबांधणी, खाद्यपदार्थ निर्मिती वगैरे व्यवसायही येथे चालतात. दुसऱ्या महायुद्धात याची फार नासधूस झाली. युद्धापूर्वीही येथील रस्ते रूंद व स्वच्छ होते. युद्धोत्तर पुनर्बांधणीनंतर या शहराला आधुनिक रूप आलेले आहे. येथील राष्ट्रीय हूनान विद्यापीठ सातशे वर्षांहून अधिक जुने आहे. १९५९ मध्ये नवीन विद्यापीठ निघाले आहे.
कापडी, सुलभा