डायाटमी माती : (डायाटमाइट, कीझेलगूर). उदसर वा पिवळसर रंगाची सूक्ष्मकणी सिलिकामय माती. ही मुख्यतः डायाटम नावाच्या एकपेशीय शैवालांच्या सिलिकामय कवचांची बनलेली असल्याने तिला हे नाव पडले असून ती काहीशी घट्ट झाल्यावर तिला डायाटमाइट म्हणतात. ही दिसायला चॉकसारखी असून तिच्यातील सिलिका ओपलमधील सिलिकेसारखी असते. ही माती सच्छिद्र, सहज भुगा होणारी म्हणजे सूचूर्ण्य, उष्णता सहन करू शकणारी आणि रासायनिक विक्रियेला विरोध करणारी असते.

डायाटमाची कवचे किंवा पेशींच्या भित्ती आणि आतील शिलारूप द्रव्य ही बुडून पाण्यात तळावर सावकाश साचत असतात व दीर्घकाल साचून हिचे थर तयार होतात. हिचे बहुतेक मोठे निक्षेप (साठे) तृतीय कल्पात (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) तयार झालेले आहेत. गोड्या पाण्याच्या काही सरोवरांतही या मातीचे शुद्ध निक्षेप तयार होतात. ध्रुवीय प्रदेशातील खोल समुद्रतळावर अधिक घट्ट माती म्हणजे डायाटमी ऊझ (सिंधू जैवपंक) तयार होत असून त्यात अजैव चिखलही मिसळलेला असतो. ही माती जगात सर्वत्र आढळते. डेन्मार्क, जपान, अल्जीरिया, रशिया इ. देशांत हिचे चांगले साठे आहेत.

ही उष्णतेला व ध्वनीला प्रतिबंध करण्यासाठी [बाष्पित्र (बॉयलर), शीतपेटी, इमारती बांधकामे] गाळण्यांमध्ये (साखर, खनिज तेल, वाहितमल) मृत्तिका उद्योगात (विटा, टाइल) भरणद्रव्य म्हणून (रंगलेप, प्लॅस्टिक, रबर) सौम्य अपघर्षक (घासून गुळगुळीत करणारा पदार्थ) म्हणून [कागद, प्रक्षालक (डिटर्जंट), पॉलिश करावयाचे चूर्ण, टूथपेस्ट, लिनोलियम, साबण] स्फोटक पदार्थांच्या उत्पादनात वाहक व शोषक म्हणून आणि रसायने, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ, तणनाशके, कवकनाशके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारी द्रव्ये) इत्यादींमध्ये ही माती वापरली जाते.

ठाकूर, अ. ना.