डिस्टेंपर : इमारतींच्या भिंती, छते इत्यादींना लावण्याच्या सजावटी रंगांचा एक प्रकार. हे अतिशय बारीक केलेली पांढरी शुभ्र चुनखडी (व्हायटिंग), सरस किंवा डिंक व पाणी यांचे योग्य प्रमाणात केलेले मिश्रण असते. ज्याला कधीकधी सफेती (व्हाइट वॉश) म्हणतात, तो अशा रंगाचा अगदी साधा व स्वस्त प्रकार होय. मोठ्या ब्रशाने तो लवकर व सहजपणे भिंतींना लावता येतो, परंतु तो पाण्याने फार लवकर खराब होतो. घरातील भिंतींना व छतांना तो वापरतात याचे कारण इतर रंगांच्या मानाने तो स्वस्त पडतो, काही दिवसांनी खराब झाल्यावर थोड्या श्रमांनी खरवडून काढता येतो आणि त्याच ठिकाणी पुन्हा दुसरा रंग लावता येतो.
टिकाऊ डिस्टेंपर घट्ट खळीसारखे किंवा भुकटीच्या स्वरूपात विकले जातात. त्यात जरूरीप्रमाणे गार अगर गरम पाणी घालून चांगले ढवळले की, ते मिश्रण वापरता येते.
कोरडी डिस्टेंपर भुकटी : हिलाच अमेरिकेत ‘कॅल्सीमाइन’ म्हणतात. चुनखडी व सरस यांच्या अतिशय बारीक केलेल्या भुकट्यांचे हे मिश्रण असते. त्यासाठी विशेष तऱ्हेच्या यंत्रामध्ये सर्व पदार्थांची भुकटी करतात व नंतर ती यंत्रानेच चाळून त्यांचे मिश्रण बनवितात. सर्व पदार्थ पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करून घ्यावी लागते. त्यात थोडा जरी पाण्याचा अंश राहिला, तरी विक्रीपूर्वीच तिचे खडे बनून रंग म्हणून वापरण्यास ती निरुपयोगी होण्याचा संभव असतो. डिस्टेंपरमध्ये जो सरस, डिंक किंवा केसीन (दुधामधील प्रथिन) असते त्याला काही दिवसांनी बुरशी येण्याची व रंग खराब होण्याची भीती असते. तसे होऊ नये म्हणून त्यात टाकणखार, सॅलिसिलिक अम्ल, तुरटी किंवा अशासारखे पदार्थ परिरक्षक म्हणून थोड्या प्रमाणात घालतात. सरस किंवा डिंक यांच्याऐवजी जर केसीन वापरले, तर ते पाण्याने फार लवकर खराब होत नाही. दाहक (कॉस्टिक) सोडा, सोडियम कार्बोनेट किंवा टाकणखार वापरून केसीन प्रथम पाण्यात विरघळवितात व नंतर त्यात चुनखडी घालतात. अलीकडे केसिनाऐवजी सोयाबिनापासून मिळणारे आल्फा प्रथिन वा गॅमा प्रथिन यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येऊ लागला आहे.
रंगीत डिस्टेंपर : पांढऱ्या डिस्टेंपरामध्ये निरनिराळ्या रंगांची रंगद्रव्ये (ज्यामुळे रंग येतो असे पदार्थ) घालून चांगल्या रंगीत छटांचे डिस्टेंपर तयार करता येतात. सूर्यप्रकाशाने विटत नाहीत किंवा रंगछटा बदलीत नाहीत व चुना अगर इतर क्षाराने (अल्कलीने) खराब होत नाहीत अशीच रंगद्रव्ये वापरावी लागतात. कारण डिस्टेंपर करताना त्यात क्षारधर्मी द्रव्ये घालावी लागतात, तसेच भिंतीवरील गिलाव्यामध्येही चुना असतोच. अल्ट्रामरीन ब्ल्यू, झिंकक्रोम, हॅन्सा यलो व व्हॅनिशियन रेड हे अशा रंगद्रव्यांपैकी काही होत. डिस्टेंपरामधील वेगवेगळ्या घटकांचे शेकडा प्रमाण साधारणपणे पुढीलप्रमाणे असते. चुनखडी ८५ ते ९०, विरलेला चुना ५–१०, सरस, केसीन अगर सोयाबीन प्रथिन ५–१०, टाकणखार अगर त्यासारखे परिरक्षक पदार्थ ०·१ ते ०·५ आणि रंगीत डिस्टेंपरामध्ये रंगद्रव्ये ५ ते १० टक्के असतात.
वॉशेबल डिस्टेंपर : पुष्कळ वेळा डिस्टेंपर आणि वॉशेबल डिस्टेंपर हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु ते बरोबर नाही. डिस्टेंपर हा शब्द, जे रंग पाण्याने साफ करता येतात, त्यांसाठीच फक्त उपयोगात आणला पाहिजे. हल्ली बाजारात वॉशेबल डिस्टेंपर, वॉटर पेंट किंवा ऑइल बाउंड पेंट या नावाचे याहीपेक्षा चांगल्या प्रतीचे काही रंग मिळतात. डिस्टेंपरमध्ये जे पदार्थ असतात ते यांत असतातच व त्यांशिवाय यांमध्ये तेल किंवा व्हार्निश असते. हा रंग भिंतींना लावून वाळल्यावर धूळ वगैरे बसून भिंत खराब झाल्यास ओल्या फडक्याने किंवा भिजविलेल्या स्पंजाने भिंत पुसली म्हणजे रंग पुन्हा पहिल्यासारखा चांगला दिसू लागतो. याची आच्छादनक्षमता (पृष्ठभाग झाकण्याची पात्रता) डिस्टेंपरापेक्षा जास्त असते कारण त्यामध्ये चुनखडीखेरीज लिथोपोन व झिंकव्हाइट यांसारखी चांगली रंगद्रव्ये घातलेली असतात. यामध्ये तेल किंवा व्हार्निश असल्यामुळे ते खळीच्या स्वरूपातच विकले जातात. या रंगात पाणी घालून ते ब्रशाने तसेच फवारूनही लावता येतात. याच्या उपयोगाने भिंतींचा रंग आपणास हवा असेल तसा नितळ व चकचकीत किंवा न चकाकणारा बनविता येतो. हे भिंतीला त्वरित चिकटत असल्यामुळे पहिला हात वाळला की, लगेच जरूरीप्रमाणे दुसरा हात देता येतो व त्यामुळे रंग लावण्याचा वेळ वाचतो.
वॉशेबल डिस्टेंपर तयार करण्याची पद्धत स्थूलमानाने खालीलप्रमाणे आहे. एक भाग सरस किंवा डिंक दहा भाग पाण्यात प्रथम भिजवून ठेवतात. नंतर ते मिश्रण गरम करतात. त्यामुळे सर्व सरस पाण्यात विरघळतो. मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये दहा भाग जवसाचे तेल अगर कोपल व्हार्निश अगर दोन्हींचे मिश्रण ओततात व एकजीव होईपर्यंत ढवळतात. या मिश्रणास बुरशी येऊ नये म्हणून कार्बॉलिक अम्ल, फॉर्माल्डिहाइड किंवा अशासारखे परिरक्षक पदार्थ थोड्या प्रमाणात घालतात. तसेच मिश्रण एकजीव व्हावे म्हणून पायसीकारकाचा (तेल व पाणी यांचा मिलाफ घडविणाऱ्या पदार्थाचा) पण वापर करतात. हे मिश्रण एक भाग घेऊन त्यात तितकीच चुनखडी, लिथोपोन, अगर ब्लॅक फिक्स (बेरियमाचे कृत्रिम सल्फेट) अगर त्यांचे मिश्रण घालून ते दगडी चक्क्यांत रग़डतात व तयार झालेली खळ विक्रीसाठी डब्यांमध्ये भरतात. वॉशेबल डिस्टेंपरास रंग यावा म्हणून जेथे क्षारधर्मी द्रव्यात टिकणारी रंगद्रव्ये मिसळतात, तेथे ते पाण्यात विरघळावे म्हणून पाण्यात सोडियम कार्बोनेट किंवा टाकणखार घालतात. नंतरची कृती वर सांगितल्याप्रमाणेच असते.
चित्रकलेमधील उपयोग : ग्रीस व ईजिप्त या देशांतील लोक डिस्टेंपरचा चित्रकलेसाठी खूप उपयोग करीत असत. ज्या वेळी सरस अगर डिंकाऐवजी अंड्याचा बलक वापरतात, त्या वेळी त्यास इंग्लंडमध्ये टेंपेरा म्हणतात व फ्रान्समध्ये त्यास डिट्रेंप म्हणतात.
साठे, प्र. रा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..