घोड्यांच्या शर्यती  : घोड्यांच्या शर्यती जगभर रूढ असल्या, तरी इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांत त्या विशेष लोकप्रिय आहेत. या लोकप्रियतेमुळे घोड्यांची पैदास आणि त्यांच्या शर्यती यांना तेथे मोठ्या व्यवसायाचे स्वरूप आलेले आहे. शर्यतीचे मैदान केवळ करमणुकीचे व खेळाचे ठिकाण नसते. घोड्यांची चाचणी घेण्याचे, त्यांची शक्ती अजमाविण्याचे व शारीरिक कणखरपणा जोखण्याचेही स्थान असते. चाचणीत उतरलेल्या घोड्यांच्या खरेदी-विक्रीचा फार मोठा व्यवहारही तेथे होतो.

इंग्लंडमध्ये घोड्यांच्या शर्यतीची लोकप्रियता वाढल्यामुळे तेथे एका मध्यवर्ती अधिकारी मंडळाची स्थापना करून, तसेच शर्यतीचे नियम व अटी तयार करून त्या शर्यती अपप्रकार न होता चांगल्या रीतीने पार पडतील, याची दक्षता घ्यावी लागली. १७५१ साली स्थापन झालेल्या जॉकीक्लबमध्ये अनेक मोठ्या आणि सरदार मंडळींचा समावेश होता. नॅशनल हंट समिती ही त्याच क्लबची संलग्न संस्था असून, तिची आजही तेथील शर्यतींवर कडक नजर असते. पोनी टर्फ क्लब नव्याने स्थापन झालेला असून त्याच्या नियमांप्रमाणे १५ हातांपेक्षा (सु. १५० सेंमी.) मोठी घोडी चालत नाहीत. या संस्थांच्या नियमांच्या बाहेर ज्या शर्यती होतात, त्यांना फ्लॅपिंग शर्यती असे म्हणतात. या शर्यतींंत भाग घेतलेल्या घोड्यांना वरील तीन संस्थांनी चालविलेल्या शर्यतीत भाग घेता येत नाही.

ब्रिटिश बेटांतील सपाट मैदानावरील शर्यतीची जबाबदारी जॉकीक्लबची आहे. नॅशनल हंट समिती आडदांडी (हर्डल्स) व कुंपणांतील (फेन्स) शर्यती घेते. आयरिश टर्फ क्लब आणि आयरिश नॅशनल हंट स्टीपल चेस या समित्यांकडे आयर्लंडमधील शर्यतींचे अधिकार आहेत. ब्रिटनमधील शर्यती अत्यंत शिस्तीने चालतात. येथे स्ट्युअर्डच्या निर्णयावर दादही मागता येत नाही.

शर्यतींच्या विविध प्रकारांत भाग घेणाऱ्या घोड्यांची आनुवंशिकता, त्यांचे वय आणि त्यांनी वाहून न्यावयाचे वजन तसेच त्यांनी शर्यतीत काटावयाचे अंतर इ. गोष्टी नियमांनुसार निश्चित केलेल्या असतात.

घोड्यांच्या शर्यतीत त्यांच्या वयावरून गट पाडतात. २ ते ५ वर्षांच्या घोड्याला शिंगरू म्हणतात व घोडीला शिंगी म्हणतात. दोन वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत घोडा किंवा घोडी दुय्यम दर्जाच्या शर्यतीत भाग घेऊ शकतात. पाच वर्षांनंतर ते प्रथम दर्जाच्या (क्लासिकल) शर्यतीत भाग घेण्यास पात्र होतात. पाच वर्षांच्या घोड्याची उंची १५ ते १६ हात म्हणजे १५० ते १६० सेंमी. असते व वजन सु. ४१० ते ५४५ किग्रॅ.च्या (९०० ते १,२०० पौंड) दरम्यान असते. घोड्यांच्या शर्यतींचे अंतर ०·८ किमी. पासून २·४ किमी. असते व हे अंतर जलद पळताना घोड्याचा वेग सामान्यतः ताशी ५५ ते ६५ किमी. असतो. या शर्यतीत घोड्यांवर जिंकणे (विन), दुसरा क्रमांक (प्लेस) व तिसरा क्रमांक (शो) अशा तीन प्रकारांनी पैसे लावतात. वरील तिकिटाप्रमाणे घोडे आल्यास सर्व खर्च, कर इ, वजा जाता उरलेले पैसे विभागून देतात. त्याचा भाव शर्यत संपल्यावर लगेच जाहीर करण्यात येतो.

प्रथमदर्जाच्या किंवा मोठ्या शर्यतीत एक किंवा दोन हजार गिनी, डर्बी, ओक्स आणि सेंट लेजर व त्यांच्या जवळपास गणण्यात येणाऱ्या शर्यतीत ना शासन ना सवलत, असा प्रघात असतो. शर्यतीत लहान घोड्या आणि लहान घोडे भाग घेत असतील, तेव्हा लिंगभेदामुळे काही सवलती देतात. शिकाऊ स्वारांना मुरब्बी स्वारांविरुद्ध भाग घेताना पूर्वीच्या यशांच्या दाखल्यावरून सूट मागता येते. एखाद्या विशिष्ट शर्यतीतील नियमांनुसार एखाद्या घोड्यासाठी काही सूट मागता येते. पंधरा शर्यती जिंकलेल्या घोड्यांवरून ज्यांनी ज्यांनी शर्यतीत भाग घेतलेला नसेल, त्यांना सूट देण्यात येते.

पूर्वी कधीही न जिंकलेल्या प्रत्येक वयाच्या घोड्यांसाठी पहिल्या (मेडन) स्पर्धा भरवितात. ज्या सपाट व उड्या मारावयाच्या शर्यती होतात, त्या कनिष्ठ प्रतीच्या घोड्यांसाठी असतात. या शर्यतीत भाग घेणाराला विजयी झालेल्या घोड्याचा लिलाव करावयाची अट मान्य करावी लागते. घोड्याच्या मालकालाही लिलावात भाग घेता येतो. या शर्यतीत आपला कनिष्ठ प्रतीचा घोडा विकून टाकण्याची संधी मिळते.

कलकत्ता टर्फ क्लब, वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब आणि साउथ इंडिया टर्फ क्लब हे भारतातील घोड्यांच्या शर्यतींचे नियंत्रण करणारे प्रमुख तीन क्लब आहेत. १८४७ साली कलकत्ता टर्फ क्लब स्थापन झाला. १८६४ सालापासून मुंबईच्या वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडे मुंबई आणि पुणे येथील शर्यतींचे नियंत्रण आले. १९५३ साली मद्रासचा टर्फ क्लब स्थापन झाला. अठराव्या शतकाच्या शेवटापासून कलकत्त्यातील सुरुवातीच्या शर्यतींची नोंद सापडते. स्थापनेनंतर मध्यंतरी काही वर्षे कलकत्त्याच्या शर्यती बंद असल्या, तरी १८६० सालापासून त्या अखंडपणे चालू आहेत. मद्रासच्या टर्फ क्लबकडे मद्रास, बंगलोर, सिकंदराबाद, उटकमंड आणि म्हैसूर येथील शर्यतींचे नियंत्रण आहे.

मुंबईत भायखळा क्लबच्या मैदानावर १७९७ सालापासून शर्यतींना सुरुवात झाली. महालक्ष्मीच्या मैदानावरील शर्यती १८८३ सालापासून चालू झाल्या. १९२५ साली हा क्लब खाजगी मर्यादित कंपनी म्हणून नोंदण्यात आला. शर्यतीच्या वेळी घोडा किती वजन वाहून नेऊ शकेल, हे ठरविण्याची जबाबदारी त्या घोड्याच्या शिक्षकावर असते. हा अधिकार शिक्षक दुसऱ्यालाही देऊ शकतो. हे वजन शर्यतीपूर्वी विशिष्ट वेळी जाहीर करावे लागते. या जाहीर केलेल्या वजनांची चाचणी घ्यावयाची जबाबदारी वजन घेणाऱ्या कारकुनावर असते वजनात जॉकी, खोगीर, झापडी इत्यादींचेही वजन धरतात. जर जॉकीचे वजन जाहीर केलेल्या वजनापेक्षा जास्त भरत असेल, तर ही वाढ शर्यतीपूर्वीच प्रकट करण्यात येते. या जादा वजनामुळे तो घोडा शर्यत जिंकण्याचा संभव कमी होत असला, तरी मालकाला आणि शिक्षकाला तोच जॉकी हवा असेल, तर ही वाढ क्षम्य समजतात.


वजने झाल्यानंतर जॉकी घोड्यांवरून प्रदर्शनासाठी ठेवलेल्या रिंगणात जातो. प्रवेश फी भरलेल्या माणसांना हे घोडे पाहून स्वतः कोणत्या घोड्यावर पैसे लावावे, हे ठरविता येते. यानंतर घोडेस्वार शर्यत सुरू व्हावयाच्या दरवाज्याजवळ जातात. शर्यतीचे जेवढे अंतर ठरलेले असेल, त्या हिशेबाने मैदानात चकरा मारतात. शर्यत जेथे पूर्ण व्हावयाची असेल, तेथे रोवून ठेवलेल्या पांढऱ्या खांबावर एक तांबडे वर्तुळ काढलेले असते. छायाचित्रे घेऊन शर्यतींचे निर्णय निश्चित करतात. कॅमेऱ्याने दर दीड सेकंदाला छायाचित्रे घेण्याची आणि निर्णयात्मक भागाचेच छायाचित्रण करावयाची व्यवस्था असते. त्यामुळे निर्णय अचूक होतो.

शर्यतीपूर्वी भरलेल्या वजनाइतकेच शर्यतीनंतरही वजन भरले पाहिजे, असा निर्बंध असल्याने शर्यत संपल्यानंतर पाच मिनिटांच्या आत विजयी घोड्यांची वजने घेतात. दुसऱ्या घोड्याला स्पर्श करणे, त्याच्या मार्गात येणे किंवा त्याला मैदानाबाहेर ढकलणे, घोड्याला पुष्कळ मारपीट करणे किंवा ओरडणे, उत्तेजक किंवा मादक पेय किंवा औषधे देणे इ. नियमबाह्य व दंडनीय अपराध असून अशा घोड्याला शर्यतीत भाग घ्यावयास बंदीही करता येते.

प्रत्येक शर्यतीच्या मैदानावरील आर्थिक व्यवस्था वेगवेगळी असते. प्रवेशमूल्य आणि शर्यतीत लावण्यात येणाऱ्या पैशातून सरकारी कर, मैदानाच्या मालकांचा लाभांश आणि बक्षिसे देण्यात येतात. वितरण, मोजणी कामांसाठी यंत्रे वापरतात.

मुंबईत नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा ते एप्रिलचा पहिला आठवडा या दरम्यान या शर्यती साधारणपणे २६ दिवस होतात. या शर्यतीतील एका दिवसाचे उत्पन्न रुग्णालयांच्या मदतीसाठी देतात. इतर उत्पन्नातून लक्षावधी रुपयांच्या देणग्या देण्यात येतात. पुण्यात जुलैच्या शेवटच्या रविवारपासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एकूण १४ दिवस शर्यती होतात. साधारणपणे मद्रास येथे २३ दिवस, उटकमंड येथे ८ दिवस, बंगलोर येथे १५ दिवस, सिकंदराबाद येथे ८ दिवस व म्हैसूर येथे ४ दिवस शर्यती होतात. तमिळनाडूच्या राज्यसरकारने मात्र आपल्या राज्यात घोड्यांच्या शर्यतीस बंदी घातलेली आहे.

एका वेळी जास्तीत जास्त दोन हजार रुपयेच घोड्यावर लावता येतात. त्यापेक्षा जास्त लावलेल्या रकमांना अधिकृत स्वरूप नसते.

माणसांत करमणूक करावयाच्या इच्छेबरोबरच रोमांचकारी कार्यात भाग घेण्याची प्रवृत्ती असते, एकदम पैसा मिळविण्याचेही आकर्षण अशा खेळांच्या बुडाशी असते. या खेळात ज्ञान, अनुभव, धाडस या गोष्टींप्रमाणेच दैवही अनुकूल असावे लागते.

संदर्भ : 1. Craig, Dennis, Horse-racing, London, 1963.

   2. Mudaliar, V. S. Mahalakshmi, Bengalore, 1961 .                                                                      

गोखले, श्री. पु.