डोंगरी युद्धतंत्र : युद्धतंत्राचा एक प्रकार. डोंगराळ प्रदेशातील विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे तेथील युद्धाचे स्वरूप व साधने वेगळी असतात. सामान्यतः समुद्रसपाटीपासून ३०० मी. हून उंच असलेल्या दुर्गम प्रदेशाची काही वैशिष्ट्ये आढळतात. उदा., कडेकपाऱ्या, दरडी, शिखरे, माथ्यावरील लहानमोठी सपाट जागा, नद्यानाल्यांची वळणे, दऱ्याखोऱ्यांतून जाणारे रस्ते, खिंडीबोगदे, पावसाचे जादा प्रमाण, कमी तपमान, नद्या-नाल्यांना येणारे पूर, ढग, धुके, सोसाट्याचा वारा, जंगले, पाण्याची दुर्भिक्षता, डोंगरमाथ्यावर होणारा उन्हाचा ताप, विरल हवा आणि त्यामुळे श्वासोच्छ्‌वासास होणारा त्रास इत्यादी. डोंगरी प्रदेशात लोकवस्तीही तुरळक असते व दळणवळणाची साधने अपुरी असतात. डोंगरामुळे संदेश-दळणवळण बिनभरवशाचे असते. वारा, ढग व धुके यांमुळे विमाने व हेलिकॉप्टर यांच्या वापरावर मर्यादा पडतात. पहाडातील हालचाली चढउताराच्या, कष्टमय, वेळखाऊ व धोक्याच्या असतात. पक्के रस्ते, रुंद वाटा व विस्तृत मैदाने यांच्या अभावामुळे मोठ्या सैन्यानिशी हालचाली करणे व विस्तृत आघाडीवर लढणे शक्य नसते. पहाडी प्रदेशात लहान लहान टोळ्या करूनच लढावे लागते. त्यामुळे युद्धविषयक कारवाईत सहकार्य व समन्वय साधणे अवघड ठरते. जागोजागी जोराने वाहणाऱ्या नद्या-नाल्यांचे अडथळे, त्यांच्या काठावरील सुलभ उतारांचा अभाव यांमुळे तात्पुरते पूल बांधणे, पाऊस व बर्फवृष्टीमुळे कडे कोसळून बंद पडलेले रसदमार्ग पुन्हा चालू करणे, नव्या वाटा व रस्ते बांधणे इ. तांत्रिक-अभियांत्रिकी कामे पार पाडावी लागतात. पहाडातील वाहतुकीसाठी खेचरे व पहाडी तट्टे, तसेच चटकान उंच चढू शकणारी हलकी विमाने व हेलिकॉप्टर्स यांसारख्या वाहतूक साधनांची सिद्धता करावी लागते. बर्फमय प्रदेशात सैन्यासाठी उबदार कपडेलत्ते, विरळ हवेत अन्न शिजविण्यासाठी खास उपकरणे, बर्फावरून परावृत्त होणाऱ्या सूर्यकिरणांची तिरीप लागू नये म्हणून रंगीत शीतल काचांचे चष्मे, नापीक प्रदेशात वापरण्यासाठी टिकावू खाद्यवस्तूंचा पुरवठा, तसेच उंच डोंगर पार करू शकणारा विशिष्ट प्रकारचा दारूगोळा व तो मारणाऱ्या पहाडी उखळी तोफा, ज्वालाक्षेपक, रॉकेट, अशांसारख्या अनेक प्रकारच्या साधनसामग्रीची तयारी डोंगरी युद्धासाठी करावी लागते. सैनिकांना पहाडी युद्ध करण्याचे खास प्रशिक्षण द्यावे लागते.

युद्धशास्त्राची मूलतत्त्वेच या डोंगरी युद्धतंत्राला लागू पडतात परंतु त्यात लवचिकता, प्रशासन कौशल्य व सैन्यबळाचा मितव्यय या तत्त्वांना विशेष महत्त्व आहे. डोंगरी युद्धात आक्रमण किंवा संरक्षण यांसाठी सैन्यसामग्रीबळ अपुरेच वाटते. त्यामुळे आक्रमणापेक्षा बचावात्मक भूमिका घेतल्यास युद्ध फायदेशीर ठरते. दूरगामी युद्धनीतीच्या दृष्टीने दऱ्याखोरी कब्जात आणणे, तर रणतंत्राच्या दृष्टीने डोंगरमाथा वा शिखरे जिंकणे आवश्यक असते. डोंगरमाथ्यावरून टेहळणी, बचाव व हल्ले करणे फायद्याचे असते. सामान्यतः घाट, खिंडी, बोगदे, डोंगरावरील सपाट जागा येथेच प्रामुख्याने डोंगरी लढाया होतात. अपुऱ्या व असमाधानकारक दळणवळणामुळे सैन्याचे विभाजन करावे लागते. सैन्याला एकसंध आघाडी उभारणे किंवा कूच करणे शक्य नसते. योग्य नियंत्रण व नेतृत्व यांची डोंगरी युद्धात कसोटी लागते. विमानातून रसद टाकण्यासाठी सपाट जागा थोड्या असल्यामुळे रसदपुरवठा बिनभरवशाचा व अपुरा असतो. तोफखान्याच्या तळासाठी सपाट आणि मोक्याच्या जागा फारच कमी आढळतात. डोंगराच्या पोटात मोर्चे उभारून घाट, दऱ्याखोरी वा रस्ते यांवर गोळामारी करणे सोपे असते. अशा तऱ्हेच्या मोर्च्यांना उद्ध्वस्त करण्यास भारी किंमत द्यावी लागते. यासाठी रात्रीच्या कारवायांवर भर देणे भाग पडते. ⇨ छत्रीधारी सैन्य, छोटे व हलके रणगाडे आणि चिलखती गाड्या वापरल्यास सैन्य हानी कमी होऊ शकते. भारतात खास डोंगरी सैन्याची दले आहेत. जर्मनीनेसुद्धा दुसऱ्या महायुद्धात अशी अल्पाइन सेनादले वापरली. आल्प्स पर्वताच्या संरक्षणामुळेच स्वित्झर्लंड आपले स्वातंत्र्य आतापर्यंत टिकवू शकले आहे.

 इ. स. पू. ४८० मध्ये ग्रीक व इराणी सैन्यांत ग्रीसमध्ये थर्मापिलीच्या खिंडीत युद्ध होऊन ग्रीकांची वाताहत झाली. रोमन सेनापती फेबिअस मॅक्सिमस याने ख्रि. पू. तिसऱ्या शतकात इटलीत डोंगरी किल्ल्याच्या साहाय्याने ⇨ हॅनिबलच्या सैन्याला बेजार केले. फेबिअसचे रणतंत्र यासाठी प्रसिद्ध आहे. ख्रि. पू. चौथ्या शतकात पार्थियन टोळ्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात अलेक्झांडरला बराच त्रास दिला. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजीने सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात मोगलांविरुद्ध ⇨ गनिमी युद्धतंत्राचा वापर करून स्वराज्याची स्थापना केली. हिंदुस्थानवरील ब्रिटिश अमदानीत वायव्य सरहद्दीच्या डोंगराळ मुलखात पठाणांनी वरचढ ब्रिटिश सैन्याशी वरचेवर लढाया केल्या होत्या. १९४७–४८ मध्ये काश्मीरच्या डोंगरी प्रदेशात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याशी लढा देऊन विजय प्राप्त केला. १९५८–७५ या काळात व्हिएटनामच्या जनतेने व सैन्याने व्हिएटनाममधील जंगली व डोंगरी प्रदेशात दक्षिण व्हिएटनाम व अमेरिका यांच्या सैन्याशी लढा दिला व शेवटी विजय संपादन केला. अल्जीरिया (१९५२–  ) व यूगोस्लाव्हिया (दुसरे महायुद्ध) येथील सशस्त्र क्रांतिकारकांनी डोंगराच्या आश्रयानेच अनुक्रमे फ्रेंच व जर्मन सैन्यांचा पराभव केला. गनिमी युद्धासाठी डोंगरी प्रदेश फार सोयीस्कर असतो. चिनी साम्यवादी सैन्याने डोंगराळ मुलखात सुरुवातीस तळ स्थापून जपानी व चँग कै-शेकच्या राष्ट्रीय सैन्याशी लढा दिला. डोंगरी युद्धे मैदानी युद्धांइतकीच प्राचीन आहेत. त्यांच्या मूलभूत तत्त्वांमध्ये काहीच बदल झालेला दिसत नाही परंतु रणसामग्रीतील बदलामुळे मात्र त्यांच्या तंत्रामध्ये बदल झालेला आढळून येतो.

दीक्षित, हे. वि.