घोष, गिरीशचंद्र : (२५ फेब्रुवारी १८४४—८ फेब्रुवारी १९१२). प्रख्यात बंगाली नट आणि नाटककार. जन्म कलकत्त्यास. अभिनयकलेच्या आवडीतून अनुभवाने त्यांना नाट्यसाहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली. ‘बंगालचे गॅरिक’ म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या काळी बंगालमध्ये संगीतिकांच्या (ऑपेराच्या) धर्तीची, संगीतप्रधान (बंगाली गीतिनाट्ये) नाटके विशेष प्रचलित होती. त्यामुळे गिरीशचंद्रांनी काही गीतिनाट्ये लिहिली. त्यांतील पहिले मौलिक नाटक आनंद रहो  हे असून त्यावर ज्योतिरिंद्रनाथ टागोरांच्या अश्रुमतीचा प्रभाव होता.

गिरीशचंद्रांनी सु. सत्तर नाटके, प्रहसने आणि गीतिनाट्ये लिहिली. बंकिमचंद्रांच्या कपालकुंडला  व मृणालिनी  कादंबऱ्यांना त्यांनी नाट्यरूप दिले. शेक्सपिअरच्या मॅक्‌बेथचाही त्यांनी बंगाली अनुवाद केला.

गिरीशचंद्रांच्या नाट्यसाहित्याचे ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक असे तीन प्रकार आहेत. वीररसात्मक अशा ऐतिहासिक नाटकांच्या द्वारे त्यांनी बंगाली जनतेत स्वदेशाभिमान जागृत केला. सिराज उद्दौला, मीर कामिस (१९०६) आणि छत्रपती शिवाजी  (१९०७) ही त्यांची ऐतिहासिक नाटके उल्लेखनीय ठरली. तथापि त्यांची ऐतिहासिक नाटके फारशी यशस्वी न झाल्याने, त्यांनी आपली लेखणी पौराणिक नाटकांकडे वळवली. मित्राक्षरछंदात लिहिलेल्या त्यांच्या पौराणिक नाटकांनी त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. रावणबध (१८८१), सीतार वनवास, अभिमन्यु बध (१८८१), पांडवेर अज्ञातवास, जना (१८९४) ही गिरीशचंद्रांची पौराणिक नाटके श्रेष्ठ प्रतीची ठरली. महापुरुषांच्या जीवनांवरील चैतन्यलीला (१८८६), प्रल्हादचरित्, बुद्धदेव चरित् (१८८७), बिल्वमंगल (१८८८) इ. नाटके आणि प्रफुल्ल (१८८९), मायावसान (१८९८) इ. सामाजिक नाटके प्रशंसनीय ठरली. अशोक (१९११) आशातरु, तपोवन  इ. त्यांची नाटकेही उल्लेखनीय होत.

संख्येने त्यांची नाटके अधिक असली, तरी गुणवत्तेच्या दृष्टीने त्यांच्या नाटकांचा व्हावा तसा विकास झाला नाही. सर्वसाधारण प्रेक्षक लक्षात घेऊन त्यांनी ती लिहिल्यामुळे, त्यांत थोडा फार एकसुरीपणाही आला. मनमोहन बसू व दीनबंधू मित्र हे दोन नाटककार त्यांचे आदर्श होते. गिरीशचंद्रांनी आपल्या सामाजिक नाटकांतून बंगाली समाजाचे दैनंदिन जीवन व संसारचित्र सुरेख रेखाटले आहे. ही नाटके कारुण्याने भरलेली आहेत. त्यांना रामकृष्ण परमहंसांचे सान्निध्य व सहवास लाभला होता. त्यामुळे त्यांच्या मनात जो भक्तिभाव प्रकर्षाने जागृत झाला, तो त्यांच्या नाटकांतून उतरला. बंगाली नाटक व रंगभूमी या क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व महत्त्वपूर्ण आहे.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)