चंद्रनगर : पश्चिम बंगाल राज्याच्या हुगळी जिल्ह्यातील शहर आणि पूर्वीच्या फ्रेंचांची भारतातील वसाहत. लोकसंख्या ७५,२३८ (१९७१). हे हुगळी नदीच्या उजव्या तीरावर असून कलकत्त्याच्या सु. ३५ किमी. हुगळी-हावडा या पूर्वरेल्वेच्या मार्गावरील स्थानक आहे. ते प्रथम फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारासाठी वसविले. औरंगजेबाने ते १६८८ मध्ये फ्रेंचांना दिले, तेव्हा त्यांनी तेथे कायम स्वरूपाची वसाहत केली. डुप्लेच्या कारकीर्दीत याचा विकास झाला. १७५७ मध्ये ॲडमिरल वॉटसनने समुद्रावरून व क्लाइव्हने जमिनीवरून हल्ला करून ते काबीज केले. नंतर यूरोपातील इंग्रज-फ्रेंच संघर्षांतील जयापजयाप्रमाणे ते आलटून पालटून इंग्रजांकडे व फ्रेंचांकडे जाई. १८१६ मध्ये ते फ्रेंचांकडेच दिले गेले. याच्या सोयीस्कर स्थानामुळे हे अफू वगैरेंच्या चोरट्या व्यापारास उपयोगी पडे. १९४९ च्या सार्वमताने ते भारतात विलीन व्हावे असे ठरले व १९५० मध्ये ते हुगळी जिल्ह्यात समाविष्ट झाले. येथे दोन महाविद्यालये असून एका चौकात डुप्लेचा अर्थपुतळा आहे. येथे शाळा, रुग्णालये वगैरे सोयी असून लोकांत शिक्षितांचे प्रमाण मोठे आहे. आसमंतात तागाचे उत्पादन होत असून येथे तागाच्या गिरण्या आहेत.   

     

कांबळे, य. रा.