चक्रवाक : ॲनॅटिडी पक्षिकुलातील हे एका जातीचे बदक असून पाळीव बदकापेक्षा थोडे मोठे असते. याचे शास्त्रीय नाव टॅडॉर्ना फेरुजीनिया हे आहे. हा भारतात कायम राहणारा पक्षी नसून दक्षिण रशिया, मध्य आशिया, चीन वगैरे देशांतून ऑक्टोबरच्या सुमारास भारतात हिवाळी पाहुणा म्हणून येतो व एप्रिलपर्यंत राहतो. या काळात भारताचा अगदी दक्षिण भाग सोडून तो सगळीकडे आढळतो. यांची जोडपी किंवा टोळकी असून ती तलावांच्या काठी वा नद्यांच्या रेताड किनाऱ्यांवर असतात. हा उत्तम पोहणारा असला, तरी पाण्याऐवजी पाण्याच्या काठावरच राहणे पसंद करतो.
शरीराची लांबी ६५ सेंमी. असून रंग नारिंगी तपकिरी असतो डोके आणि मान यांचा रंग अंगाच्या रंगापेक्षा फिक्कट असतो कधीकधी मानेच्या बुडाशी काळे वलय असते. पंख पांढरे, काळे आणि चकचकीत हिरवे असतात. शेपटी काळी असते. मादी जवळजवळ नरासारखीच, पण तिचे डोके अतिशय फिक्कट रंगाचे, जवळजवळ पांढरे असून मानेच्या बुडाशी काळे वलय नसते. चोच आणि पाय काळ्या रंगाचे असतात.
हा पक्षी मुख्यतः शाकाहारी आहे पण मृदुकाय (मॉलस्क) आणि कवचधारी प्राणी, पाणकिडे, मासे आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी) हे देखील तो खातो. गिधाडांच्या संगतीत हा कुजके मांसदेखील खातो असे म्हणतात. शिकारी लोक या पक्ष्यांची क्वचितच शिकार करतात. चक्रवाक फार हुशार व जागरुक पक्षी आहे. हा आss आँक, आss आँक असा आवाज काढतो.
यांची वीण बऱ्याच प्रदेशांत होते. लडाख व तिबेट या प्रदेशांत त्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ एप्रिल–जून असतो. नद्यांच्या किंवा तलावांच्या पाण्यावर आलेल्या खडकातील बिळात किंवा कपारीत मऊ पिसे घालून घरटे तयार केलेले असते. मादी त्यात ६—१० पांढरी स्वच्छ अंडी घालते.
कर्वे, ज. नी.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..