डॉगवुड : (लॅ. कॉर्नस कुल-कॉर्नेसी). कॉर्नस या फुलझाडांच्या (आवृतबीज, द्विदलिकित) वंशातील सु. एकेचाळीस जातींना हे इंग्रजी नाव दिले आहे. उत्तर गोलार्धाच्या समशीतोष्ण पट्ट्यात यांपैकी चाळीस जाती आढळतात आणि एक पेरू देशात आढळते. या सर्वच जाती चिवट असून पर्णसंभार, फुले व फळे यांमध्ये शोभिवंत दिसणारी झुडपे व लहान वृक्ष [फार क्वचित ओषधी, → ओषधि] आहेत. पाने साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक मंडलित व अखंड आणि पतिष्णु (गळणारी) असतात. फुले लहान, चतुर्भागी, सामान्यतः पांढरी असून अग्रस्थ (टोकावरील) वल्लरीवर किंवा स्तबकावर येतात [→ पुष्पबंध]. संवर्तदंत सूक्ष्म प्रदले धारास्पर्शी, किंजपुट अधःस्थ व दोन कप्प्यांचा [→ फूल] असून अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळात दोन अष्ठिका (बाठा) असतात. नवीन लागवड बियांपासून करतात व त्या एक वर्षाने उगवतात काही जाती कलमांनी येतात.
कॉर्नस फ्लॉरिडा हा लहान वृक्ष मूळचा उ. अमेरिकेतील असून दक्षिणेत चांगला फोफावतो. फुले फार आकर्षक असून ती वसंत ऋतूत येतात. याच्या सर्व भागांत कमीजास्त प्रमाणात ⇨ सिंकोनातल्याप्रमाणे क्विनीन असते. याच्या डहाळ्या चघळूनसुद्धा ताप कमी होतो. सालीच्या चूर्णाचे दंतमंजन करतात. साल आयर्न सल्फेटमध्ये मिसळून उत्तम काळी शाई मिळते. मुळाच्या सालीपासून शेंदरी रंग मिळतो. लाकूड कठीण, जड व सुबक असून त्याचा उपयोग विविध वस्तूंकरिता (हत्यारांच्या मुठी, धोटे, रिळे, हातोडे, खुंट्या इ.) होतो. फळ मऊ गोड व खाद्य असते. कॉर्नस संग्विनियाच्या सालीचा अर्क लूत भरलेली कुत्री धुण्यास पूर्वी इंग्लंडमध्ये वापरीत, त्यामुळे ‘डॉगवुड’ हे नाव प्रचारात आले. एस्किमो लोक कॉ. स्वेसिकाची लाल फळे खातात. कॉ. मॅसच्या फळांचा मुरंबा घालतात.
पहा : अंबेलेलीझ.
जमदाडे, ज. वि.
“