डायरेन : (दाल्येन). चीनमधील एक प्रसिद्ध बंदर. ते दक्षिण मँचुरियात लीआउडुंग द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर पोर्ट आर्थरच्या ईशान्येस सु. ३८ किमी. वर वसले आहे. ह्या बंदराचा परिसर सुपीक व समृद्ध असून ह्या भागास चिनी भाषेत ‘लूटा’ म्हणतात. पोर्ट आर्थरसह लोकसंख्या १५,९०,००० (१९७०). १८९८ साली दक्षिण मँचुरियन लोहमार्गाचे अंतिम स्थानक डायरेनला ठेवण्याचे ठरताच, रशियाने येथील खाडीत एक प्रचंड भिंत बांधून या संरक्षित बंदरास आधुनिक रूप दिले. जपानने १९०६ मध्ये ते जिंकल्यानंतर त्याचे खुल्या बंदरात रूपांतर केले. त्यामुळे त्याची झपाट्याने वाढ झाली व व्यापारही वाढला. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर येथे रशिया-चीनचा संयुक्त नाविक तळ झाला. १९५५ पासून मात्र डायरेन सर्वस्वी चिनी अंमलाखाली आहे. परदेशांशी व्यापार करण्यात या बंदराचा शांघायखालोखाल दुसरा क्रमांक लागतो. डायरेन बंदरात एकूण १,१०,००,००० टन वजनाची जहाजे सामावतात. मोठमोठे धक्के, निर्जल गोद्या, मालगुदामे, माल चढउताराच्या अत्याधुनिक सोयी इत्यादींमुळे बंदराचे महत्त्व खूप वाढले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर डायरेनच्या परिसरात अनेक कारखाने निघाले. त्यांतून जहाजे, यारीसारखी मोठी यंत्रे, रसायने, चिनी मातीची भांडी, सिमेंट, कापड असे विविध उत्पादन होते. सोयाबीनपासून केलेले विविध पदार्थ, कोळसा व धान्य यांची निर्यात होते. खनिज तेलशुद्धीकरणाचा कारखानाही येथे आहे. लोहमार्गाचे ते एक प्रमुख स्थान असून रेल्वेच्या मोठमोठ्या कर्मशाळा येथे आहेत. शिवाय ८,००० टनी बोटीचे उत्पादनही येथे होते. मच्छीमारी व्यवसायाकरिताही डायरेन प्रसिद्ध आहे.    

                                                    ओक, द. ह.