चचनामा : चच हा सिंधवर राज्य करणाऱ्या शेवटच्या हिंदू ब्राह्मण घराण्याचा मूळ पुरुष. त्या घराण्याची व तदनुषंगाने सिंधवरील अरब विजयाची माहिती देणारा ग्रंथ, तो चचनामा होय. हा ग्रंथ मूळ अरबी भाषेत लिहिला होता. तो कोणी व केव्हा लिहीला हे निश्चित समजत नाही. पण सिंधचा पहिला मुस्लिम विजेता मुहम्मद कासिम याच्या सकीफी जमातीत जन्मलेल्या अलोरच्या काजीकडून मिळालेल्या याच्या मूळ अरबी हस्तलिखिताचा अली कूफी याने १२१६ च्या सुमारास फारसी भाषेत अनुवाद केला. काजीचे म्हणणे असे की, तो ग्रंथ त्याच्या पूर्वजांनी लिहिला. सिंधचा इतिहास व अरबांचा विजय सांगणारा हा सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. त्यातील आख्यायिका, म्हणी, कवने, प्रेमकथा इ. सोडल्यास त्यातील सार अल् बलाधुरीसारख्याच्या ग्रंथातील माहितीने समर्थित होते. या ग्रंथात दिलेल्या माहितीचा सावधगिरीने उपयोग करणे आवश्यक असले, तरी तिचा उपोद्बलक पुरावा म्हणून उपयोग करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. विशेषतः असंभाव्यता आणि इतर निश्चित घटनांशी विरोध नसल्यास, यातील कथन प्रमाण मानण्यास हरकत नाही.
कुलकर्णी, गो. त्र्यं.