डील्स, ओटो पाउल हेरमान : (२३ जानेवारी १८७६–७ मार्च १९५४). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. डाइन या महत्त्वाच्या कार्बनी संयुगांच्या संश्लेषणासंबंधी (मूलघटक एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार करण्यासंबंधी) केलेल्या संशोधनाबद्दल डील्स यांना १९५० चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक ⇨ कूर्ट आल्डर यांच्या बरोबर विभागून मिळाले. त्यांचा जन्म हँबर्ग येथे झाला. त्यांचे शिक्षण बर्लिन विद्यापीठात झाले व तेथेच एमील फिशर या सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी १८९९ मध्ये पीएच्.डी. पदवी मिळविली. लगेचच त्यांची तेथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीमध्ये साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. त्याच संस्थेत १९०६ मध्ये ते प्राध्यापक व १९१३ मध्ये विभागप्रमुख झाले. १९१५ साली ते बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक झाले, परंतु एक वर्षानंतर ती नोकरी सोडून कील विद्यापीठात व तेथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे संचालक झाले १९४५ साली ते या दोन्ही पदांवरून निवृत्त झाले.
डील्स यांनी १९॰६ मध्ये कार्बन सब-ऑक्साइड (मॅलॉनिक ॲनहायड्राइड, C3O2) या वैशिष्ट्यपूर्ण व क्रियाशील वायूचे संश्लेषण केले आणि त्याचे गुणधर्म व रासायनिक संरचना यांचा अभ्यास केला. धातुरूप सिलिनियमाचा उपयोग करून संतृप्त (ज्यांत इतर अणूंशी संयोग होणारे संयुजा बंध मोकळे नाहीत अशा) कार्बनी संयुगांतून हायड्रोजन काढून घेण्याची (हायड्रोजननिरास) नियंत्रित पद्धत त्यांनी शोधून काढली. ही पद्धत बहुअसंतृप्त तेलांच्या निर्मितीत उपयुक्त ठरली आहे.
डाइन संश्लेषण हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे संशोधन होय. डाइन संयुगांत दोन कार्बन अणू द्विबंधयुक्त असून ते एका एकेरी बंधाने विभागलेले असतात. उदा., १,३–ब्युटाडाइन H2C=CH–CH–CH2. अनेक कार्बनी संयुगांच्या संश्लेषणात या संयुगांचा उपयोग करण्यात आला व त्यामुळे संश्लेषित पदार्थाच्या रेणवीय संरचनाही समजण्यास मदत झाली. ही संश्लेषण विक्रिया डील्स व त्यांचे सहकारी कूर्ट आल्डर यांनी विकसित केली आणि ती आता डील्स-आल्डर विक्रिया या नावाने ओळखण्यात येते. या विक्रियेने अतिशय स्थिर असणाऱ्या अशा सहा घटक असलेल्या वलयी संरचना तयार होण्यास मदत होते. रासायनिक तंत्रविद्येत या विक्रियेमुळे फार मोठी प्रगती होण्यास साहाय्य झालेले आहे.
डील्स यांनी ब्युटाडाइन किंवा त्याचे अल्किल अनुजात (त्यापासून बनविलेली इतर संयुगे) यांसारखी साधी डाइन संयुगे किंवा वलयी डाइन संयुगे घेऊन त्यांचा १,४–नॅप्थाक्विनोनांबरोबर संयोग करून, इतर कोणत्याही विक्रियाकारकाशिवाय, अँथ्रॅक्विनोन समजात संयुगांची श्रेणी (ज्यांतील दोन लगतच्या संयुगांत फक्त CH2 या गटाचा फरक असतो अशा संयुगांची श्रेणी) निर्माण केली. या विक्रियेसाठी फारशा जादा उष्णतेची गरज लागत नाही वा तीत फार उष्णताही निर्माण होत नाही, असे आढळून आले आहे. आयसोप्रिनासारख्या साध्या डाइन संयुगाचे बहुवारिकीकरणाने (अनेक रेणूंच्या संयोगाने जटिल रेणू तयार करण्याच्या क्रियेने) कृत्रिम रबर तयार करता येणे शक्य झाले आहे. तसेच संश्लिष्ट डाइन संयुगे प्लॅस्टिकांच्या निर्मितीत महत्त्वाची ठरली आहेत.
नोबेल पारितोषिकाशिवाय त्यांना ॲडॉल्फ बेयर पदक (१९३१) आणि ख्रिश्चन आल्ब्रेख्त विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट पदवी (१९४६) हे बहुमान मिळाले. हॅले व गटिंगेन येथील सायन्स ॲकॅडेमींचे तसेच बव्हेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ते सदस्य होते. Einfuhrüng in die Organische Chemie (१९०७) या त्यांच्या लोकप्रिय पाठ्यपुस्तकाच्या १९६२ पर्यंत १९ आवृत्त्या निघाल्या होत्या. ते कील येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.