डोव्हर–२ : अमेरिकेच्या डेलावेअर राज्याची राजधानी. विल्मिंग्टनच्या दक्षिणेस ६५ किमी. अंतरावर हे शहर सेंट जॉन्स (डोव्हर) नदीच्या तीरावर वसले आहे. लोकसंख्या १७,४८८ (१९७०). याची स्थापना १७१७ मध्ये झाली असून इंग्लंडमधील याच नावाच्या शहरावरून यास नाव दिले. याच्या सुपीक परिसरात मोठमोठ्या फळबागा आहेत. फळे डबाबंद करणे, चीज तयार करणे, रबरी वस्तू, रंग, होजिअरी वगैरे उद्योगधंदे आणि कारखाने येथे आहेत. डोव्हर हे वायुदलाच्या वाहुतुकीचे प्रमुख केंद्र आहे. निग्रो लोकांकरिता सरकारी महाविद्यालय, बालरक्षागृह ह्या शैक्षणिक संस्था आहेत. येथे दरवर्षी मे महिन्यात ‘ओल्ड डोव्हर डेज’ नावाचा उत्सव भरतो.
लिमये, दि. ह.