डुक्करकंद : (हिं. भिर्वोली कंद सं. वाराही गु. वाराही कंद क. हंदीकड्डे लॅ. टाका अस्पेरा, टाका इंटेग्रिफोलिया कुल-टाकेसी). ही लहान ओषधी [⟶ ओषधि] मूळची सिल्हेट, चितगाँग आणि तेनासरीम येथील असून हिचे अनेक वर्षे जमिनीत वाढणारे खोड लांबट व वाकडे असते त्यावर ताठर केस असल्याने त्यावरून मराठी नाव पडले आहे. संस्कृतातील वराह (डुक्कर) यावरून संस्कृत व गुजराती वाराही नाव आले असावे हे उघड आहे. पाने साधी, मोठी, मूलज (मुळापासून किंवा खोडापासून जमिनीतून निघाल्यासारखी), २०–४० X १०–२० सेंमी., अखंड, दीर्घवृत्ताकृती-अंडाकृती असतात. देठ व फुलोऱ्याचा दांडा पात्यापेक्षा आखूड, बळकट व तपकिरी असतात. फुलोरा चवरीसारखा असून आतील दोन छदपर्णे (ज्यांच्या बगलेत फुले व फुलोरे येतात असे लहान पांनासारखे अवयव) मोठी, पसरट व पानासारखी आणि बाहेरील दोन लहान, बिनदेठाची व निमुळती असतात. फुले थोडी परिदले हिरवट जांभळी व पिवळी आणि पसरट आतील तीन परिदले बाहेरच्यापेक्षा मोठी व एकूण सहा असतात.केसरदले सहा व परिदलांच्या तळास चिकटलेली, अधःस्थ तीन किंजदलांच्या किंजपुटात एक कप्पा व बीजकविन्यास तटलग्न बीजके अनेक [⟶ फूल]. मृदूफळ ३·८ सेंमी. लंबगोल व मांसल असून बिया अनेक, चपट्या, लांबट गोल, रेषायुक्त आणि सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नसाठा असलेल्या). टाकेसी कुल एकदलिकित फुलझाडांपैकी असून त्यात फक्त दोनच वंश (टाका आणि शायझोकॅप्सा) व वीस जाती आहेत. डुक्करकंदाचे खोड पौष्टिक, पिठूळ, कच्चेपणी अतिशय कडू परंतु पेज करून घेतल्यास त्वचारोगांवर उपयुक्त असते, ते रक्तस्त्रावी प्रकृती, धातुदोष व कुष्ठरोग यांवरही गुणकारी असते.
देवकांदा : (हिं. केन, दिवा इं. इंडियन ॲरोरूटलॅ. टाका पिनॅटिफिडा, टाका लेओंटोपेटॅलॉइडीस). या जातीचा प्रसार भारतात सर्वत्र ( विशेषतः बंगाल, मध्य भारत आणि प. भागात) असून हिचे मूलक्षोड [जमिनीतील खोड ⟶खोड] कडू, तिखट व विषारी असते परंतु ते चांगले पुनःपुन्हा धुवून त्यापासून उत्तम खाद्य असे ⇨ आरारूट काढतात. ती आमांशात देतात. हिच्या फुलोऱ्यातून ४–१२ जांभळ्या रेषा असलेली छदे येतात व लांब तंतूंसारखी अनेक छदके खाली लोंबत असतात, फुलांचा रंग जांभळा हिरवा असतो. मृदुफळ पिवळे व अडीच सेंमी. लांब असून त्यावर सहा कंगोरे असतात.
जमदाडे, ज. वि.