डायाटम : (लॅ. डायाटमी, बॅसिलॅरिओफायसी वर्ग). हे इंग्रजी नाव काही अतिसूक्ष्म पण फार महत्त्वाच्या वनस्पतींना दिले असून त्यांना करंडक-वनस्पती म्हटल्याचे आढळते, कारण यांचे शरीर एककोशिक (एका पेशीचे बनलेले) आणि लहान गोळ्या ठेवण्याच्या डबीसारखे (करंडक) असते. क्रायसोफायटा या शैवलविभागात त्यांचा समावेश असून [⟶ शैवले] पृथ्वीवर त्यांचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे [⟶ पुरावनस्पतिविज्ञान]. खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात, ओलसर जागी, जमिनीत किंवा जमिनीवर त्या सर्वत्र चिकटलेल्या किंवा तरंगतांना विपुल आढळतात. [⟶ प्लवक]. यांच्या संरचनेतील व प्रजोत्पादनातील काही ढोबळ फरक लक्षात घेऊन सेंट्रेलीझ व पेनेलीझ अशा दोन गणांत त्यांची विभागणी केली आहे. त्यांचे एकूण सु. १७० वंश व ५,५०० जाती आज माहीत आहेत.
स्वरूप, संरचना व प्रजोत्पादन : या वनस्पती फार सूक्ष्म असल्याने त्यांचे निरीक्षण सूक्ष्मदर्शकातूनच करावे लागते. त्यांचे शरीर एककोशिक असते किवा अनेक कोशिकांच्या समूहाचे बनलेले (निवह) असते. कोशिकावरण सिलिकायुक्त दोन समान शकलांचे (भागांचे) असून त्यांपैकी एक शकल दुसऱ्यावर झाकणीप्रमाणे बसलेले असते. एकाच वनस्पतीची दोन दृश्ये दिसतात. बाजूने दिसणारे दोन्ही शकलांचे वलयासारखे एक ‘मेखला दृश्य’ व दुसरे फक्त खालच्या किंवा वरच्या शकलाच्या भागाचे ‘शकल दृश्य’. यांपैकी दुसऱ्यात कोशिकावरणाची अनेक सूक्ष्म छिद्रे, कंगोरे, रेषा, चिरा इ. अत्यंत नियमितपणे (व अरसमात्र किंवा द्विपार्श्वसमात्र म्हणजे मध्यातून जाणाऱ्या कोणत्याही उभ्या पातळीने किंवा एखाद्या विशिष्ट पातळीने दोन सारखे भाग होतील अशा रीतीने) मांडलेली दिसतात व यामुळेच ती सुंदर दिसतात. कोशिकावरणातील प्राकलात (सजीव द्रव्यात) एक किंवा अधिक पिवळट वा पिंगट वर्णकणू (जीवद्रव्यातील रंगद्रव्ययुक्त विशेष कण), पिवळट तैलबिंदू, प्रकल (पेशीतील जीवद्रव्यातील विशेषत्व पावलेला नियंत्रक भाग) इ. दिसतात. या शैवालांची संख्यावाढ कोशिकांच्या समविभाजनाने जलद होते परंतु उत्तरोत्तर काहींचा आकार फार लहान होतो, कारण विभागून स्वतंत्र झालेल्या दोन्ही जुन्या शकलांत सामावणारा असा नवीन भाग (शकल) बनतो म्हणून ठराविक काळाने दोन्ही शकलांचा त्याग करून प्राकल स्वतंत्रपणे वावरताना वाढून आपल्याभोवती दोन नवीन शकले बनवितो किंवा असे दोन शकलहीन प्राकल एकत्र येऊन बनलेल्या (सलिंग संयोग) संयुक्त प्राकलाभोवती नवीन शकले बनतात.
डायाटमांच्या मृत शरीराच्या सिलिकायुक्त कोशिकावरणांच्या राशी सरोवराच्या अथवा समुद्राच्या
तळाशी वर्षानुवर्षे साचतात व त्यांचे फार मोठे थर वा खडक बनतात. त्यांना ⇨ डायाटमी माती (करंडकी माती) म्हणतात बर्ग्मोल, कीझेलगूर, डायाटमाइट ही नावेही त्यासच वापरतात. प्राचीन काळी साचून राहिलेल्या अशा जीवाश्म (अवशेषरूप) थरांवरून (जर्मनी, स्वीडन, कॅलिफोर्निया इ.) डायाटम वनस्पती तृतीय कल्पात (सु. ६·५–१·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) फार विपुल असाव्या, हे सिद्ध होते. काही थर सु. ९३० मी. (सांता मारीया, कॅलिफोर्निया) जाडीचे आहेत. लाँपोक (कॅलिफोर्निया) येथील डायाटमाइटाचे निक्षेप (साठे) पूर्वी सागरात बनलेले असून आज सु. २१७ मी. जाड व अनेक किमी. लांब आहेत त्यातील करंडक शैवालांच्या जाती वेलांचली (किनाऱ्यावरील) आहेत. डायाटमांचे काही वंश फक्त जीवाश्मरूपातच आढळतात, तर काही वंशांतील जाती थोड्या जिवंत व अधिक जीवाश्मरूप आहेत.
उपयोग : महासागरातील करंडक वनस्पती व इतर काही सूक्ष्म जीव जिवंतपणी पाण्यात विरघळलेल्या पोषक पदार्थांचे योग्य कार्बनी पदार्थांत रूपांतर करतात व त्यांवर मत्स्यादी असंख्य प्राणी उपजीविका करतात तसेच या वनस्पतींतील जीवनसत्वयुक्त तेल माशांच्या यकृतात साठते व त्याला मोठे व्यापारी महत्त्व आहे. करंडकी मातीचा उपयोग अनेक द्रव पदार्थ गाळणे, साखर शुद्ध करणे, उष्णतारोधक वस्तू, दंतधावने, झिलई करण्याची चूर्णे व लेप बनविणे इ. विविध प्रकारे करतात. कोशिकावरणावरच्या शिल्पामुळे सूक्ष्मदर्शकांची भिंगे तपासण्यासही त्यांचा उपयोग होतो.
संदर्भ : 1. Doyle, W. T. Nonvascular Plants : Form and Function, London, 1964.
2. Smith, G. M. Cryptogamic Botany, Tokyo, 1955.
परांडेकर, शं. आ.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..