डेक्स्ट्रिने : स्टार्चाचे मर्यादित जलीय अपघटन (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे पडून नवी संयुगे बनणे) केल्याने मिळणाऱ्या संयुगांच्या मिश्रणांना डेक्स्ट्रिने म्हणतात. ही संयुगे दक्षिणवलनी म्हणजे ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या) प्रकाशाचे प्रतल उजवीकडे वळविणारी असल्यामुळे त्यांना हे नाव देण्यात आले. १८११ साली किरखोफ यांनी स्टार्च अम्लाबरोबर तापवून आणि लाग्रांझ यांनी स्टार्च भाजून ही प्रथम बनविली.

अस्तित्व : स्टार्च निर्माण करणाऱ्या झाडांच्या पानांत ही अIढळतात. ही स्टार्च बनविण्याच्या प्रक्रियेतील किंवा स्टार्चाच्या अपघटनातील माध्यमिक द्रव्ये होत. मधातही ती असतात.

प्राप्ती : रताळी, मका, टॅपिओका इत्यादींच्या स्टार्चापासून ती बनविली जातात. स्टार्च सु. १७०° ते १९५° से. तापमानात १०–२० तास ठेवल्यास ‘ब्रिटिश गम’ नावाचे डेक्स्ट्रिन मिळते. काही कृतींत तापविण्यापूर्वी स्टार्चावर काही रसायनांची (सोडियम बायकार्बोनेट, अमोनिया इत्यादींची) किंवा अम्लांची विक्रिया घडवितात. विरल हायड्रोक्लोरिक अम्ल फवारून नंतर सु. १००° से. तापमानास स्टार्च ८ तास ठेवल्यासही एक प्रकारचे डेक्स्ट्रिन मिळते. लिंटनर पद्धतीमध्ये स्टार्चावर ७·५% हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया ७ दिवसांपर्यंत होऊ देतात. डायास्टेज, अमायलेज यांसारख्या काही एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) विक्रियेनेही डेक्स्ट्रिने बनविता येतात. बॅसिलस मॅसेरान्स  या सूक्ष्मजीवाची स्टार्चावर प्रक्रिया होऊ दिल्यास शार्डिंगर डेक्स्ट्रिने या नावाने ओळखण्यात येणारी डेक्स्ट्रिने तयार होतात. ही स्फटिकरूप डेक्स्ट्रिने कमी रेणुभाराची असून शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची आहेत.

 संरचना व गुणधर्म : यांच्या संरचना स्टार्चापेक्षा कमी आणि माल्टोजापेक्षा जास्त गुंतागुंतीच्या आहेत. ती पाण्यात विद्राव्य (विरघळणारी) असून त्यांचे विद्राव अधिक नितळ आणि कमी श्यान (दाट) असतात. चवीला ती किंचित गोड व पचनास सुलभ असतात.

डेक्स्ट्रिन बनविण्यासाठी वापरलेला स्टार्च आणि प्रक्रिया यांना अनुसरून त्यांच्या गुणधर्मांत काही फरक आढळतात. उदा., काही डेक्स्ट्रिने आयोडिनाबरोबर निळा व जांभळा, तर काही तांबडा किंवा पिंगट रंग देतात. फेलिंग विद्रावाचे (क्युप्रिक सल्फेट, सोडियम पोटॅशियम टार्टारेट आणि सोडियम हायड्रॉक्साइड ही मिसळलेल्या ताज्या विद्रावाचे) ती ⇨ क्षपण करतात.

उपयोग : वस्तू चिकटविण्यासाठी, मिश्रण दाट करण्यासाठी, कापड व कागद या उद्योगांत खळ म्हणून आणि आगकाड्या, छपाईची शाई, खाद्यपदार्थ इत्यादींत त्यांचा उपयोग होतो.

पहा : स्टार्च.

                                      

ठाकूर, अ. ना.