घेवडा : भाजी किंवा उसळ याकरिता स्वयंपाकात वापरात असलेल्या आणि शिंबावंत (शेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या) गणातील [⟶ लेग्युमिनोजी] व पॅपिलिऑनेटी कुलातील काही वनस्पती किंवा त्यांच्या शेंगा व दाणे यांना सामान्यपणे घेवडा म्हणतात. शास्त्रीय दृष्ट्या घेवड्याच्या सर्व जाती आणि प्रकार एकाच वंशातील नव्हेत, तथापि पुढे दिलेले तीन प्रकार घेवडा या संज्ञेत समाविष्ट होतात. त्यांपैकी दोन फॅसिओलस  वंशातील आहेत. (१) ⇨ श्रावण घेवडा (फॅसिओलस व्हल्गॅरिस ) अथवा फ्रेंच बीन आणि (२) ⇨ डबल बीन  किंवा डफळ (फॅ. ल्युनॅटस ) (३) ⇨ चौधारी घेवडा (सोफोकार्पस टेट्रॅगोनोलोबस). यांशिवाय पुढील देशी प्रकार लागवडीत आहेत. यांचे वेल सर्वसाधारणपणे सारखेच असून त्यांची लागवड मर्यादित प्रमाणातच केली जाते. (अ) पेऱ्या अथवा बोट घेवडा : शेंगा सु. १० सेंमी. लांब व सरळ, दाणे सहा व फुले पांढरी (आ) मुगा अथवा गरवा घेवडा : शेंगा १०-१२ सेंमी. लांब व बाकदार, शेंगा व फुले लालसर (इ) पांढरा घेवडा : शेंगा सु. १० सेंमी. लांब व चपट्या, जाड सालीच्या व दाणे चपटे (ई) काळा घेवडा : शेंगा पांढऱ्या घेवड्यासारख्या पण काळसर हिरव्या व फुले जांभळट.

तूर, गवार, बावची, पावटा (मोठा व लहान), वाल, सोयाबीन, आबई इत्यादींना इंग्रजीत ‘बीन’ म्हणतात; पण मराठीतील घेवडा या संज्ञेत त्यांचा समावेश केलेला नाही.

भोसले, रा. जि.; गोखले, वा. पु.

घेवड्याचा एक प्रकार