डार्विन, जॉर्ज हौअर्ड : ( ९ जुलै १८४५–७ डिसेंबर १९१२). ब्रिटिश ज्योतिषशास्त्रज्ञ व गणिती आणि सुप्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ. ⇨चार्ल्स डार्विन यांचे पुत्र. विश्वोत्पत्तिशास्त्र व भूविज्ञान यांतील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी तपशीलवार गतिकीय विश्लेषण करण्याच्या पद्धतीचा पाया घातला. त्यांचा जन्म डाऊन (केंट) येथे व शिक्षण ट्रिनिटी कॉलेजात (केंब्रिज विद्यापीठ) झाले. १८६८ साली ते सेकंड रँग्लर होऊन त्यांना स्मिथ पारितोषिक व ट्रिनिटी कॉलेजचे फेलो हे बहुमान मिळाले. नंतर त्यांनी लंडनला कायद्याचा अभ्यास करून सनदही मिळविली, परंतु वकिली न करता ते केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले (१८७३). १८८३ साली ते तेथे ज्योतिषशास्त्र व प्रायोगिक विज्ञानाचे प्ल्युमियन प्राध्यापक झाले व शेवटपर्यंत ते या पदावर होते. ते रॉयल सोसायटीचे फेलो (१८७९) आणि रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (१८९९), ब्रिटिश ॲसोसिएशन (१९०५) आणि केंब्रिज येथे १९१२ साली झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथेमॅटिशियन्सचे अध्यक्ष होते. ब्रिटिश सरकारचा नाइट हा किताब (१९०५), रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक (१९११) इ. बहुमानही त्यांना मिळाले.
वेला-घर्षण (भरती-ओहोटीच्या लाटांमुळे निर्माण होणारे घर्षण), भूगणित व वातावरणविज्ञान या विषयांत त्यांनी संशोधन केले. पी. एस्. लाप्लास व लॉर्ड केल्व्हिन यांच्या पद्धतींवर आधारलेले वलीय निरीक्षणांच्या हरात्मक विश्लेषणाविषयीचे (ज्या विविध घटकांच्या संयोगाने जटिल वेलीय गती निर्माण होते ते घटक गणितीय पद्धतीने काढण्याविषयीचे) त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. युग्म प्रणालीच्या (दोन घटक असलेल्या प्रणालीच्या विशेषतः पृथ्वी व चंद्र यांच्या) उत्क्रांतीवर होणाऱ्या वेला-घर्षणाच्या परिणामाचे विवेचन करून त्यांनी चंद्राच्या उत्पत्तीसंबंधी पुढील निष्कर्ष काढला : अनुस्पंदनी सौर वेलांमुळे वितळलेल्या स्थितीतील द्रव्य बाहेर ओढले जाऊन त्यापासून चंद्र बनला असावा. पृथ्वी आणि चंद्र यांच्या उत्क्रांतीसंबंधीचा गणितीय विश्लेषणावर आधारलेला पहिला सिद्धांत हाच होय. शिवाय चंद्र-पृथ्वीचा गतकालीन व भावी इतिहास देऊन त्यांनी दिवस व महिना यांतील संभाव्य बदलही सांगितले. वेलाजन्य प्रेरणांनी ज्यात विकृती उत्पन्न होऊ शकतात (उदा., पृथ्वी) अशा ग्रहाभोवती फिरणाऱ्या उपग्रहाच्या गतीमध्ये होणाऱ्या दीर्घकालिक बदलासंबंधीचा त्यांचा प्रबंध आजही महत्त्वपूर्ण मानला जातो.
पृथ्वीवरील भरती – ओहोटी, भूकंप, ⇨खंडविप्लव यांसारख्या भूवैज्ञानिक क्रियांमुळे पृथ्वीचा अक्ष व तिच्या कक्षेची पातळी यांच्यातील कोनात विशेष बदल होणे शक्य नाही, हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. सौरकुलाची उत्पत्ती व उत्क्रांती यांचा त्यांनी अभ्यास केला व त्यासाठी त्रिपिंड-समस्येचाही [⟶ खगोलीय यामिकी] विस्तारपूर्वक अभ्यास केला.
त्यांनी काढलेले कित्येक निष्कर्ष जरी आज मान्य नसले, तरी त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे व विश्वोत्पत्तिशास्त्राच्या विकासात त्यांच्या पद्धती एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मानल्या जातात.
त्यांनी बोस्टन येथे १८९७ साली दिलेल्या व्याख्यानांच्या आधारे द टाइड्स अँड किंड्रेड फिनॉमिना इन द सोलर सिस्टिम (१८९८) हे पुस्तक लिहिले. त्यांनी लिहिलेल्या गणिताविषयीच्या लेखांचे पाच खंड सायंटिफिक पेपर्स (१९०७–१६) या नावाने प्रसिद्ध झाले. ते कर्करोगाने केंब्रिज येथे मृत्यू पावले.
ठाकूर, अ. ना.