डोलोमाइट : कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचे कार्बोनेट असलेल्या खनिजाचे तसेच या खनिजाच्या खडकाचे नाव. घोटाळा टाळण्यासाठी काही भूवैज्ञानिक खडकाला डोलोस्टोन म्हणतात. नुसत्या डोळ्यांनी पाहणी करून हा खडक व ⇨चुनखडक वेगळे ओळखता येत नाहीत, त्यासाठी रासायनिक परीक्षा करावी लागते. कॅल्साइट व डोलोमाइट या खनिजांचे मिश्रण असलेल्या खडकाला देखील डोलोमाइट म्हणतात. चुनखडकात थोड्या फार प्रमाणात तरी मॅग्नेशियम कार्बोनेट (MgCO3) असते, तर अगदी उच्च मॅग्नेशियमी डोलोमाइटात १० टक्क्यांपर्यंत कॅल्शियम कार्बोनेट (CaCO3) असते. आदर्श डोलोमाइटात ४५·७ टक्के MgCO3 व ५४·३ टक्के CaCO3 असते. सर्वसामान्य डोलोमाइटात CaCO3 व MgCO3 यांचे प्रमाण १ : १ असते. डोलोमाइटात जिप्सम, ॲनहायड्राइट, लोहाची सल्फाइडे व ऑक्साइडे, सेलेस्टाइट, ओपल, कॅल्सेडोनी, मॅग्नेसाइट, फ्ल्युओराइट, कार्बनी पदार्थ यांपैकी मलद्रव्ये असू शकतात.

डोलोमाईटाचे स्फटिक

डोलोमाइट खनिज : हे षट्‌कोणी, समांतरषट्फलकीय असते. बहुतेक स्फटिक समांतरषट्फलकाकार (आकृती पहा) तर कधीकधी स्फटिकांचे सुंदर समुच्च्य असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. संपुंजित व भरड किंवा सूक्ष्मकणी स्तंभाकार किंवा संहत स्वरूपातही ते आढळते

[⟶ खनिजविज्ञान]. पाटन (1011) उत्कृष कधीकधी (0221) ला समांतर विभाजनतले असतात [⟶ पाटन]. कठिनता ३·५–४. वि. गु. २·८५. चमक काचेसारखी. रंगपांढरा वा पिवळसर, कित्येकदा रंगहीन, क्वचित इतर रंगांच्या छटा. दुधी काचेसारखे पारभासी ते पारदर्शक. रा. सं. CaMg (CO3)2. कधीकधी मॅग्नेशियमाच्या जागी अल्पसे मँगॅनीज, कोबाल्ट किंवा जस्त आणि कॅल्शियमाच्या जागी थोडेसे शिसे आलेले असते. मॅग्नेशियमाचे फेरस लोहाने प्रतिष्ठापन होऊन अँकेराइट तयार होते.

डोलोमाइट उच्चतापसह (न वितळता उच्च तापमान सहन करू शकणारे) असून खूप तापविल्यावर क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे) होते. थंड व विरल हायड्रोक्लोरिक अम्लात याचे मोठे तुकडे अगदी हळूहळू व चूर्ण सापेक्षतः वेगाने विरघळते, गरम हायड्रोक्लोरिक अम्लात मोठे तुकडेही विरघळतात. डोलोमाइटाचा आढळ चुनखडकाप्रमाणेच डोलोमाइटी चुनखडक व डोलोमाइट या स्वरूपांत आणि संगमरवराबरोबर डोलोमाइटी संगमरवर अशा स्वरूपात असतो. खडकाच्या स्वरूपातील डोलोमाइट सामान्यतः द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी तयार झालेले) असते. खनिज शिरांच्या स्वरूपातही ते आढळते.

लोखंड तयार करण्याच्या भट्ट्यांत वापरण्यात येणाऱ्या उच्चतापसह अस्तराकरिता मॅग्नेशिया (मॅग्नेशियम ऑक्साइड) मिळविण्यासाठी मुख्यत्वे डोलोमाइट वापरतात चुनखडक या कामी निरुपयोगी असतो. याशिवाय मॅग्नेशियाचे उच्च प्रमाण असलेला चुना व काही प्रकारची सिमेंटे तयार करण्यासाठी लोखंड, पोलाद लोखंडाच्या मिश्रधातू तयार करताना अभिवाह (धातूतील अशुद्ध द्रव्यांशी संयोग पावून वितळणारी मळी तयार होण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) म्हणून डोलोमाइट वापरतात. चुनखडक ज्या कार्यांकरिता वापरण्यात येतो अशा अनेक कार्यांसाठी डोलोमाइटही वापरण्यात येते.

डोलोमाइट खडक : बहुतेक मॅग्नेशियमी चुनखडक, डोलोमाइटी चुनखडक आणि डोलोस्टोन हे चुनखडकातील कॅल्शियमच्या जागी मॅग्नेशियमाची प्रतिष्ठापना होऊन तयार होतात. काही लहान निक्षेप (राशी) दोन्ही कार्बोनेटांचे एकाच वेळी अवक्षेपण होऊन (न विरघळणारा साका तयार होऊन) तयार होतात. बहुतेक डोलोमाइटी खडक इव्हॅपोराइटांप्रमाणे अतिलवणी पाण्यापासून बाष्पीभवनाने तयार झालेले आहेत. मृदानिर्मितीच्या प्रक्रियेतही काही डोलोमाइट तयार होतात. अगोदर अस्तित्वात असणाऱ्या डोलोमाइटाचे सूक्ष्मजंतूंच्या क्रियेने विघटन (रेणूचे तुकडे होणे) आणि विद्रावण (विरघळण्याची क्रिया) होते व या विद्रावातून डोलोमाइटाचे पुन्हा अवक्षेपण होते. सागरांमध्ये अतिलवणी पाणी किनाऱ्याकडील उथळ भागात केशिकीय म्हणजे सूक्ष्म नलिकांसारख्या भेगांद्वारे होणाऱ्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेने वा काही परिस्थितीत पुनरभिवहनामुळे म्हणजे अभिवहन होऊन तयार होते. पुनरभिवहनामध्ये सिंधुतडाग (नैसर्गिक बंधाऱ्याने अलग झालेली समुद्राची उथळ शाखा) किंवा आंतरापर्वतीय यासारख्या मयार्दित भागातील पाण्यातील डोलोमाइटाचे प्रमाण बाष्पीभवनाने वाढते. हे लवणी जड पाणी खाली झिरपत जाऊन खालच्या अवसादांचे (गाळांचे) डोलोमाइटीभवन होते. खोल निक्षेपात तयार होणारे डोलोमाइट खाऱ्या भूमिजलापासून तयार होते. (१) सहजात (चुनखडकाच्या बरोबरच तयार झालेल्या) डोलोमाइटाचे पट्टे सागरी व बिनसागरी इव्हॅपोराइटांच्या व चुनखडकांच्या थरांत आढळतात. काही सहजात डोलोमाइट जमिनीवर तयार झालेल्या अवसादाच्या थरात आढळतात. ते मृदेचे किंवा कॅल्शियमी खडकाचे अपघटन होऊन (तुकडे होऊन) तयार झालेले असतात. (२) डबरी डोलोमाइट आधीच्या डोलोमाइटी अवसादातून आलेले असतात. (३) परिजनाने तयार होणारे डोलोमाइट चुनखडकाचा गाळ संहत होताना वा संहत झाल्यावर त्याचे प्रतिष्ठापन होऊन तयार होतात. (४) चुनखडकाचे निक्षेपण झाल्यावर बराच काळ लोटल्यावर त्यांचे प्रतिष्ठापन होऊन पश्चजात डोलोमाइट तयार होतात. या सर्वांच्या उलट विडोलोमाइटीभवनाच्या क्रियेने डोलोमाइटाचे कधीकधी चुनखडकात रूपांतर होते.

आगस्ते, र. पां.