डोव्हर–१ : ब्रिटनचे डोव्हर सामुद्रधुनीवरील व इंग्लिश खाडीवरील महत्त्वाचे ऐतिहासिक बंदर. लोकसंख्या ३४,१६० (१९७३). हे लंडनच्या पूर्व आग्नेयीस ११२ किमी. असून फ्रान्सला सर्वांत जवळ आहे. डोव्हर–कॅले अंतर फक्त ३५·५ किमी. आहे. बंदराचे क्षेत्र २४० हे. असून ते धक्के बांधून सुरक्षित केले आहे. येथून कॅले, ऑस्टेंट व डंकर्ककडे सतत वाहतूक चालू असते. हे ग्रेट ब्रिटनचे प्रवासी वाहतुकीचे एक प्रमुख बंदर आहे. शहर खडूच्या उंच पांढऱ्या तटबंद कड्यांच्या पायथ्याशी वसलेले असून गावातून छोटी डोव्हर नदी जाते. समुद्र सपाटीपासून ११४ मी. उंचीवर असलेल्या येथील किल्ल्यावरून स्वच्छ वातावरणात फ्रान्सचा किनारा स्पष्ट दिसतो.

रोमनपूर्व काळापासून येथे डूब्रस ही वसाहत होती. येथील चौथ्या शतकातील किल्ल्यासाठी अनेक लढाया झाल्या. १०६६ मध्ये नॉर्मनांनी जिंकल्यावर डोव्हरची भरभराट झाली. अकराव्या शतकात इंग्लंडच्या आग्नेय किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या ‘सिंक’ (पाच) बंदरांत डोव्हर प्रमुख होते. १२१६ मध्ये फ्रेंचांपासून किल्ल्याचे रक्षण करणाऱ्या ह्यूबर्ट डी बर्गने सर्व देशांच्या यात्रेकरूंसाठी बांधलेला मेसन ड्यू हॉल, रोमन व सॅक्सन काळातील किल्ले, सेंट मेरी, ट्रिनिटी वगैरे चर्च, रोमन दीपगृह इ. येथील प्राचीन अवशेष आहेत.

पहिल्या महायुद्धात डोव्हरला महत्त्वाचा आरमारी तळ होता. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी बाँबवर्षावाने आणि फ्रेंच किनाऱ्यावरून तोफगोळ्यांनी डोव्हरचे खूप नुकसान केले. त्या वेळी डोंगरातील गुहा व बोगदे ही लोकांची आश्रयेस्थाने होती. सुप्रसिद्ध ‘डंकर्क यशस्वी माघारी’ च्या वेळी डोव्हर हे ब्रिटनचे मुख्य बंदर होते.

येथे कागद, अभियांत्रिकी, रसायने, काँक्रीट, आटा इत्यादींचेही उद्योग असून येथून जवळच पश्चिमेला शेक्सपिअर कडा आहे. तेथे १८२२ मध्ये प्रथम केंटमधील कोळसा सापडला. येथे १८७१ मध्ये स्थापन झालेले डोव्हर कॉलेज असून हे एक विश्रामस्थानही आहे.

कांबळे, य. रा.