घोडा : मानवाची उन्नती व घोड्याचा क्रमविकास (उत्क्रांती) यांचा परस्पर दृढ संबंध आहे. तसेच मानवाने लढाईत केलेले विक्रम घोड्याच्या सहकार्याशी व बलाशी निगडीत आहेत. घोडा हा प्राणी कामसू व उमद्या स्वभावाचा असून वाहतुकीच्या कामात भार खेचणारा तसाच चपलही आहे. जगातील निरनिराळ्या हवामानांत जगण्याची कुवत त्याच्या ठिकाणी असून तो कुरणात चरून जगू शकतो व यामुळे प्राचीन काळापासून तो मानवाला उपयोगी ठरला आहे. स्वारी, वाहतूक व खेळ यांसाठी तो सर्व देशांत उपयुक्त ठरलेला असून पाश्चात्त्य देशांत शेतीच्या मशागतीच्या कामी त्याचा औतासाठीही उपयोग करण्यात येतो. सर्वच क्षेत्रांत यांत्रिकीकरण वाढल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर तसेच वाहतुकीसाठी मोटारी, विमाने यांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागल्यामुळे घोड्याच्या उपयुक्ततेचे क्षेत्र मर्यादित झाले आहे. सर्व प्रगत देशांत हल्ली शर्यतीपुरताच त्याचा उपयोग होतो.
घोडा हा स्तनी प्राण्यांच्या ईक्विडी कुलातील (अश्वकुलातील) असून त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस कॅबॅलस आहे. तो पेरिसोडॅक्टिला या विषमखुरी प्राण्यांपैकी असून एकखुरी आहे. ईक्वस वंशातील गाढव व झीब्रा यांच्यापेक्षा घोड्याची आयाळ व शेपटीचे केस लांब असतात. घोड्याच्या चारी पायांच्या आतील बाजूस किण (घट्टे) असतात, तर गाढव व झीब्रा यांच्या पुढील पायांनाच असतात. आकारमान व वजन या बाबतींत घोड्याच्या निरनिराळ्या जातींमध्ये बराच फरक दिसून येतो. पूर्ण वाढ झालेल्या तट्टाचे सरासरी वजन १३५ किग्रॅ. असते, तर अवजड मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या घोड्याचे वजन १,००० किग्रॅ. पर्यंत असू शकते. त्याचप्रमाणे १२० सेंमी. पासून १७० सेंमी. पर्यंत उंचीत फरक असू शकतो.
क्रमविकास : ईक्विडी कुलाचे नक्की पूर्वज कोण हे जरी निश्चितपणे सांगता आले नाही, तरी पंचांगुली प्राण्यांपैकी एक असावा हे निर्विवाद आहे. उत्तर अमेरिकेत सापडलेल्या जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) ईक्किडी कुलातील प्राण्यांच्या वंशजाच्या क्रमविकासाचा पाच कोटी वर्षांचा इतिहास स्पष्टपणे रेखाटता येतो. यावरून असे दिसून येते की, इओसीन काळातील (सु. ५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) घोड्यांच्या पूर्वजांना (हायरॅकोथेरियम) पुढील पायांना चार बोटे आणि मागील पायांना तीन बोटे होती व हे कोल्ह्याएवढ्या लहान आकाराचे होते. यांना घोड्यांचे पूर्वज म्हणून ओळखणे कठीणच होते. डोळ्याची अपूर्ण खोबण, लहान आकाराची डोक्याची कवटी, अप्रगल्भ मेंदू, धनुष्याकृती पाठ, आखूड शेपटी, फक्त पाने व कोवळे अंकूर खाण्यायोग्य परंतु गवत खाण्याला निरुपयोगी असा दाढांचा माथा, पायाची आखूड हाडे व एकंदर लहानसा आकार इत्यादींमुळे हे प्राणी आधुनिक घोड्यापेक्षा बरेच निराळे होते. ऑलिगोसीन काळात (सु. ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) झालेल्या क्रमविकासाने बरेच फरक पडत जाऊन ह्या प्राण्यांच्या हाडांच्या सांगड्यात आणि ठेवणीत आधुनिक घोड्याशी बरेच साम्य दिसू लागले. मुख्यत्वे अग्रदाढांमध्ये फरक होऊन त्यांचा आकार दाढांप्रमाणे म्हणजे आधुनिक घोड्यात आहे तसा झाला. प्राणिविज्ञानात घोड्यांच्या क्रमविकासातील निरनिराळ्या अवस्थांना–त्यातील समूहांना–निरनिराळी नावे दिलेली आहेत. इओसीन काळातील इओहिप्पस ह्या अवस्थेपासून ते आधुनिक घोड्यापर्यंतचा क्रमविकास सरळ रेषेत झाला अशी चुकीची समजूत प्रचलित आहे. तरी हायरॅकोथेरियमापासून–ओरोहिप्पस–इपिहिप्पस– मेसोहिप्पस –मायोहिप्पस –येथपर्यंत अडीच कोटी वर्षांपर्यंत तो सरळ रेषेतच झाला असे दिसते. यापुढील क्रमविकास थोडाफार गुंतागुंतीचा दिसतो. मायोहिप्पस या अवस्थेनंतरच्या क्रमविकासाच्या वेळी अँकिथेरिनी आणि ईक्विनी असे दोन समूह निर्माण झाल्याचे दिसते. अँकिथेरिनी या समूहामध्ये फारसा क्रमविकास न होता सु. एक कोटी वर्षांपूर्वी हा समूह नामशेष झाला. ईक्विनी हा समूह मात्र चांगल्या तऱ्हेने तग धरून राहिला. याच सुमारास मायोसीन काळात दोन कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर विशेषतः पठारावर गवत उगवण्यास सुरुवात झाली आणि या समूहातील प्राणी गवतावर उपजीविका करू लागले. गवतातील पौष्टिकपणामुळे ते चांगले पोसले गेले. गवताबरोबर त्याला चिकटलेली वाळू खाणे अपरिहार्य होते त्यामुळे दातांची जास्त झीज होणेही साहजिकच होते. गवत खाणाऱ्या प्राण्यांचे दात लोलकाच्या आकाराचे व लांब असतात. त्यावर भरपूर दंतवल्काचे (दातावरील कॅल्शियमयुक्त द्रव्याचे) थर असून भोवती पातळ पटलांनी बनलेल्या हाडाच्या थराचे वेष्टनही असते. त्यामुळे दात झिजण्याची क्रिया हळूहळू होते आणि ते लांब असल्यामुळे झिजले, तरी उतारवयापर्यंत उपयोगी पडतील इतके शिल्लक राहतात. ईक्विनी या समूहातील प्राण्यांच्या दातांमध्ये वर वर्णिलेले गवत खाण्यायोग्य बदल होत गेले व ईक्विनीच्या पुढील क्रमविकासावस्थांमध्ये म्हणजे पॅरॅहिप्पस व मेरिकहिप्पस या अवस्थांमध्ये हे बदल पूर्ण झाले. दातांतील बदल पूर्ण झाले तरी मेरिकाहिप्पस या अवस्थेमध्ये पायाची तीन बोटे कायमच राहिली. डोक्याची कवटी व पायांची लांबी यांत मात्र बरेच बदल झाले. त्यामुळे दीड कोटी वर्षांपूर्वीचे मेरिकहिप्पस या अवस्थेतील मायोसीन काळातील हे समूह हल्लीच्या तट्टासारखे दिसत असावेत.
मायोसीन काळाच्या अखेरीस मेरिकहिप्पस ह्या अवस्थेतील घोडे सर्रास गवतावर चरू लागले. मेरिकहिप्पसातून सहा अवस्थांची उत्पत्ती झाली. त्यांतील बहुतेक नामशेष झाल्या परंतु हिप्पेरिऑन म्हणून संबोधल्या गेलेल्या अवस्थेपासून उत्पन्न झालेली स्टायलोहिप्पेरिऑन ही अवस्था काही हजार वर्षांपूर्वीपर्यंत आफ्रिकेत हयात होती. खुद्द हिप्पेरिऑन या अवस्थेतील घोडे मात्र नामशेष झाले पण त्याआधीच उत्तर अमेरिकेमधून अलास्कामार्गे आशिया व तेथून यूरोप आणि आफ्रिका खंडांपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. प्लायोहिप्पस ह्या दुसऱ्या अवस्थेमध्ये क्रमविकास होत राहिला. पायाच्या तीन बोटांतील बाजूच्या दोन बोटांची हाडे आखूड झाली व ती जमिनीला टेकेनाशी झाली व घोडे मधल्या बोटावरच चालू लागले. पुढे बाजूच्या बोटांची हाडे इतकी लहान झाली की, ती कातड्याखाली शेषरूपाने झाकून गेली. प्लायोहिप्पस अवस्थेपासून हल्लीच्या घोड्यांचे पूर्वज ईक्वस निर्माण झाले व त्यांचा प्रसार ऑस्ट्रेलिया खंड सोडून जगभर झाला. यांचे प्लाइस्टोसीन काळातील (सु. ६ लक्ष वर्षांपूर्वीच्या काळातील) जीवाश्म जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळतात. घोड्यांच्या क्रमविकासाचा हा इतिहास प्रायः उत्तर अमेरिकेत व इतर देशांतील उत्खननात सापडलेल्या जीवाश्मांवरून ग्रथित केलेल्या माहितीच्या आधारे उपलब्ध झाला आहे. वर उल्लेखिलेल्या क्रमविकासातील अवस्थांमधील दात व पायाच्या बोटांतील फरक प्रामुख्याने वर्णिला आहे. या व्यतिरिक्त इओहिप्पसापासून ईक्वसापर्यंत क्रमविकास होताना शरीर हळूहळू ८ ते १० पट मोठे झाले. पाठ मजबूत आणि सरळ रेषेत झाली. दाढांच्या माथ्यावरील पृष्ठभाग विस्तृत झाले, पाय लांब व वेगाने पळण्यासाठी उपयुक्त होतील असे झाले, मेंदूचा कप्पा विस्तृत झाला व मधल्या बोटाच्या पेऱ्याचे भक्कम खुरात रूपांतर झाले.
इतिहास : पृथ्वीतलावर मानवी जीवनाच्या आधीपासून हजारो वर्षे घोडा अस्तित्वात आहे. परंतु त्याचा संगतवार इतिहास मात्र इ. स. पू. २ ते ३ हजार वर्षांपासूनचा उपलब्ध आहे. त्याच्या मूळ स्थानासंबंधी शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. तरी आज दिसणारा घोडा आशियातील घोड्याचा वंशज असावा असे समजतात. उत्तर मध्य आशिया खंडात त्याचे वसतिस्थान होते आणि तेथून त्याच्या तीन शाखा निघाल्या असे मानतात. एक चीन व मंगोलियाकडे गेली, दुसरी पश्चिमेकडे युरोपात गेली आणि तिसरी व महत्त्वाची ईशान्येकडे पर्शिया (इराण), भारत, अरेबिया व ईजिप्तमार्गे उत्तर आफ्रिकेपर्यंत पोहोचली. चीन आणि युरोपकडे गेलेल्या शाखा विकास न पावता स्थानिक स्वरूपात राहून जवळजवळ नामशेष झाल्या, असे तज्ञांचे मत आहे. तिसऱ्या शाखेतील घोड्यांची नीट जपणूक झाली आणि त्यांपासून आधुनिक घोडा जन्मास आला. कुत्रा, उंट व गाय यांच्या मानाने घोडा बऱ्याच उशिरा माणसाळला. इतके मात्र खरे की, मानवाच्या उन्नतीशी त्याचे अगदी जवळचे नाते जडले. ज्या ठिकाणी मानवाची पावले उमटली त्या ठिकाणी घोड्याच्या खुरांचा ठसा आढळला, असे जॉन ट्रॉटवूड मुर यांनी म्हटले आहे. स्वारीसाठी, वाहनासाठी व मुख्यत्वे करून सैन्यामध्ये त्याला मानाचे स्थान मिळाले. लढायांत घोडदळाच्या रूपाने त्याचा चांगलाच हातभार लागला. रोमन साम्राज्यात झालेल्या लढायांच्या वेळी पाश्चात्त्य व पौर्वात्य जातींचे घोडे एकत्र आले व त्यांच्या संकरामधून चांगल्या जातींची पैदास झाली. त्यावेळी घोड्यांना लढाईत अजस्र ओझेही ओढावे लागे त्यामुळे त्यांची ठेवण मजबूत झाली, बांधा मोठा झाला. आजच्या जड ओझे ओढणाऱ्या घोड्यांच्या जातींचे हेच पूर्वज होत. नंतरच्या काळात मुर लोकांनी आपल्या बरोबर अरबी इ. पौर्वात्य घोडे स्पेनमध्ये नेले. तेथे घोड्यांच्या पैदाशीकडे शास्त्रीय दृष्ट्या विशेष लक्ष दिले गेले आणि त्यामुळे यूरोपात स्पेन हा देश या क्षेत्रात अग्रेसर झाला. अमेरिकेत वसाहतीसाठी गेलेल्या स्पॅनिश लोकांनी हे उत्तम जातीचे घोडे अमेरिकेत नेले. अमेरिकेत रानटी अवस्थेत दिसलेले घोडे रानटी नव्हतेच, तर ते ह्या स्पॅनिश घोड्यांचे वंशज होत. खऱ्या अर्थाने रानटी म्हणता येईल अशी ‘परझेव्हाल्यस्की’ ही एकच घोड्याची जात एकोणिसाव्या शतकात १८७९ च्या सुमारात पश्चिम मंगोलियात आढळली. हा घोडा दिसायला खुजा, १२० सेंमी. उंचीचा, झीब्र्याप्रमाणे आयाळीचे केस ताठ उभे असणारा, रानटी सवयी असणारा कुरूप प्राणी आहे. एके काळी रानटी अवस्थेत मध्य आशियात हे घोडे बरेच होते पण आता नमुन्यादाखल कोठे कोठे प्राणिसंग्रहालयात दिसतात तेवढेच, बाकी जात नामशेष झाल्यातच जमा आहे. टारपन ही आणखी एक जंगली जात मध्य यूरोपमध्ये भटकत असे. लहान चणीचा भरपूर लांब आयाळ असणारा हा घोडा माणसाळलेल्या घोड्यांच्या जातींशी झालेल्या संयोगामुळे पुढे पुढे नामशेष झाला होता, परंतु म्यूनिक येथील प्राणिसंग्रहालयाने निवड पद्धतीने प्रजनन करून ह्या जातीचे पुनरुज्जीवन केले आहे. आता ह्या जातीचे काही घोडे यूरोपातील व अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयांत दिसतात.
भारतातील घोडा हा भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातील घोड्यांचा वंशज आहे. भारतात वाहनोपयोगी व युद्धोपयोगी पशू म्हणून घोड्याचे ऋग्वेदात वर्णन आहे. वैदिक आर्य युद्ध प्रसंगी घोडे जुंपलेला रथ वापरीत. घोडदौडीला ऋग्वेदात ‘आजी’ म्हटले आहे. भारताच्या वायव्य सरहद्दीवरील कांभोज, गांधार, आरह सिंधुदेश, पारसीक या देशांतील घोडे उत्तम प्रतीचे मानले जात असत, असे कौटिल्यांनी अर्थशास्त्रात लिहिले आहे. त्यांनी घोड्यांचे युद्धातील महत्त्व ओळखून अश्वशाला, घोड्यांचा खुराक, त्यांचे आरोग्य, उपज, वर्गीकरण, शिक्षण इ. गोष्टींविषयी तपशीलवार वर्णन केले आहे. श्रीकृष्णाच्या रथाला चार घोडे होते व त्यांची शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक अशी नावे होती. इतिहास कालातील चालुक्य विक्रमादित्य यांचा चित्रकंठ, राणा प्रताप यांचा चेतक, शिवाजी महाराजांची कल्याणी घोडी इ. घोडे प्रसिद्ध आहेत.
मानवाच्या रानटी अवस्थेत घोडे भक्ष्य म्हणून मारले जात असत. अजूनही दुष्काळात काही देशांत ते खाण्यात येतात. घोड्याच्या कातड्यापासून तंबू, पेहेरावाचे कपडे, सरंजाम इ. करीत असत. इ. स. पू. ३००० वर्षांच्या सुमारास मध्य आशियामध्ये घोडा प्रथमतः माणसाळला गेला व मेसोपोटेमियामधील लोकांनी इ. स. पू. १७०० च्या सुमारास त्याचा लढाईत रथ ओढण्यासाठी उपयोग केल्याचे दिसते. स्वारीसाठी त्याचा उपयोग इ.स.पू. ९०० च्या सुमारास होऊ लागला.
वर्गीकरण : घोड्यांच्या जातींचे वर्गीकरण त्यांच्या कामाच्या स्वरूपावरून करण्यात आले आहे. स्वारीसाठी लागणारा घोडा चपळ, तरतरीत म्हणून अंगाने सडपातळ, सतेज, काटक व तुकतुकीत अंगकांतीचा असावा लागतो, तर वाहनास जुंपण्याचा थोडाफार चपळ पण चांगलाच ताकदवान असा असतो. शेतीच्या कामासाठी किंवा अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी मजबूत व जाडजूड अशा घोड्यांची जरूरी असतो. मग तो राकट, ओबडधोबड, जाड कातडीचा, अंगाने स्थूल असला तरी चालतो. स्थूलमानाने पुढील वर्गीकरण करतात. (१) जड वाहनास किंवा अवजड माल वाहतुकीसाठी स्थूलदेही. मुंबईत ट्रॅम ओढण्यासाठी पूर्वी वापरात असलेले घोडे या वर्गातील होते. (२) स्वारीसाठी—शर्यतीसाठी वापरले जाणारे. (३) हलक्या वाहनास उपयुक्त. टांगा-बग्गी यांसारख्या वाहनांस वापरले जाणारे. (४) हलक्या स्वारीसाठी. यात तट्टांचा समावेश करतात.
जगातील घोड्यांच्या सर्व जाती, अभिजाती (अस्सल जाती) व संकरित जाती यांची संख्या २५० च्या आसपास आहे.
भारतातील, भारतात आयात केलेल्या व इतर काही महत्त्वाच्या जातींची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
काठेवाडी : (काठी किंवा कच्छी). राजस्थानमध्ये आढळणारी भारतातील एक उत्कृष्ट जात. ह्या जातीच्या घडणीमध्ये स्थानिक जातीशिवाय अरबी जातीच्या घोड्याचा संबंध आहे. उन्हातान्हात व अतिथंडीत तग धरणारी, चपळ, १·२ ते १·५ मी. उंचीची ही तडफदार जात आहे. या जातीतील घोडे तांबूस किंवा करड्या रंगाचे अथवा त्यावर पांढरे ठिपके असलेले असतात. ह्या जातीच्या घोड्यांची निपज करण्यासाठी १८६० साली गुजरातमध्ये पालिताणा येथे एक केंद्र स्थापन करण्यात आले.
मारवाडी : जयपूर, जोधपूर व उदयपूरच्या आसपास आढळणारी ही जात आहे. ह्या जातीतील घोडे फिकट किंवा गडद तांबूस रंगाचे किंवा मळकट पांढऱ्या. रंगाचे असतात. ते काटक, मजबूत, देखणे असून १·४ ते १·५ मी. उंचीचे व सरासरी ३५० किग्रॅ. वजनाचे असतात. जलद स्वारीसाठी व शिकवल्यास सर्कशीतील कामासाठी ह्या जातीचे घोडे उपयुक्त आहेत.
मणिपुरी : ह्या जातीच्या घोड्यांची पैदास मणिपूर राज्यात होते. त्यांची उंची १·१ ते १·४ मी. असून त्यांचे सरासरी वजन ३०० किग्रॅ.च्या आसपास असते. देखणे व जलद स्वारीला उपयोगी असणारे हे घोडे घोड्यांच्या शर्यती व पोलो ह्या खेळासाठी उपयुक्त आहेत. तसेच लष्करामध्ये डोंगराळ प्रदेशात ओझे वाहण्यासाठी त्यांचा उपयोग करतात.
भूतानी : हिमालयाच्या पायथ्याशी पंजाबपासून भूतानपर्यंतच्या प्रदेशातील वन्य जमाती ह्या जातीच्या घोड्यांची पैदास करतात. बांधेसूद, मजबूत हाडापेराचे शरीर, दणकट पाठ, लांब केसांची आयाळ व शेपूट आणि भरदार पुठ्ठे असणारा तट्टूवजा हा घोडा उंचीला १·३ मी.च्या आसपास असतो. ह्या जातीचे घोडे खच्ची करण्याची प्रथा आहे. त्यांचा डोंगराळ प्रदेशातील स्वारीसाठी आणि वाहतुकीसाठी उपयोग करतात.
स्पिती : कांग्रा जिल्ह्यातील कुलू भागातील स्पिती खोऱ्यात ह्या जातीचे घोडे आढळतात. तट्टाच्या आकाराचे १·२ मी. उंचीचे हे घोडे डोंगराळ प्रदेशात स्वारीसाठी वापरतात. मजबूत बांध्याची, पायावर लांब केस असलेली ही तट्टे लडाखमध्ये कामासाठी आयात केली जातात. घोड्यांची पैदास करणे हे स्पिती खोऱ्यातील लोकांचे एक महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे.
चुमुरती : हिमाचल प्रदेशाच्या भागात आढळणारी स्पितीसारखीच ही एक घोड्याची जात आहे. तिबेटातील चुमुरती खोऱ्यातील ही जात असून आयर्लंडमधील ‘कोनेमारा’ जातीची तट्टे येथे आयात करण्यात आली आहेत व त्यांपासून संकरित प्रजननानेही जात सुधारण्याचे प्रयत्न चालू आहेत.
इंडियन थरोब्रेड : भारतात ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी घोडदळ सुधारण्यासाठी इंग्लिश थरोब्रेड जातीचे घोडे आयात केले. या घोड्यांच्या संयोगाने इंडियन थरोब्रेड ही जात निर्माण झाली आहे. याशिवाय इंग्लंड, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया येथूनही भारतात थरोब्रेड घोड्यांची आयात करण्यात आली.
यांशिवाय पंजाबी व महाराष्ट्रातील भिमथडी घोडे या स्वतंत्र जाती म्हणून मानतात. सतराव्या शतकात वेगवान भिमथडी घोड्यांच्या जोरावर मराठी सैन्याने अटकेपार मराठी साम्राज्याचे निशाण रोवले, असा इतिहासात उल्लेख आहे.
अरबस्तान, ब्रिटन, अमेरिका इ. परदेशांतील घोड्यांच्या विविध जातींची माहिती खाली दिली आहे.
स्थूलदेही जाती :शायर : ही मध्य इंग्लंडमधील स्थूल जात असून ती मुख्यत्वे शेती व अवजड माल वाहतुकीसाठी उपयुक्त असते. ती हाडापेराने मजबूत असते. मनगटाखाली मऊ केस, उंचीने सरासरी १·७३ मी. असून वजन ९०० किग्रॅ.च्या आसपास असते. रंग तपकिरी व बदामी असतो.
क्लाईड्सडेल : स्कॉटलंडमधील क्लाईड नदीकाठच्या प्रदेशातील ही जात शेतीच्या कामाला उपयुक्त आहे. तपकिरी व तांबूस रंगाचे हे घोडे १·६ ते १·७ मी. उंच असून त्यांचे सरासरी वजन ७७५ किग्रॅ. च्या आसपास असते.
यांशिवाय रोमन साम्राज्य कालीन ‘ग्रेट हॉर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थूलतम घोड्याचे वंशज असलेल्या पर्चेरॉन व सफोक ह्या स्थूल जाती प्रसिद्ध आहेत.
स्वारीसाठी : अरबी : ही मूळची अरब देशातील पण जगभर प्रसार पावलेली जगप्रसिद्ध चपळ जात आहे. बांधेसूद शरीर, रेखीव आकार, पाणीदार डोळे, डौलदार शेपटी ही ह्या जातीची वैशिष्ट्ये असून घोडा उंचीला १·५२ मी. असतो. सरासरी वजन ३८० ते ४५० किग्रॅ. असून चौखूर दौडीबद्दल ह्या जातीचे घोडे प्रसिद्ध आहेत. खडकाळ ओबडधोबड प्रदेशात घोडदौडीसाठी तसेच शर्यतीमध्ये ह्या घोड्यांचा जगभर उपयोग करतात. ईस्ट इंडिया कंपनीने सतराव्या शतकात द. भारतातील कुनिगल येथे ह्या जातीच्या घोड्यांच्या पैदाशीचे केंद्र सुरू केले. इंग्लिश थरोब्रेड व अरबी घोडे याच्या संयोगाने इंग्लिश अरब ही जात तयार झाली आहे. अरबी घोडे रंगाने करडे, तपकिरी किंवा तांबूस असतात. परंतु कधीही ठिपकेदार किंवा शुद्ध पांढरे असत नाहीत. ह्या घोड्यांची शुद्धता आणखी वाढविण्यासाठी अरब हॉर्स सोसायटी या ब्रिटनमधील संस्थेने अरबस्तानातून अरबी घोडे आणून शास्त्रीय दृष्ट्या प्रजनन करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
इंग्लिश थरोब्रेड : वेगाने धावण्यासाठी सुप्रसिद्ध म्हणून जगातील सर्व शर्यतींच्या मैदानांत प्रामुख्याने दिसून येणारी ही इंग्लंडमधील सर्वांत जुनी जात आहे. सोळाव्या शतकात दुसऱ्या चार्ल्स राजाने अरबी, स्पॅनिश व टर्किश घोड्यांच्या संयोगाने ही निर्माण केली आहे. पळण्याचा वेग, दमदारपणा, उंची इ. गुणांची परिश्रमपूर्वक जपणूक करून ही जात वाढविली गेली आहे. चौखूर धावत असताना हा घोडा इतर सर्व घोड्यांपेक्षा डौलदार दिसतो. उंची १·६ ते १·७ मी. असून सर्वसाधारण वजन ४५० ते ६५० किग्रॅ. असते. घोडे सामान्यपणे तांबूस रंगाचे असतात पण काही तपकिरी, काळ्या किंवा करड्या रंगाचेही असतात. सडपातळ मान, मध्यम आकाराचे कान, पाणीदार डोळे व तुकतुकीत पातळ त्वचा ही ह्या जातीचे वैशिष्ट्ये आहेत. जगातील बहुतेक शर्यतीच्या घोड्यांच्या जाती ह्या जातीच्या संयोगाने निर्माण झालेल्या आहेत.
स्टँडर्डब्रेड : इंग्लिश थरोब्रेड घोड्यांची आयात करून अमेरिकेतील स्थानिक जातीच्या संयोगाने ही जात अमेरिकेत निर्माण केली आहे. इंग्लिश थरोब्रेड घोड्याचे सर्व गुणधर्म ह्या जातीत दिसतात. उंची १·६ मी. असून वजन ४५० ते ५५० किग्रॅ. असते.
याच वर्गातील अमेरिकन सॅडलहॉर्स, मॉर्गन, टेनेसीवॉकिंग हॉर्स ह्या अमेरिकन जाती स्वारीसाठी चांगल्या आहेत.
हलक्या वाहनास उपयुक्त जाती : क्लीव्हलँड बे, यॉर्कशर कोच, हॅक्ने ह्या इंग्लंडमधील ह्यावर्गातील जाती. निरनिराळ्या आकारांच्या बग्ग्यांकरिता ह्या जातींचे घोडे वापरतात म्हणून त्यांना बग्गीचे घोडे असेही म्हणतात. क्लीव्हलँड बे तांबूस रंगाचे, यॉर्कशर कोच तांबूस व तपकिरी रंगाचे तर हॅक्ने तांबूस काळ्या रंगाचे असतात. ह्या जातीच्या घोड्यांची सर्वसाधारण उंची १·५ ते १·६ मी. असून चाल डौलदार असते.
हलक्या स्वारीसाठी : या जाती बहुधा तट्टाच्या आकाराच्या असून यातील शेटलँड, वेल्श, न्यू फॉरेस्ट, डार्टमूर इ. इंग्लंडमधील जाती प्रसिद्ध आहेत.
शेटलँड जातीची तट्टे साधारणतः १·१ मी. उंचीची असतात. ही तट्टे धीट, चपळ व काटक म्हणून प्रसिद्ध आहेत. वेल्श ही जात वेल्समधील स्थानिक तट्टांच्या जातीशी थरोब्रेड व अरबी घोड्यांच्या संयोगाने तयार झाली आहे.
वैशिष्ट्ये : काही घोडे ३० वर्षांपर्यंत जगत असले, तरी सर्वसाधारणपणे घोड्याची आयुमर्यादा १८ ते २० वर्षे धरतात. तीन ते सतरा वर्षे हे घोड्याचे उपयुक्त आयुष्य ठरते. पाळीव जनावरांत बुद्धीमध्ये याचा चौथा क्रमांक लागत असला. तरी त्याची स्मरणशक्ती चांगली असून परतीच्या प्रवासात घराचा रस्ता हुडकून काढण्यात तो मालकाला मागे टाकतो, शिवाय त्याच्या इमानीपणाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. घोड्यांच्या पैदास केंद्रात घोड्याचे वय १ जानेवारीपासून मोजण्याची प्रथा आहे. घोड्याच्या खुराचा शृंगी (केराटीन नावाच्या प्रथिनाचा बनलेला) भाग महिन्याला ८ मिमी. इतका वरून खाली वाढत असतो. त्यामुळे दीड-दोन महिन्यांनी तो छाटून पायाला नाल मारतात. घोड्याला मारण्याच्या लोखंडी नालाचा शोध चौथ्या शतकात लागला व पुढे अठराव्या शतकात त्यांचे अनेक प्रकार प्रचारात आले. घोड्याचा नाल बऱ्याच देशांत शुभ मानतात. घोडा दोन वर्षांचा झाल्यावर त्याला कामाला लावतात. पण शर्यतीच्या घोड्यांना मात्र एक वर्षानंतर शर्यतीत भाग घ्यावयास लावतात. घोड्याची शक्ती प्रमाण मानून त्यावर आधारलेले ⇨ अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) हे शक्तीचे एकक जेम्स वॉट यांनी प्रचारात आणले. जगातील एकंदर घोड्यांची संख्या ६·५ कोटींच्या घरात आहे. १९६६ साली भारतातील घोड्यांची संख्या ११,४८,००० होती. त्यांपैकी सर्वांत जास्त उत्तर प्रदेशात २,३०,००० होते, तर महाराष्ट्रात १,०१,००० होते.
प्रजनन : घोडी दोन वर्षांनंतर प्रजननयोग्य होते व ती वयाची वीस वर्षे होईपर्यंत प्रजननक्षम असते. ऋतुचक्र २१ दिवसांचे असून ऋतुकाल ३ ते ५ दिवसांचा असतो. ऋतुकाल संपण्यापूर्वी २४ ते ४८ तास गर्भधारणेस योग्य काळ असतो. गर्भावधी ३३६ ते ३४० दिवसांचा असतो. घोडी व्याल्यानंतर ४ ते ११ दिवसांत पुन्हा माजावर येते. शिंगरू ४ ते ६ महिने घोडीला पाजतात. घोडीच्या दुधात वसा (स्निग्धांश) प्रमाण कमी असून ते जवळजवळ स्त्रियांच्या दुधाएवढे असते. घोडीच्या दुधात अदमासे २% प्रथिने, १·८% वसा, ५·८% शर्करा व ०·४% लवणे व ९०·५% पाणी असते. ताजे असताना त्याचा क्वचितच वापर करतात परंतु आंबवून तयार होणारा ‘क्युमीस’ नावाचा पदार्थ वापरतात. क्युमीस नासत नाही व त्याला अल्कोहॉलासारखी चव व वास असतो. क्युमीस औषधी असून पोटदुखी, फुप्फुसांचा क्षय, पोटातील क्षत, आमांश, आंत्रज्वर (टायफॉइड) इ. आजारांत त्याचा वापर करतात.
बहुधा घोडी एका वेळी एकाच शिंगराला जन्म देते. क्वचित जुळे अगर तिळे होते. एका मोसमात वाजीचा (घोड्याचा) ४० ते ५० माद्यांशी संयोग करतात, जास्तीत जास्त ७० माद्यांकरिता उपयोग होऊ शकतो.
भारतात घोड्यांची पैदास अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु पैदाशीचे पद्धतशीर प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीने १७९५ मध्ये सुरू केले. पूर्वीच्या संस्थानिकांची घोड्यांची पैदाशीची खासगी केंद्रे होती, त्यांतील भोपाळ, मांजरी (पुणे), कुनिगल, हेस्सार घाट्टा आणि पालिताणा ही उल्लेखनीय होत. सध्या भारतात घोड्याच्या पैदाशीची ३६ केंद्रे असून त्यांतील बहुतेक पुणे व भोपाळ येथे आहेत. ह्या केंद्रांतून मुख्यत्वे शर्यतीच्या घोड्यांची पैदास चालू आहे. यांशिवाय भारत सरकारच्या संरक्षण खात्याची काही केंद्रे असून ती संरक्षण खात्याची गरज भागवितात. इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, यूगोस्लाव्हिया, अर्जेंटिना व ऑस्ट्रेलिया या देशांतून उत्तम जातीच्या घोड्यांची आयात करून ह्या केंद्रांत पैदाशीचे काम चालू आहे. नॅशनल हॉर्स ब्रीडिंग अँड शो सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था मुख्यत्वे शर्यतीच्या घोड्यांच्या पैदाशीच्या कार्याला मदत करते व घोड्यांची प्रदर्शने भरवते. महाराष्ट्रात धुळे व जळगाव जिल्ह्यांत घोड्यांचे नावाजलेले बाजार भरतात. शर्यतीच्या घोड्यांची मुंबई, बंगलोर आणि मद्रास येथे दरवर्षी लिलावाने विक्री करण्यात येते.
संगोपन व आहार : संतुलित आहार, स्वच्छता, जीवोपजीवींचा (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या, जीवांचा) प्रतिबंध, तबेल्यातील ऐसपैस जागा आणि योग्य रीतीने केलेली नालबंदी या घोड्याच्या संगोपनातील मूलभूत गरजा आहेत. घोडा शाकाहारी असून गवत हे त्याचे नैसर्गिक खाद्य आहे. तो गाय-बैलाप्रमाणे रवंथ करणारा प्राणी नसल्यामुळे त्याला चार कप्प्यांचे पोट नाही व त्यामुळे फार तंतुमय खाद्य तो पचवू शकत नाही. शिगारे व गाभण माद्या यांना नुसत्या गवतावर चरावयास सोडले, तरी भागते पण कामाला जुंपल्या जाणाऱ्या व स्वारीच्या घोड्यांना गवताबरोबर चंदी देतात त्यामुळे स्नायू बळकट होतात. पाश्चात्य देशांत ओट, बार्ली, मका, अळशी व सोयाबीन यांचा चंदीत समावेश करतात, तर भारतात हरभरा, कुळीथ व तूर यांचा उपयोग करतात. चंदी दिवसातून तीन वेळा देतात. गवताचा बराचसा भाग रात्री घालतात. घोड्याला चंदी देण्यापूर्वी पाणी पाजतात. कामाचे प्रमाण कमी झाले, तर चंदी कमी करून गवताचे प्रमाण वाढवतात [⟶ पशुखाद्य].
सर्वसाधारणपणे घोड्याचे नऊ दशांश आयुष्य तबेल्यात जाते. प्रत्येक घोड्यास सामान्यतः ३·५ X ३ मी. लांबीरुंदीचा तबेला असतो. तबेल्याला तीन बाजूंनी भिंती असून एक बाजू संपूर्ण उघडी असते व तिच्या विरुद्ध बाजूला योग्य मापाची जाळी मारलेली खिडकी असते. त्यामुळे हवा खेळती राहते. कार्यक्षम गटारे व योग्य उंचीवर आरामशीरपणे खाता येईल अशी गव्हाण ठेवतात.
घोड्याच्या बाबतीत खाद्याइतकेच खराऱ्याला महत्त्व आहे. त्वचेवरील केरकचरा, कोंडा, घामाचा मळ इ. काढण्यासाठी रोज दोनदा खरारा करतात. खराऱ्यामुळे त्वचेचे आरोग्य नीट राखले जाऊन त्वचा तुकतुकीत राहते. आयाळ व शेपटी पाण्याने धुतात. केस जास्त वाढले तर कापतात. अंगाखाली कोरड्या गवताचा बिछाना घालतात व तो रोज बदलतात. लीद रोजच्या रोज दूरवर हालवतात.
स्वारीकरिता आणि कामाकरिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या घोड्यांच्या खुरांचे शृंगी भाग झिजू नये म्हणून, तसेच बर्फाच्छादित प्रदेशात घोड्याला नाल मारणे आवश्यक असते. नाळ पोलादाचे बनवितात पण अलीकडे ॲल्युमिनियमाचे व प्लॅस्टिकचे नाल उपयोगात आणले जात आहेत.
गद्रे, य. त्र्यं.
रोग : इतर प्राण्यांप्रमाणे घोड्यालाही नैमित्तिक व संसर्गजन्य रोग होतात. घोड्यांचा उपयोग मुख्यत्वे स्वारीसाठी व वाहतुकीसाठी करतात त्यामुळे त्यांचे पाय सुदृढ असण्यावर भर राहतो. त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे पाय लचकणे, स्नायू दुखावणे, हाड मोडणे ही दुखणी नेहमी होत असतात व त्यावर शेकणे, मालिश करणे, हाडे सांधणे वगैरे उपाययोजना वेळीच करावी लागते. घोटा व मनगट या सांध्यांच्या वरच्या भागातील पायाचे हाड मोडले असेल, तर ते सांधणे कठीण जाते. त्याच्या खुरांच्या ठेवणीमुळे व कामानिमित्त त्याच्या पायांवर पडणाऱ्या ताणामुळे मनगटाखालील आणि घोट्याखालील हाडे, स्नायू व कंडरा (स्नायू हाडांना घट्ट बांधणारा तंतुमय पेशीसमूह) यांची दुखणी जास्त प्रमाणात होतात. अशा महत्त्वाच्या दुखण्यांची तसेच नैमित्तिक आजारांची माहिती खाली दिली आहे.
लॅमिनायटिस : घोड्याच्या खुरांच्या शृंगी आवरणाखाली असलेल्या संवेदनक्षम पटलाचा शोथ (दाहयुक्त सूज) म्हणजे लॅमिनायटिस. शृंगी आवरण व आतील पटल ह्यांमध्ये काहीच जागा नसल्याने सुजलेल्या पटलावर प्रत्येक पावलागणिक दाब पडल्यामुळे असह्य वेदना होतात. पायाच्या मानाने जास्त वजनाचे शरीर, प्रमाणाबाहेर प्रथिनयुक्त खाण्यामुळे होणारी ॲलर्जी, वार अडकल्यामुळे घोडीच्या शरीरात होणारा विषारी पदार्थांचा प्रादुर्भाव व खुराची वेडीवाकडी वाढ ही या रोगाची कारणे आहेत. घोड्याला खुरामध्ये असह्य वेदना होतात व त्याची बेचैन अवस्था त्याच्या हालचालीत प्रतीत होते. पुढील पायांच्या खुरास लॅमिनायटिस झाला असल्यास मागील पाय पोटाखाली घेऊन त्यावर वजन देऊन घोडा उभा राहतो. दुखरा खूर हाताला गरम लागतो व घोडा त्यावर भार देण्याचे टाळतो, त्यामुळे त्याची एकंदर हालचालच कमी होते. रोग जास्त वाढत राहिल्यास खुराच्या शृंगी आवरणाच्या व पायाच्या कातड्याच्या संयोगाच्या ठिकाणाहून अगर खुराच्या तळातून रक्त वा पूमिश्रित रक्त येते. अशा वेळी घोडा दगावण्याचा संभव अधिक असतो. घोड्याला ३९·५० ते ४१० से.पर्यंत ताप येतो व तदनुषंगाने जलद श्वासोच्छ्वास, डोळे लाल होणे, नाडी जलद चालणे इ. लक्षणे दिसतात. शरीराला कंप सुटतो व थबथबून घाम येतो. रोग एकाच वेळी बहुधा पुढच्या दोन्ही अगर मागच्या दोन्ही पायांना होतो. पुढच्या एका व मागच्या एका पायाला असा सहसा होत नाही. रोग बरा होण्यासाठी हिस्टामीनरोधी (सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या हिस्टामीन या द्रव्याच्या कार्याला रोध करणारी) औषधे किंवा ॲड्रीनोकॉर्टिकोट्रोफीन हे औषध उपयुक्त ठरते. शिवाय ताप व पायाची सूज कमी करण्याकरिता उपचार सुरू करतात. नाल काढून टाकून वाढलेला खूर तासून टाकतात व वाहत्या गार पाण्याच्या प्रवाहात घोड्यास उभे करतात. तसेच दुखऱ्या पायाच्या खुरावर आळीपाळीने थंड आणि गरम पाणी वीस मिनिटे मारतात. घोड्याला रेचक देतात व आहारातून प्रथिनयुक्त पदार्थ कमी करतात. रोग फार दिवस टिकून राहिल्यास पायाला दोलक नाल मारतात.
मस्सा : (थ्रश). ह्यारोगात घोड्याच्या खुराच्या तळव्यावरील शृंगी त्रिकोणी भागाच्या (पुतळीच्या) मध्य भेगेत घाण गेल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन शृंगीभागाचे विऱ्हासी परिवर्तन (ऱ्हास होत असताना या भागात होणारा बदल) होते व तो भाग कुजू लागतो. शृंगी पुतळीखालील संवेदनशील पुतळीमधील ग्रंथीचा श्लेष्मशोथ (स्रावयुक्त शोथ) होऊन भेगेतील शृंगी पदार्थ मऊ होतो व तेथून पांढरा घट्ट दुर्गंधीयुक्त पुवासारखा स्राव येत राहतो. हळूहळू रोग पसरत जाऊन खुराच्या शृंगीकवचाच्या आतील भागापर्यंत पोहोचतो व परिणामी कवच गळून पडण्याची शक्यता निर्माण होते. पुतळीचा कुजलेला भाग कापून काढून जंतुनाशक औषधी पाण्याने स्वच्छ धुवून सल्फा औषधे, आयडोफॉर्म अगर प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे लावतात.
भेंडी रोग : (ग्रीज). खुरालगतच्या १५ ते २० सेंमी. उंचीपर्यंतच्या कातड्याच्या चिरकारी (फार दिवस टिकणाऱ्या) स्वरूपाच्या शोथाला भेडी रोग म्हणतात. स्थूलदेही व पायावर दाट केस असलेल्या घोड्यांना चिखल-पाण्यातून एकसारखे चालवल्यामुळे हा रोग होतो. रोगाचे निश्चित कारण माहीत नसले, तरी प्रमाणाबाहेर प्रथिनयुक्त खाणे हे एक कारण असावे असे समजतात. रोगग्रस्त कातडीला सूज येते, खाज सुटते व त्वचाछिद्रांतून तेलकट, चिकट, घाण येणारा पांढरा स्राव येतो. स्रावामुळे केस एकमेकांना चिकटून चपट बसतात. अशा तऱ्हेच्या स्रावात सर्पिल जंतू (मळमूत्राच्या आकाराचे स्पायरिलम वंशातील जंतू) सापडले आहेत, पण ते रोगाचे कारण नसावेत असे मानतात. रोग वाढत जातो तसे ह्या भागावर चामफोड (चामखिळीसारखे फोड) येतात. रोगप्रतिबंधासाठी तबेल्यात स्वच्छता राखतात व घोड्यांना नियमितपणे खरारा-मालिश करण्याची काळजी घेतात. आहारातील प्रथिनाचे प्रमाण कमी करून पायाची कातडी स्वच्छ धुवून त्यावर टॅनिक अम्लयुक्त औषधे लावतात.
मॅलँडर्स व सॅलँडर्स : घोड्याच्या गुडघ्याचा सांधा आकुंचन पावल्यावर निर्माण होणाऱ्या बेचक्यातील कातडे जाड होऊन कोरडे पडत जाते व त्या ठिकाणी सुकलेल्या निर्जीव चर्मकोशिकांचा (कातड्यातील पेशींचा) भुरकट रंगाचा खरखरीत थर साचतो. कधीकधी सांध्याच्या आकुंचनाच्या क्रियेत कातडीवर ताण पडल्याने तिला भेगा पडतात व त्या ठिकाणी पुढे चट्टे बनतात. यांना मॅलँडर्स म्हणतात. मागील पायांच्या गुडघ्याच्या सांध्यावरील कातड्यावर हीच क्रिया घडली म्हणजे त्या चट्ट्यांना सॅलँडर्स म्हणतात. सुकलेल्या निर्जीव कोशिका घासून काढून टाकून त्याखालील कातडी गरम पाण्याने धुवून ती मऊ पडण्यासाठी पूतिरोधक (सूक्ष्मजंतूचा परिणाम न होऊ देणारे) मलम लावतात.
तणस : (स्ट्रिंगहॉल्ट). या विकारात चालताना अकस्मात मागील एक पाय अथवा दोन्ही थोडे जास्त झटका देऊन उचलले जातात. झटक्याचा वेग कमी अधिक असतो तसेच मधून मधून अगर प्रत्येक पावलागणिक ही क्रिया घडते. काही वेळा वर उचललेला पाय जोराने खाली येऊन खूर जमिनीवर आपटला जातो. मांडीचा सांधा रोगग्रस्त झाल्यामुळे, संधिवातामुळे किंवा पायाचे आकुंचन करणाऱ्या स्नायूंच्या तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) नियंत्रणामध्ये बिघाड झाल्यामुळे हा विकार उद्भवतो असे मानतात. तथापि रोगाचे निश्चित कारण अद्याप माहीत झालेले नाही. घोड्यास सरळ रेषेत दुडक्या चालीने चालविल्यास किंवा चढावर मागे रेटत चालविल्यास तणस झालेली चटकन लक्षात येते. मांडीच्या सांध्यात आयोडिनासारखी शोषक औषधे रोगाच्या सुरुवातीस टोचल्याने किंवा शस्त्रक्रिया करून गुडघ्याच्या खालील विशिष्ट कंडरेचा छेद करून रोग बरा होतो. तसेच विशिष्ट तऱ्हेची नालबंदी केल्यास रोगाचे परिणाम कमी होऊन फायदा होतो.
याशिवाय शर्यतीचे घोडे, टांगाबग्गीचे व स्वारीचे घोडे यांना कमी अधिक प्रमाणात चपळाइची कामे करावी लागत असल्यामुळे त्यांच्या पुढील पायांच्या कोपराखालील आणि मागील पायांच्या घोट्याखालील निरनिराळ्या हाडांना, कंडरांना व स्नायूंना दुखापती होत राहतात.
स्पॅव्हिन : घोट्याच्या सांध्यामध्ये लहान लहान हाडांचा समावेश होतो. सांधा दुखावल्यामुळे या हाडांवरील आवरणांना सूज येऊन त्या ठिकाणी कॅल्शियमाचे निक्षेपण (साचणे) होते. यामुळे सांध्याची हालचाल मर्यादित होऊन घोडा लंगडतो. मोठ्या पादास्थीच्या (घोट्याच्या सांध्याची हाडे व बोटाची हाडे यांमधील लांब हाडाच्या) घोट्याच्या सांध्याकडील टोकास सूज असेल, तर सांधा सुजलेला दिसतो. घोड्याला ८ ते १२ आठवड्यांची विश्रांती दिल्यास निक्षेपित कॅल्शियमामुळे हाडांची जोडणी होऊन घोडा लंगडण्याचा कमी होतो. क्षोभक मलमांचा उपयोग करून हीच क्रिया लवकर घडवून आणतात.
रिंगबोन : घोड्याच्या पादांगुलास्थींच्या (खुराच्या आत असलेल्या मधल्या बोटाच्या हाडांच्या) पहिल्या व दुसऱ्या सांध्यातील हाडांना सूज येऊन त्यांची वाढ होते. ही वाढ सांध्यातील सर्व बाजूंनी वलयाकार होते म्हणून त्याला रिंगबोन म्हणतात. सांध्यातील हाडांच्या घर्षणाने, संधिवातामुळे किंवा आनुवंशिकतेमुळे रिंगबोन होते. घोड्याला २ ते ४ आठवडे विश्रांती देऊन ग्रस्त भागावर रोज थंड पाणी मारले असता घोडा लंगडण्याचा थांबतो. काही वेळा शस्त्रक्रिया करून या भागातील मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या तंत्रिकेचा बारीक तुकडा काढून टाकतात म्हणजेही घोडा लंगडण्याचा थांबतो व कामाकरिता उपयोगी पडतो.
स्नायूंच्या व कंडरांच्या दुखापती ह्या ताणल्या गेल्यामुळे, लचकण्यामुळे किंवा पाय मुडपण्यामुळे होतात. स्नायूंना दाहयुक्त सूज येऊन दुखावलेला भाग हाताला गरम लागतो. चालताना क्लेश होतात. स्पर्श असह्य होतो आणि परिणामी घोडा लंगडतो. उपचार वेळेवर सुरू केले नाहीत, तर त्या ठिकाणी तंतुमय ऊतकाची (समान कार्य व रचना असलेल्या पेशींच्या समूहाची) वाढ होऊन लंगडेपणा कायमचा राहण्याचा धोका असतो.
ग्रस्त भागावर बर्फ चोळल्याने किंवा थंड पाणी मारल्याने सूज कमी होते. आयोडीन मलम किंवा जरूर पडल्यास क्षोभकारक मलम चोळल्याने झालेली इजा भरून येण्यास मदत होते.
पोटशूळ : ही व्याधी घोड्यामध्ये नेहमी दिसून येणारी व्याधी आहे. पोटशूळामध्ये तीव्र वेदना होतात. वेदना हळूहळू वाढत जातात व त्या असह्य होताच क्वचित थोडा वेळ थांबतात आणि तितक्याच प्रकर्षाने पुन्हा सुरू होतात. वेदनांचे कारण मोठे आतडे अन्नपदार्थांनी गच्च भरून जाणे किंवा त्यात वात साचणे हे आहे.
चरबट गवत खाणे, किडके, अर्धवट तुटलेले किंवा फार तीक्ष्ण दात, अशक्तता, थकवा, आतड्यातील अन्न सरकण्यामध्ये अडथळा ही याची कारणे आहेत.
अस्वस्थता, पुढच्या पायांनी जमीन उकरणे, पोटाला लाथा मारणे, गडबडा लोळणे इ. लक्षणे दिसतात.
पोटशूळाचे नक्की कारण शोधून काढून ते दूर करतात. घोडा कामाला लावला असल्यास मोकळा करतात. वेदनाशामक औषधे व प्रथमतः सौम्य रेचके देतात.
बरसाती : उष्ण कटिबंधातील प्रदेशांत घोड्याची मान, पाठ व चेहरा यांवर होणाऱ्या जखमा पावसाळ्यात हॅब्रोनेमा जातीच्या गोलकृमीमुळे दूषित होतात. तबेल्यातील माशीमध्ये (स्टोमोक्सिस कॅल्सिट्रॉन्स ) ह्या कृमीची वाढ पूर्ण होऊन ज्यावेळी माशी रक्त पिण्यासाठी जखमांवर बसते त्यावेळी हे कृमी माशीच्या तोंडावाटे बाहेर पडून जखमा दूषित करतात. जखमांमध्ये हायफोमायसीस डेसट्र्यूएन्स जातीचे कवकही (बुरशीसारखी हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीही) आढळते. काहींच्या मते हे कवकही बरसातीच्या जखमांचे कारण असावे. अशा दूषित जखमांमध्ये मोठ्या प्रमाणावर कणोतक (जखमांमध्ये नव्याने तयार होत असलेले कणासारखे पेशीसमूह) दिसून येते. जखमांच्या कडा वेड्यावाकड्या असून त्या चरत जाऊन पसरतात. जखमांच्या तळाशी मृतोतकाबरोबर (निर्जीव पेशी समूहाबरोबर) चुन्याचे बारीक कण आढळतात. मृतोतक व कणोतक वारंवार खरडून आणि योग्य औषधोपचार करूनही जखमा बऱ्या होत नाहीत, परंतु हिवाळ्यात मात्र त्या बऱ्या होऊ लागतात. माश्यांमुळे जखमा दूषित होत असल्यामुळे माश्यांचा नायनाट करण्यासाठी तबेल्यांची स्वच्छता व लीदीची योग्य विल्हेवाट हे प्रतिबंधक उपाय आहेत. अशा जखमा प्रामुख्याने पावसाळ्यातच दिसून येतात म्हणून हिंदी भाषेतील बरसात म्हणजे पाऊस या शब्दावरून बरसाती हे नाव पडले आहे.
गुच्छ ऊतक गुल्म : (बॉट्रिओमायकोसीस). खोगिर व त्याच्या सरंजामातील पट्टे घोड्याच्या कातड्यावर घासून होणाऱ्या खरचटल्यासारख्या जखमा बॉट्रिओमायसीस ईक्वाय नावाच्या रोगकारक कवकामुळे दूषित होतात व त्या ठिकाणी तंतुमय ऊतकाच्या गाठी तयार होऊ लागतात. गाठ प्रथमतः कठीण असते पण नंतर मऊ होऊन फुटते आणि तीतून घट्ट पू बाहेर येतो. पूवामध्ये खसखस किंवा राजगिऱ्याच्या आकाराचे असंख्य बारीक कण आढळतात. सूक्ष्मदर्शकाखाली हे कण तपासले असता त्यात रोगकारक कवक दिसून येते. गाठ फुटल्यामुळे होणारी जखम बरी होते, परंतु आसपासच्या भागावर पुन्हा गाठी तयार होऊन फुटतात व जखमा होतात. घोडा खच्ची करताना झालेली जखम कवक दूषित झाल्यास शुक्ररज्जूला (शुक्रवाहिनी व पुं-प्रजोत्पादक ग्रंथीच्या रक्तवाहिन्या, तंत्रिका, लसीका वाहिनी मिळून तयार झालेल्या दोरीसारख्या रचनेला) सूज येऊन अशाच गाठी होतात. या गाठी लहान असतानाच शस्त्रक्रिया करून काढणे हितकारक असते.
घोड्यांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांतील काही महत्त्वाच्या रोगांची माहिती खाली दिली आहे.
कंठपीडनरोग : (स्ट्रँगल्स). स्ट्रेप्टोकॉकस ईक्वाय या सूक्ष्मजंतूमुळे घोड्यांना होणारा हा तीव्र स्वरूपाचा संसर्गजन्य रोग आहे. जगातील सर्व भागांत हा रोग आढळतो. अलीकडे घोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे व उपचार योजनेमध्ये सुधारणा झाल्यामुळे एकंदर रोगाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. गाढव व खेचर यांनाही हा रोग होतो. सामान्यपणे लहान वयाच्या घोड्यामध्ये रोग जास्त प्रमाणात दिसून येतो. रोगजंतू निरोगी घोड्यांच्या घशामध्ये वास्तव्य करून असतातच, पण काही कारणांनी घोड्याचा अशक्तपणा वाढल्यास त्यांचा जोर होऊन रोगोद्भव होतो.
रोग परिपाक काल (रोगजंतू शरीरात शिरल्यापासून रोग लक्षणे दिसेपर्यंतचा काळ) चार ते आठ दिवसांचा आहे. घोड्याला एकाएकी ३९·५० से. ते ४०·५० से. पर्यंत ताप येऊन खाणे अजिबात बंद होणे, श्वासोच्छ्वास जलद होणे, ओला खोकला ही प्राथमिक लक्षणे दिसतात. नाकावाटे प्रथम पातळ व रंगहीन स्राव बऱ्याच प्रमाणात वाहू लागतो. हा स्राव लवकर घट्ट व पूवासारखा बनतो. घशाच्या तसेच आसपासच्या लसीका ग्रंथी (ऊतकातून रक्तात मिसळणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील ग्रंथिसदृश पुंजके) मोठ्या होतात. रोग बळावत असल्यास अनुकर्ण (जबड्याच्या उभ्या हाडाच्या मागे कानाच्या भोकाजवळ पसरलेली सर्वांत मोठी लाला ग्रंथी), अधोहनू (जबड्याच्या हाडाखालील लाला ग्रंथी) इ. आसपासच्या ग्रंथीही वाढतात व त्यांत गळवे होतात. घसा व कंठ सुजल्यामुळे आणि गळवांमुळे श्वासनालावर दाब पडल्यावर श्वासोच्छ्वासात अडथळा उत्पन्न झाल्यामुळे घरघर आवाज येतो. गळवे फुटून त्यांतून पिवळट पांढरा पू वाहू लागतो. चेहरा व पुढील पायावरील नजिकच्या लसीका वाहिन्या सुजतात. अप्रारूपी (असाधारण) स्वरूपात फुप्फुसावर गळवे होतात किंवा मेंदूपर्यंत रोग पसरल्यास पूयुक्त परिमस्तिष्क त्वर (मेंदूच्या आवरणाला सूज येऊन येणारा ताप) येऊन घोडा दगावण्याचा संभव असतो.
रोगग्रस्त घोड्याच्या नाकातील व गळवातील स्रावामुळे दूषित झालेले अन्नपाणी व इतर दूषित पदार्थांमुळे रोगप्रसार होण्यास मदत होते. सल्फा औषधे गुणकारी आहेत, परंतु पेनिसिलिनासारख्या प्रतिजैव औषधांची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) जास्त उपयुक्त ठरली आहेत. याबरोबरच गळवे फुटल्यामुळे होणाऱ्या जखमांवरही योग्य उपचार करणे आवश्यक असते. रोगप्रतिबंधक उपाय म्हणून विशिष्ट रक्तरस अगर रोगकारक जंतूंपासून बनविलेली लस यांचा चांगला उपयोग होतो.
एपिझूटिक लिंफँजिटिस : (साथीचा लसीका वाहिनी शोथ). घोड्याचा चिरकारी स्वरूपाचा हा एक संसर्गजन्य रोग असून यामध्ये लसीकावाहिनी व लसीका ग्रंथींचा शोथ होऊन लसीका वाहिन्यांच्या मार्गावर गळवे आणि व्रण होतात. गाढव आणि खेचर यांनाही हा रोग होतो. साथीमध्ये दहा ते पंधरा टक्के आजारी घोडे मरण पावतात.
आफ्रिका व आशियामध्ये हा रोग बऱ्याच प्रमाणावर दिसून येतो. दक्षिण आफ्रिकेतील युद्धानंतर परत आलेल्या सैन्यातील घोड्यांमध्ये हा रोग ग्रेट ब्रिटनमध्ये १९०२ मध्ये प्रथमतः आढळात आला. दुसऱ्या महायुद्धात आसाम व ब्रह्मदेश येथील सैन्यातील खेचरांमध्ये ह्या रोगाची साथ पसरली होती.
क्रिप्टोकॉकस फार्सिमिनोसस या यीस्ट जातीच्या कवकामुळे हा रोग होतो, असा शोध रिव्होल्टा यांनी १८७३ मध्ये लावला. या कवकामुळे दूषित झालेली दाणावैरण, तोबरा, लगाम व खोगिरातील इतर सरंजमाद्वारे रोगप्रसार होतो. खरचटलेल्या व अन्य जखमांतून रोग कवक शरीरात प्रवेश मिळविते. अनेक कारणांमुळे घोड्याला होणाऱ्या जखमा पायावर होत असल्यामुळे रोगाची सुरुवात बहुधा पायावरील लसीका वाहिन्यांच्या शोथामुळे होते. एक ते तीन महिन्यांच्या रोग परिपाक कालानंतर जखमेशेजारील लसीका वाहिन्यांना सूज येऊन त्या दोरीसारख्या दिसू लागतात. काही काळाने शेजारील लसीका ग्रंथींना सूज येऊन त्या वाढतात. दोरीसारख्या दिसणाऱ्या लसीका वाहिन्यांच्या मार्गावर कवडीपासून ते सुपारी एवढ्या आकाराच्या गाठी दिसू लागतात. पुष्कळदा गाठींची मालिकाच तयार होते. हळूहळू गाठी फुटून त्यांतून चिकट पिवळा घट्ट पू वाहू लागतो व त्या ठिकाणी कणोतक असलेल्या जखमा तयार होतात. जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. क्वचित त्या बऱ्या झाल्या तरी पुनःपुन्हा लसीका वाहिनीमार्गावर गाठी उत्पन्न होतात व त्या फुटून नव्या जखमा होतात. जखमांवर तोंड घासल्यामुळे घोड्याच्या नाकात कवकसंपर्क झाल्यामुळे तेथेही गाठी उद्भवतात. ग्लँडर्स या घोड्याच्या रोगातही नाकात अशाच गाठी व व्रण होत असतात म्हणून व्यवच्छेदक (अलगत्व निश्चित करणारे) निदान करणे अगत्याचे असते, कारण ग्लँडर्स हा रोग माणसांनाही होतो. सूक्ष्मदर्शकाने पुवाची तपासणी केल्यास त्यात रोगकवक आढळते.
रोगावर खात्रीलायक औषधोपचार नाही. रोगग्रस्त भाग शस्रक्रियेने काढून टाकून त्यावर सिल्व्हर नायट्रेट किंवा आयोडीन लावतात. या रोगावर प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे व ती टोचल्याने साथ संपेपर्यंत राहील इतपत प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) निर्माण होते.
घोड्याच्या पायाच्या खालच्या भागातील जखमा कॉरिनिबॅक्टिरियम ओव्हिस किंवा कॉ. स्यूडोट्यूबरक्युलोसीस आणि इतर काही पुयजनक (पू. उत्पन्न करणाऱ्या) सूक्ष्मजंतूंनी दूषित झाल्यामुळे होणारा व वर वर्णन केल्यासारखीच लक्षणे दिसणारा अलसरेटिव्ह लिंफँजिटिस नावाचा एक सौम्य संसर्गजन्य रोग आहे. या रोगात लसीका ग्रंथी रोगग्रस्त असत नाहीत तसेच गाठीतून वाहणारा पू घट्ट हिरवट रंगाचा असतो. रोगोपचार म्हणून पेनिसिलिनालारख्या प्रतिजैव औषधांची अंतःक्षेपणे किंवा जरूर तर जखमेतील जंतूपासून तयार केलेली आत्मलस वापरतात.
डूरीन : (अश्वासिकायजन्य रोग). ट्रिपॅनोसोमा ईक्विपर्डम नावाच्या परजीवीमुळे (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या जीवामुळे) होणारा घोड्यातील हा गुप्तरोग आहे. वाजीमधून मैथुनाच्या वेळी मादीत वा मादीतून वाजीत रोग संक्रामण (संसर्ग) होते. गाढव व खेचर यांनाही हा रोग होतो. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका व अमेरिकेच्या सुयंक्त संस्थानांतील दक्षिणेकडील काही राज्ये यांमध्ये रोग पशुस्थानिक (एखाद्या भागातील जनावरांमध्ये होणाऱ्या) स्वरूपात आढळतो. रोग परिपाक काल १ ते ४ आठवड्यांचा आहे. जननेंद्रियाची सूज हे मुख्य लक्षण दिसते. शिश्नमणिच्छद (शिस्नाग्रावरील त्वचा), शिश्न व वृषण (पुं-प्रजोत्पादक ग्रंथी) यांवर सूज येऊन ती पुढे छातीपर्यंत पसरते. मादीत योनिमुख व योनिमार्ग सुजतात व त्यांतून श्लेष्मल (बुळबुळीत) स्राव वाहतो. सूज कधीकधी विटपावरून (मूत्र व प्रजोत्पादक कोशिका यांच्या वाहिन्या व गुदांत्र यांच्यामधील ऊतकभित्तीवरून) कासेपर्यंत पोहोचते. रोगाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये कातड्याच्या खाली एखादे नाणे ठेवल्याप्रमाणे लहान लहान चट्टे हाताला लागतात. कधीकधी हे रुपयापेक्षा थोडे मोठे असू शकतात. ते काही तासांत आपोआप नाहीसे होतात आणि पुन्हा उद्भवतात. तिसऱ्या अवस्थेमध्ये पक्षाघाताची लक्षणे दिसू लागून चालताना झोक जातो. अशक्तता वाढते आणि मृत्यू ओढवतो. परिधि-रक्ताभिसरणातील (कातड्याच्या खालील लगतच्या रक्तवाहिन्यांतील) रक्तात रोगकारक परजीवी फारच थोड्या संख्येने असतात त्यामुळे रक्तशोषक माश्यांमार्फत रोगप्रसार अपवादात्मकच होतो. पूरकबंधी परीक्षेमुळे (रक्तरसाच्या विशिष्ट सूक्ष्मग्राही परीक्षेमुळे) रोगी घोडे ओळखणे सोपे जाते. अशा रोगग्रस्त घोड्यांपासून प्रजनन केले नाही म्हणूजे रोगनियंत्रण होते.
कुमरी : भारतात आसाम, बिहार, प. बंगाल आणि ओरिसा या राज्यांत घोड्यामध्ये हा रोग आढळतो. चीन, ब्रह्मदेश, मलेशिया, जपान व कोरिया या देशांतही हा आढळतो. घोड्यातील या साथीच्या रोगाचे कारण निश्चितपणे समजलेले नाही. तथापी व्हायरस अथवा शिस्टोसोम, ट्रिपॅनोसोम आणि नेमॅटोडा जातींचे परजीवी यांमुळे रोग होत असावा असा समज आहे. अलीकडील संशोधनामुळे नेमॅटोडामधील फायलेरिया या जातीच्या परजीवीमुळे रोग होत असावा–त्यातल्या त्यात सेटोरिया डिजिटाला या सामान्यपणे गुरामध्ये आढळणाऱ्या फायलेरिया जातीच्या सुतासारख्या सूक्ष्मकृमीमुळे हा रोग होतो–असे दिसून आले आहे. रोगप्रसार डासामार्फत होतो. रोगग्रस्त घोड्याला डास चावल्यामुळे रक्तातील हे कृमी डासाच्या शरीरात शिरतात व हा डास पुन्हा निरोगी घोड्याला चावला म्हणजे घोड्याच्या शरीरात टोचले जातात.
रोगाच्या तीव्र स्वरूपात घोडा तबेल्यात पडलेला व उठण्याचा प्रयत्न करूनही उठून उभे राहण्यास असमर्थ असलेला आढळतो. प्रयत्नाने उभा राहिलाच, तर त्याच्या कमरेतील ताकद अजिबात गेल्यासारखी दिसते. दुसऱ्याच प्रकारात घोडा प्रथमतः मागील पाय ओढत चालतो. काही काळाने कमरेच्या मागील भागाला झोले देत मागील पाय खरडत चालतो. उभा असतो तेव्हा मागील पाय फाकलेले आणि पुढील पाय पोटाखाली ओढलेले असतात. रोग वाढत राहिल्यास बरगड्या व कमरेचे मणके यांमध्ये अस्थिसुषिरता (हाडे सच्छिद्र होणे) उत्पन्न होते असे आढळले आहे. चालण्यातील अस्थिरता, बहुधा रोगकारक सुक्ष्म कृमींच्या मेंदू व मेरुरज्जूवरील (मेंदूच्या शेपटीच्या पुढच्या दोरीसारख्या मज्जा यंत्रणेच्या भागावरील) परिणामामुळे असावी असे मानतात.
विशिष्ट रोगोपचार उपलब्ध नाही. सर्वसाधारण कृमिनाशक कधीकधी उपयुक्त ठरते. विशेषतः कॅरिसाइड हे औषध उपयुक्त आहे असे दिसून आले आहे.
ईक्वाइन बबेसियासीस : (घोड्यांचा पित्तज्वर). बबेसिया कॅबॅली व नटाला ईक्वाय या प्रजीवांमुळे (एककोशिक आद्य जीवांमुळे, प्रोटोझोआंमुळे) घोड्यांमध्ये होणारा हा संक्रामक रोग असून कावीळ हे प्रमुख लक्षण असल्यामुळे त्याला पित्तज्वर हे नाव पडले आहे. रशिया, यूरोप, आफ्रिका, द. अमेरिका आणि आशियात हा रोग आढळतो. भारतात ब. कॅबॅलीमुळे होणारा रोग जास्त प्रमाणात आढळतो, तर द. आफ्रिका व द. अमेरिकेत न. ईक्वाय यामुळे रोग जास्त प्रमाणात होतो. गाढव व खेचर यांनाही हा रोग होतो.
तीव्र स्वरूपाच्या रोगाची सुरुवात ४२० से. पर्यंत चढणाऱ्या तापाने होते. ताप चढत असताना घोड्याच्या रक्तामध्ये रोगकारक प्रोटोझोआ मोठ्या प्रमाणात वाढत असतात. ताप दोन ते पाच दिवस राहतो. परंतु भूक न लागणे, अतिसार, कावीळ, रक्तारुण मूत्रता (मूत्रामध्ये रक्तातील हीमोग्लोबीन हे लाल रंगद्रव्य किंवा त्यापासून तयार होणारी रंगद्रव्ये असणे) इ. लक्षणे दिसून येतात व परिणामी रक्तक्षय होऊन घोडा एक आठवड्याच्या आत दगावतो. चिरकारी स्वरूपात कमी प्रमाणात ताप, सौम्य स्वरूपाची कावीळ, अशक्तता, खंगत जाणे, हळूहळू वाढणारा रक्तक्षय, पोटाखाली आणि मानेखाली शोफ (द्रवयुक्त सूज) ही लक्षणे दिसतात. बहुधा फुप्फुसशोथ किंवा इतर उपद्रव होऊन घोडा दहा ते पंधरा दिवसांत दगावतो, निरनिराळ्या प्रदेशांत रोगप्रसार गोचिड्यांच्या अनेक जातींमार्फत होतो त्यामुळे गोचिड्यांचा नाश करणे रोगप्रतिबंधाच्या उपायातील महत्त्वाचे अंग आहे. ब. कॅबॅली हा प्रजीव गोचिडीच्या अंड्यातून दुसऱ्या पिढीत जाऊ शकतो. त्यामुळे रोगनिर्मूलन कठीण होते. सूक्ष्मदर्शकाने रक्तपरीक्षा केल्यास रक्तातील तांबड्या कोशिकांत रोगकारक प्रजीव दिसून येतात त्यामुळे रोगनिदान होऊ शकते. ट्रिपॅनब्ल्यू हे औषध ब. कॅबॅलीमुळे झालेल्या रोगावर गुणकारी आहे. तर न. ईक्कायकरिता क्विनीन हायड्रोब्रोमाइड, फेनॅमिडीन ही औषधे उपयुक्त आहेत.
साऊथ आफ्रिकन हॉर्स सिकनेस : व्हायरसामुळे (अतिसूक्ष्म जीवांमुळे) घोड्यांना होणारा हा एक अतिसंहारक संक्रामक रोग आहे. गाढव व खेचर यांनाही हा होतो. रोगग्रहणशील घोड्यामध्ये मृत्यूचे प्रमाण ९० टक्के असते, खेचरामध्ये ५० टक्के तर गाढवामध्ये हे बरेच कमी आहे. दुसऱ्या महायुद्धापर्यंत हा रोग आफ्रिकेपुरताच मऱ्यादित होता. परंतु त्यानंतर रोगाच्या साथी मध्यपूर्वेत इराण, पाकिस्तान या देशांत पसरल्या तर १९६० मध्ये तुर्कस्तान, सायप्रस व भारत या देशांपर्यंत पोहोचल्या. दक्षिण आफ्रिकेत रोग पशुस्थानिक आहे व त्यावरूनच रोगाचे नाव पडले आहे. रोगकारक व्हायरसाचे अनेक विभेद (सध्या माहीत असलेले ४२) आहेत. त्यामुळे रोगप्रतिबंधक लस बहुशक्तिक (दोनापेक्षा अधिक व्हायरस अगर रोगकारक जंतूंचा समावेश असलेली) करणे आवश्यक ठरते. क्युलिकॉइड जातीचे डास आणि विशिष्ट प्रकारच्या चावणाऱ्या) माश्या रोगवाहक आहेत. रोगी घोड्याचे रक्तशोषण केल्यानंतर डासांच्या लाला ग्रंथीमध्ये व्हायरसाची वाढ होते. त्यानंतर निरोगी घोड्यांना चाबा घेतेवेळी ते घोड्याच्या शरीरात टोचले जातात. ज्या ऋतूमध्ये डास व माश्या जास्त प्रमाणात असतात त्यावेळी रोगद्भव जास्त प्रमाणात होतो.
रोगाचे तीन प्रकार संभवतात. सर्व प्रकारांत ४०० ते ४१० से. विरामी (पुनःपुन्हा येणारा) ज्वर हे लक्षण दिसून येते. तीव्र स्वरूपात ताप, कष्टमय श्वासोच्छ्वास, उबळ येऊन खोकला, नाकावाटे पुष्कळप्रमाणात पिवळट फेसयुक्त स्राव ही लक्षणे दिसतात. डोळे येऊन त्यांतून पाणी गळते. घोड्याला घाम येऊन तो अशक्त होतो व चालताना झोक जातो. पुढे श्वासोच्छ्वास करणे कठीण होते व ४ ते ५ दिवसांत घोडा मरतो.
कमी तीव्र स्वरूपात ताप हळूहळू चढत जातो, सबंध चेहऱ्याचा, विशेषतः डोळ्याच्या खोबणीवरील खाचा, डोळ्याच्या पापण्या व ओठ यांचा शोफ, परिहृदयशोफ (हृदयावरील आवरणाची द्रवयुक्त सूज), अस्वस्थता, पोटदुखी, फुप्फुसशोथ इ. लक्षणे दिसतात. अन्ननलिकेचा पक्षाघात झाल्यामुळे गिळता येत नाही व खाल्लेले अन्न नाकावाटे बाहेर येते. दोन ते तीन आठवड्यांत घोडा दगावतो.
तिसऱ्या प्रकारात रोग सौम्य स्वरूपात होतो. ताप व श्वासोच्छ्वासास त्रास इतकीच लक्षणे दिसतात. हा प्रकार बहुधा ज्या ठिकाणी रोग पशुस्थानिक स्वरूपात असतो तेथील घोड्यात दिसून येतो. लक्षणावरून रोगनिदान होऊ शकते परंतु पूरकबंधी परीक्षा करून ते निश्चित करता येते. विशिष्ट रोगोपचार उपलब्ध नाही. लक्षणात्मक उपचार करतात. रोगप्रतिबंधक लस उपलब्ध आहे. ही लस रोगकारक व्हायरसायच्या सात विभेदांपासून केलेली आहे. रोगवाहक कीटकांचा नाश हा खऱ्या अर्थाने प्रतिबंधक उपाय असला, तरी तो परिणामकारक रीतीने करता येणे जवळजवळ अशक्य आहे.
कुत्र्यामध्ये हा रोग झाल्याची एक नोंद आहे, यावरून निसर्गामध्ये कुत्रा रोगवाहक असण्याची शक्यता नजरेआड करता येत नाही.
भारतामध्ये ह्या रोगाची पहिली साथ १९६० साली आली. जयपूर येथील घोड्यांमध्ये प्रथमतः हा आजार दिसून आला. रोग संक्रामण पाकिस्तानातून आलेल्या घोड्यांमधून झाले. साथीचा फैलाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांत झाला. सर्व राज्यांत मिळून लागण झालेल्या १८,००० घोड्यांपैकी १६,००० घोडे दगावले. यांपैकी एकट्या महाराष्ट्रात ७,००० घोडे मरण पावले. रोगप्रतिबंधक लस आता भारतात तयार करतात.
ईक्वाइन एनसेफॅलोमायलिटीस : व्हायरसामुळे होणारा हा घोड्याचा संक्रामक रोग असून अर्धवट बेशुद्धी व पक्षाघात ही प्रमुख लक्षणे यात दिसतात. गाढव, खेचर, माणूस व माकड यांनाही हा रोग होतो. आवाज आणि स्पर्श सहन न होणे, अवस्वस्थता वाढत जाणे, आंधळेपणा आल्यासारखे अडखळत ठेचकाळत कोणीकडेही भटकणे, दात चावणे भिंतींना किंवा वाटेत येणाऱ्या कशालाही धडक देणे इ. अर्धवट बेशुद्धीची लक्षणे दिसतात. पुढे पक्षाघाताचा जोर वाढून मलमूत्र बंद होऊन मृत्यू ओढवतो. अलर्करोग (पिसाळ रोग), विषबाधा व मेंदूच्या इतर काही व्याधींमध्ये अशीच लक्षणे दिसून येत असल्यामुळे प्रयोगशाळेतील परीक्षा करून व्यवच्छेदक निदान करणे जरूर आहे. रोगकारक व्हायरसाचे दोन प्रकार असल्यामुळे दोन्हीही प्रकार अंतर्भूत असलेली बहुशक्तिक लस रोगप्रतिबंधासाठी वापरतात.
ईक्काइन इन्फ्ल्यूएंझा : इन्फ्ल्यूएंझा गटातील व्हायरसामुळे होणारा घोड्याच्या श्वसन तंत्राचा (श्वसन संस्थेचा) हा एक सौम्य सांसर्गिक रोग आहे. दोन ते तीन दिवसांच्या रोग परिपाककालानंतर ३८·५० ते ४१० से. पर्यंत ताप, कोरडा खोकला, उठबस करण्याला त्रास, नाकातून पाण्यासारखा स्राव वाहणे इ. लक्षणे दिसतात. शिंगरामध्ये रोगोद्भव झाल्यास फुप्फुसशोथ (फुप्फुसाची दाहयुक्त सूज–न्यूमोनिया) हमखास होऊन ते दगावते. लक्षणात्मक उपचार करतात. प्रतिजैव औषधेही उपयुक्त ठरतात. विशिष्ट प्रतिरक्षक रक्तरस दिल्यास रोग लवकर बरा होतो. प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.
कृमिजन्य विकार : इतर पाळीव जनावरांच्या मानाने घोड्यामध्ये कृमींचा त्रास पुष्कळच कमी प्रमाणात होतो. तथापि सूत्रकृमींपैकी ॲस्कॅरिस, स्ट्राँगायलिडी आणि ऑक्झूरिस या जातींचा काही कृमींमुळे घोड्यांना आजार होतात [⟶ जंत].
सर्वसाधारणपणे हे कृमी घोड्याच्या आतड्यात वास्तव्य करून पचन तंत्रात दोष निर्माण करतात. अपचन, अतिसार, रक्तक्षय यांसारखी लक्षणे दिसतात. ॲस्कॅरिस व स्ट्राँगायलिडी जातींच्या कृमींची अंडी लिदीतून बाहेर टाकली जातात त्यामुळे चराऊ राने दूषित होतात. अंड्यातून कृमीचे डिंभ (अळी अवस्था) बाहेर पडतात. चरताना गवताबरोबर ह्या अवस्थेतील कृमी घोड्याच्या पोटात व आतड्यात जातात. आतड्यातून स्थानांतर करून हे डिंभावस्थेतील कृमी शरीरात फिरून पुनश्च आतड्यात येतात व तेथे त्यांची पूर्ण वाढ होते. स्थानांतर करीत असताना ज्या ज्या भागातून ह्या डिंभावस्थेतील कृमींचा प्रवास होतो त्या भागात दोष निर्माण होतात व त्याप्रमाणे लक्षणे दिसतात. दूषित कुरणे काही महिने चरण्यासाठी बंद केल्यास अंड्यांचा नाश होतो व त्यामुळे कृमींचे जीवनचक्र खुंटते व परिणामी कृमींचा उपद्रव थांबतो. आजारी घोड्यांना सँटोनिनासारखी जंतनाशक औषधे देतात.
वर वर्णन केलेल्या रोगांव्यतिरिक्त घोड्यांना होणाऱ्या सांसर्गिक काळपुळी, सरा, धनुर्वात व शेंबा ह्या रोगांची माहिती त्या त्या रोगांच्या स्वतंत्र नोंदीमध्ये दिली आहे.
पहा : अश्वारोहण घोडदळ घोड्यांच्या शर्यती.
पंडित, र. वि.
संदर्भ : 1. Blood, D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1973.
2. CSIR, The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, Livestock supplement including
Poultry, New Delhi, 1970.
3. ICAR, Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.
4. Lull, R. S. Organic Evolution, New York, 1961 .
5. Merchant, I. A. An Outline of the Infectious Diseases of Domestic Animals, Minneapolis, 1953.
6. Miller, W. C. West, G. P., Eds., Black’s Veterinary Dictionary, London, 1962 .
“