चतुर : हा मृदुकाय (मऊ शरीराचा) दिनचर कीटक तळी, ओढे व नद्या यांच्या काठावर उडताना आढळतो. विशेषतः अनआयसॉप्टेरा उपगणातील कीटकांना हे नाव देतात, पण ओडोनेटा गणातील कीटकांनाही सामान्यतः हे नाव देतात. त्यांच्या सु. ४,८७० जाती असून त्यांपैकी ५०० जाती भारतात आढळतात. उष्ण कटिबंधात ते विपुल आढळतात. त्यांच्या डोक्यावर दोन मोठे संयुक्त (प्रकाश ग्रहण करणाऱ्या अनेक घटकांचे मिळून बनलेले) नेत्र असून त्यांनी डोक्याचा अर्धा अधिक भाग व्यापलेला असतो. वक्ष तीन खंडाचे बनलेले असते. पहिल्या खंडावर दोन पाय असतात. पहिला खंड इतर दोन खंडापासून अलग असतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडांचे सायुज्जन होऊन (एकत्र मिळून) मोठे पक्षवक्ष तयार झालेले असते. पक्षवक्षावर पायांच्या दोन जोड्या व पापुद्र्यासारख्या पंखांच्या दोन जोड्या असतात. पायांचा उपयोग आधारास धरून बसण्यासाठी होतो, चालण्यासाठी होत नाही. झाडावर किंवा जमिनीवर बसताना तो आपले पंख क्षितिज समांतर पसरून बसतो.
उदर लांब सडपातळ असून दहा खंडाचे बनलेले असते. नर चतुराच्या शेवटच्या खंडांची तीन गुद-उपांगे असतात. मादीचे उदर बरेच बळकट असून त्याच्या शेवटी सामान्यतः दंडगोलाकार उपांगे असतात. जननांगाचे छिद्र आठव्या खंडाच्या खालच्या बाजूस असते. उडताना नर-मादी समागम करतात. मादी पाण्यात अंडी टाकते किंवा त्यांची लांब जिलेटीनयुक्त पट्टी पाण्यात बुडलेल्या वस्तूला चिकटविते. काही माद्या जटिल अंडनिक्षेपकाने (अंडी घालण्याच्या साधनाने) आपले एक एक अंडे वनस्पतींच्या मऊ ऊतकांत (समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) घालतात. काही जातींत अंडी घालताना नर व मादी एकत्र उडतात. एकावेळेस मादी शेकडो ते हजारो अंडी घालते. डिंभ (अळीसारखी अवस्था) हिरवट किंवा तपकिरी असतात. डिंभावस्था काही आठवड्यांपासून सु. पाच वर्षांपर्यंत असते. डिंभ १०—१५ विकासावस्थांतून जातो. तो मुख्यतः शेमटी व डास यांच्या अळ्या खातो.
चतुर उडताना आपल्या पुढील पायांनी लहान कीटक पकडतो. चिलटे, मिज, डास, माशा वगैरेंसारखे लहान कीटक त्याचे भक्ष्य होय. मोठे चतुर पोवळ्यातील मधमाश्या खातात. बेडूक, सरडे आणि पक्षी यांसारखे त्याचे असंख्य शत्रू आहेत. पाकोळ्या, मैना, मार्टिन वगैरे या उपयुक्त कीटकांवर ताव मारतात. सर्व प्रकारचे चतुर उपयुक्त असून त्यांच्यापासून मानवाला उपद्रव होत नाही.
कीटकांच्या इतिहासात सुरुवातीस चतुर आढळते आहेत. उत्तर कार्बॉनीफेरस कालीन म्हणजे सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील जीवाश्मांत (शिळारूप अवशेषांत) मोठ्या चतुरासारखे कीटक आढळले आहेत. त्यांच्या पंखांची लांबी ७५ सेंमी. आहे.
जमदाडे, ज. वि.
“