डेलब्ऱ्यूक मॅक्स : (४ सप्टेंबर १९०६–    ). अमेरिकन जीववैज्ञानिक. सूक्ष्मजंतूंतील व्हायरसासंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म जर्मनीमध्ये बर्लिन येथे झाला. त्यांनी गटिंगेन विद्यापीठाची सैद्धांतिक भौतिकी विषयाची पीएच्.डी. पदवी १९३० मध्ये मिळविल्यानंतर दोन वर्षे कोपनहेगन आणि झुरिक येथे रॉकफेलर फाऊंडेशन फेलो म्हणून काम केले. डेन्मार्कमधील वास्तव्यात नील्स बोर या शास्त्रज्ञांच्या प्रेरणेमुळे जीवविज्ञानाच्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. जर्मनीत परतल्यावर १९३२–३७ पर्यंत त्यांनी रसायनशास्त्राच्या कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये मदतनीस म्हणून नोकरी केली. भौतिकी व जीवविज्ञान या दोन्ही शास्त्रांशी संबंधित असा अभ्यास करण्यास सोपे जावे हा त्यामागील हेतू होता. यानंतर पुन्हा रॉकफेलर फाऊंडेशन फेलो म्हणून दोन वर्षे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये त्यांनी काम केले. पुढे १९४७ सालापर्यंत ते व्हँडर्बिल्ट विद्यापीठात भौतिकी विषयाचे शिक्षक होते. त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूटमध्ये जीवविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

डेलब्ऱ्यूक यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे सूक्ष्मजंतुभक्षींसंबंधीचे (सूक्ष्मजंतूंमध्ये शिरून त्यांचा नाश घडविणाऱ्या कारकांसंबंधीचे हे व्हायरस असतात) होय. आतापर्यंत सूक्ष्मजंतुभक्षी व्हायरस सूक्ष्मजंतूंमध्ये शिरल्यावर त्यांचे विभाजन होऊन व्हायरसांच्या पुढील पिढ्या तयार होतात जंतूबाहेर ते होत नाही, हे माहित होते. विभाजन होताना उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांमध्ये एकाएकी निर्माण होणारे बदल) होऊन व्हायरसांचे निराळे प्रकार निर्माण होतात, हेही माहीत होते. पण व्हायरसाचे विभाजन कसे होते, याविषयी माहिती नव्हती. एका प्रयोगात सूक्ष्मजंतूंमध्ये दोन जातींचे व्हायरस टोचण्यात आल्यावर व्हायरसाच्या पुढील पिढीमध्ये दोन्ही व्हायरसांचे गुणधर्म असलेली व्हायरसांची प्रजा निर्माण झाली. याचा अर्थ डेलब्ऱ्यूक व त्यांचे सहकारी डब्ल्यू. टी. बेली यांनी असा लावला की, मूळच्या दोन व्हायरसांमध्ये जननिक घटकांची देवघेव होऊन ही तिसरीच व्हायरसाची जात तयार झाली. दोन व्यक्तींच्या मीलनापासून लैंगिक प्रजोत्पादन होते तसाच काहीसा हा प्रकार असावा, असे त्यांनी प्रतिपादिले. हे कसे घडून येते याबद्दलचे स्पष्टीकरण  डेलब्ऱ्यूक व एन्. व्हिसकोंटी यांनी १९५३ मध्ये मांडले आणि ते व्हिसकोंटी-डेलव्ऱ्यूक सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे. डेलब्ऱ्यूक व अमेरिकन जीववैज्ञानिक एस्. ई. लूर्या यांनी सूक्ष्मजंतूंच्या उत्परिवर्तनाचे अस्तित्व दर्शविणारी आणि या उत्परिवर्तनांची गती मोजण्यास उपयुक्त ठरणारी एक कसोटी शोधून काढली. यातील गणितीय विश्लेषण डेलब्ऱ्यूक यांनी केलेले होते.

अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९४९ मध्ये डेलब्ऱ्यूक यांची निवड झाली व १९६५ मध्ये त्यांना ॲकॅडेमीचा किंबर जेनेटिक्स पुरस्कार मिळाला.

ढमढेरे, वा. रा.