डेझनेव्ह, सायमन इव्हानव्हिच : (१६०५–१६७२). रशियन समन्वेषक. याचा जन्म व्हिल्यीकी ऊस्ट्यूक येथे झाला असावा. प. सायबीरियामधील टबॉल्स्क शहरी त्याला कॉसॅक (लष्करी चौकीची प्रमुख) म्हणून पाठविण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडे येनिसे नदी व पूर्वेकडील प्रदेश दिला गेला. १६३८–३९ मध्ये तो येकुत्स्कला असल्याचा उल्लेख मिळतो. १६४०–४२ मध्ये तो याना आणि इंडिगिर्का नद्यांच्या प्रदेशात हिंडला. १६४३ मध्ये स्टॅडखिन नावाच्या सहकाऱ्याबरोबर हा इंडिगिर्का नदीमार्गे आर्क्टिक समुद्रात शिरला व समुद्रमार्गे तो परत कोलीमा नदीच्या मुखाशी आला. या नदीच्या मुखाशी असलेल्या न्यीझ्न्यि-कलिम्स्क येथे त्याने ठाणे वसविले म्हणून पुढे हे आर्क्टिक समुद्राच्या मार्गावरील बंदर बनले. अनादिर नदीच्या मुखामधून मार्ग काढण्याच्या उद्देशाने ऊस्ट्यूक शहराच्या पपॉव्ह नावाच्या व्यापाऱ्याने १६४७ साली मोहीम काढली. सरकारी प्रतिनिधी म्हणून डेझनेव्ह या मोहिमेत होता. पहिल्या वर्षी कोलीमा नदीवरील बर्फामुळे त्यांना पुढे जाता आले नाही पण पुढील वर्षी त्यांना यश मिळाले. १६४९ मध्ये ते अनादिर बेटावर पोहोचले. वॉलरस माशांचे हे महत्त्वाचे केंद्र होते. येथून एक तुकडी अलस्काकडे रवाना झाली व पुढे ती बेपत्ता झाली. पपॉव्हच्या नेतृत्वाखालची दुसरी तुकडी कॅमचॅटकामध्ये गेली. डेझनेव्ह १६६० ते १६७० च्या दरम्यान मॉस्को व सायबीरियात सफरी करीत होता. त्याला अतिपूर्वेकडील कॉसॅकचा प्रमुख म्हणून नेमले होते. १६७२ मध्ये तो मॉस्कोला मरण पावला. ईशान्य आशियाला वळसा घालणारा हा पहिला प्रवासी . हा अलास्कात जाऊन आला होता परंतु अमेरिका खंड वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. आशियाच्या ईशान्य टोकाकडील भूशिराला केप डेझनेव्ह हे त्याचे नाव देऊन रशियन सरकारने डेझनेव्हचा गौरव केला. तसेच ईशान्य आशियात भौगोलिक समन्वेषण करणाऱ्याला १९४८ पासून रशिया डेझनेव्ह पदक बहाल करते.
शाह, र. रू.