डिप्नोई : अस्थिमत्स्यांच्या म्हणजे ज्यांचा सांगाडा हाडांचा बनलेला असतो अशा माशांच्या क्रॉसॉप्टेरिजाय (कोॲनिक्थीस) या उपवर्गातील डिप्नोई (किंवा डिप्न्यूस्टाय) हा एक गण आहे. या गणात फुप्फुसमिनांचा (फुप्फुसासारख्या वाताशयाने म्हणजे वायूने भरलेल्या पिशवीने तसेच क्लोमांच्या म्हणजे कल्ल्यांच्या साहाय्याने श्वासोच्छ्वास करणाऱ्या माशांचा) समावेश केलेला आहे. त्यांची मुख्य लक्षणे येणेप्रमाणे : शरीर लांब, सडपातळ अग्रहन्वस्थी अथवा उत्तर हन्वस्थी (वरच्या जबड्याची हाडे) नसतात दातांच्या पट्टिका बनलेल्या असून त्यांची एक जोडी तालूवर आणि एक खालच्या जबड्यावर असते वाताशय फुप्फुसासारखा असतो जोडीने असणारे पर (हालचालीस उपयुक्त अशा त्वचेच्या स्नायुमय घड्या) अगदी अरुंद असतात.
फुप्फुसमीन प्रथम डेव्होनियन कल्पात (सु. ४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) उत्पन्न झाले पर्मियन आणि ट्रायसिक कल्पांत ( सु. २७·५ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांची भरभराट झाली, पण पुढे ते दुर्मिळ झाले. हल्ली या माशांचे फक्त तीन वंशच काय ते शिल्लक आहेत हे सर्व गोड्या पाण्यात राहणारे आहेत. सेरॅटोर्डोंटिडी कुलातील निओसेरॅटोडस फॉर्स्टराय हा फुप्फुसमीन ऑस्ट्रेलियात (आग्नेय क्विन्सलँड) आढळतो. हा जरी साठलेल्या पाण्यात राहू शकत असला व वायुश्वसनाकरिता त्याचे अनुकूलन (ज्या प्रक्रियेने प्राणी विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो ती) झालेले असले, तरी तो ग्रीष्मनिद्रा (उन्हाळ्यात येणारी गुंगी) घेत नाही. लेपिडोसायरनिडी कुलातील लेपिडोसायरन पॅरॅडॉक्सा हा दक्षिण अमेरिकेत व याच कुलातील प्रोटॉप्टेरस वंशाच्या चार जाती आफ्रिकेत आढळतात. उन्हाळ्यात पाणी आटल्यावर किंवा दलदली कोरड्या होऊ लागल्यावर या जाती ग्रीष्म निष्क्रियतेत जातात. जमीन ओली असतानाच हे मासे तिच्यात खोल बिळे करून त्यांत पडून राहतात. संरक्षणाकरिता शरीराभोवती मातीचे कठीण कवच तयार करून त्याला श्वासोच्छ्वासाकरिता एक छिद्र ठेवलेले असते. पावसाळ्यात हे मासे बिळातून बाहेर पडतात.
पहा : फुप्फुसमीन
कुलकर्णी, सतीश वि.