डेंड्रोबियम : (कुल-ऑर्किडेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, एकदलिकित)फार सुंदर फुलांबद्दल प्रसिद्ध आमर कुलातील [⟶ ऑर्किडेसी] एका वंशाचे नाव. विलिस यांच्या मते या वंशात नऊशे जाती असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधीय आशिया ते पॉलिनीशियापर्यंत व ऑस्ट्रेलियात आहे. बऱ्याच जातींची शोभेसाठी बागेत लागवड करतात. काही औषधी आहेत. सर्वच जाती ⇨अपिवनस्पती असून त्यांना आखूड व मांसल आभासी कंद असतात. पाने साधी, बिनदेठाची असून त्यांच्या तळाशी आवरक (वेढणारा तळभाग) असतो. फुले मोठी व आकर्षक, एकेकटी किंवा मंजरीवर येतात. संदले व प्रदले सारखी असून ओठाला (मोठ्या पाकळीला) तळाशी कधी वृंतक (फार लहान देठ) असते व कधी नसते. परागकोश दोन कप्प्यांचा आणि परागपुंज चार व बहुधा काहीसे जुळलेले असतात [⟶ फूल]. भारतात टेकड्यांवरील जंगलांत व सुंदरबनात डेंड्रोबियमच्या अनेक जाती आढळतात. महाराष्ट्रात सु. वीस जाती आढळतात त्यांपैकी निम्म्या बाहेरून आणून लावल्या आहेत. डें. नोबिल ही जातीं हिमालयात व खासी टेकड्यांत आढळते ती या वंशात सुंदर मानली आहे. चीनमध्ये हिचा उपयोग पौष्टिक व दीपक (भूक वाढविणारी) म्हणून करतात. हिची फुले पांढरी, मोठी व टोकास लालसर गुलाबी असून ओठाच्या तळाशी गर्द किरमिजी मखमली ठिपका असतो ती सुगंधीही असतात. डे. क्रुमिनेटम अंदमान, मलाया, श्रीलंका, ब्रह्मदेश इ. ठिकाणी सापडते. हिच्या पांढऱ्या फुलावर पिवळ्या खुणा असतात. मलायात तिचा उपयोग मेंदू व तंत्रिका (मज्जातंतूच्या) विकारांवर करतात. फुले व पाने पटकीवर उपयुक्त असून पानांच्या चूर्णाचे पोटीस गळवे व मुरुमांवर लावतात मध्यत्वचेपासून मिळणारा वाख हॅटमध्ये वापरतात. आभासी कंदाचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेल्या अर्क) कानदुखीवर देतात. डें. ओवॅटम  (म. नागली) ही सुगंधी जाती सह्याद्रीवर व तमिळनाडूत आढळते. ती वेदनाहारक असून तिचा रस सारक, दीपक व पित्ताला चेतना देणारा असतो.

पहा : ऑर्किडेसी.

जमदाडे, ज. वि.