घोष, अश्विनीकुमार : (१८९२—१९६२). एक प्रसिद्ध ओडिया नाटककार. त्यांनी पौराणिक, धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक विषयांवर सु. चाळीस नाटके लिहिली. १९२८ मध्ये त्यांनी ‘आर्ट थिएटर’ नावाची व्यावसायिक नाटक मंडळी स्थापून तिच्या द्वारा आपल्या नाटकांचे प्रयोग केले. ‘आर्ट थिएटर’ ह्या संस्थेपासूनच आधुनिक ओडिया रंगभूमीची सुरुवात मानली जाते. पंडित ⇨गोदावरीश मिश्र  व अश्विनीकुमार हे आधुनिक ओडिया रंगभूमीचे जनक होत. सु. पंचवीस वर्षे अश्विनीकुमारांच्या नाटकांचे यशस्वी प्रयोग ओरिसात होत होते. ओडिया रंगभूमीवर नद्य नाटकांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे श्रेय अश्विनीकुमारांना दिले जाते. आपल्या नाट्यप्रयोगांत त्यांनी आधुनिक तंत्रांचा व रंगमंचीय क्लृप्त्यांचा प्रभावी वापर केला. कोणार्क हे त्यांचे विशेष उल्लेखनीय व गाजलेले नाटक होय. त्यांची नाटके प्रायोगिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी होती तथापि त्यांचे वाङ्‌मयीन मूल्य मात्र सामान्यच आहे. म्हणूनच ⇨ कालीचरण पटनाइकांची  समर्थ नाटके ओडिया रंगभूमीवर अवतरताच अश्विनीकुमारांची नाटके मागे पडली.

दास. कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)