डांग्या खोकला : (माकड खोकला). श्वसन तंत्रामध्ये हीमोफायलस परट्यूसिस या सूक्ष्मजंतूमुळे होणाऱ्या विकृतीस डांग्या खोकला असे म्हणतात. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे खोकल्याची जोराची उबळ येऊन त्या उबळीच्या शेवटी श्वास जोराने घेण्याची क्रिया होते. त्या वेळी घशात एक विशिष्ट आवाज होतो, त्याला इंग्रजीत Whoop असे म्हणतात म्हणून या खोकल्याला इंग्रजीत व्हूपिंग कॉफ असे म्हणतात.
हीमोफायलस परट्यूसिस या सूक्ष्मजंतूचा शोध १९०६ मध्ये फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये झ्यूल बॉर्दे आणि ऑक्ताव्ह झॅवगू या शास्त्रज्ञांनी लावला. डांग्या खोकल्याच्या प्रत्येक रोग्याच्या कफात पहिल्या १५–२० दिवसांत हा सूक्ष्मजंतू सापडतो. चिंपँझी जातीच्या वानरावर प्रयोग करून हाच सूक्ष्मजंतू डांग्या खोकल्याचे कारण आहे, हे सिद्ध झाले आहे. १९५२ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या सूक्ष्मजंतूचे नाव बॉर्देटिल्ला परट्यूसिस असे ठेवून बॉर्दे या शास्त्रज्ञांचा सन्मान केला आहे.
डांग्या खोकला हा एक साथीचा रोग असून जगातील सर्व देशात याच्या साथी येतात. विशेषतः उष्ण देशांत उन्हाळ्याच्या दिवसांत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. दाट लोकवस्तीच्या भागात रोगसंपर्क होण्याचा संभव जास्त असल्यामुळे अशा वस्तींत या साथीचा फैलाव त्वरित व जोराने होतो. रोग्याच्या सान्निध्यातील ७५ ते ९० टक्के लोकांच्या श्वसन तंत्रात हे सूक्ष्मजंतू आढळून येतात, कारण रोग्याच्या खोकल्याबरोबर हवेत जे कफाचे तुषार उडतात त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तीनांही संपर्क होतो. त्यांपैकी ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना हा रोग होतो.
१५ दिवसांच्या अर्भकापासून ७७ वर्षांच्या वृद्धापर्यंत हा रोग झाल्याची उदाहरणे आहेत परंतु साधारणमानाने ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना या रोगाचा संपर्क जास्त प्रमाणात होतो, असे आढळून आले आहे.
संप्राप्ती : (रोगाची कारणमीमांसा). श्वासनलिका व सूक्ष्मश्वासनलिका यांच्या आतील पडद्यावरील कोशिकांवर (पेशींवर) या सूक्ष्मजंतूंचा आघात होऊन त्या कोशिकांचा नाश होतो त्यापूर्वी त्या कोशिकांच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म पक्ष्माभिकांमध्ये (केसासारख्या वाढींमध्ये) हे सूक्ष्मजंतू अडकतात व तेथून त्यांचा त्या कोशिकांवर परिणाम होऊन कोशिकांचा नाश होतो. मग त्या जागी सूज येऊन या जंतूंच्या प्रतिकारार्थ रक्तातील उदासीन कोशिका (उदासीन म्हणजे अम्लीय व क्षारीय–अल्कलाइन–नसलेल्या रंजकाने रंगविता येणाऱ्या पांढऱ्या कोशिका) आणि महाभक्षी कोशिका (आधारभूत ऊतकामध्ये म्हणजे कोशिका समूहात आढळणाऱ्या व जीवजंतूंचा नाश करणाऱ्या मोठ्या कोशिका) जमतात. सूक्ष्मश्वासनलिकांच्या पलीकडे असलेल्या वायुकोशांतही ही सूज पसरते. कित्येक वेळा सूक्ष्मश्वासनलिकांमध्ये कफ दाटून वायुकोशाचे प्रसरणही थांबते, याला फुप्फुससंकोच (ॲटेलेक्टेसिस) म्हणतात. या रोगाचा परिपाककाल (रोगजंतू शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष लक्षणे दिसेपर्यंतचा काळ) ७ ते १५ दिवसांचा आहे.
लक्षणे व अवस्था : रोगाच्या लक्षणांच्या तीन अवस्था दिसतात. (१) आक्रमावस्था : या अवस्थेत थोडा ताप, सर्दी, नाक वाहणे, आवाज बसणे व रात्रीच्या वेळी खोकला येणे अशी लक्षणे दिसतात. ही अवस्था साधारणपणे ७-८ दिवस टिकते. (२) आवेगावस्था : (रोग लक्षणे प्रकर्षाने दिसणारी अवस्था). या अवस्थेत रात्री येणारी ढास जास्त प्रमाणात येऊ लागून ती दिवसाही येण्यास सुरुवात होते. हळूहळू या ढासेचे रूपांतर उबळ येण्यात होते. उबळ म्हणजे एकामागून एक सारखा खोकला येतो तो इतक्या जोरात येतो की, मध्यंतरी श्वास घेताच येत नाही. एकामागून एक असा १०-१५ वेळा खोकला येऊन गेला की, शेवटी एकदम जोराने श्वास घेतला जातो त्या वेळी घशात व्हूप असा एक विशिष्ट आवाज होतो. उबळीचा जोर असतो त्या वेळी तोंड लाल व काळेनिळेही पडते, डोळे सुजतात, क्वचित कान फुटतात रोगाचा फार जोर असला, तर नाकावाटे अथवा डोळ्यांत रक्तस्रावही होतो. क्वचित मेंदूतही रक्तस्राव होऊन आकडीसारखे झटकेही येतात. उबळीच्या शेवटी जोराने उलटी होऊन चिकट, बुळबुळीत असा कफ पडतो अथवा गिळला जातो. अशा उलट्या दर उबळीनंतर येऊ लागल्यामुळे खाल्लेले अन्न अथवा दूधही उलटीबरोबर पडून जाते व त्यामुळे रोगी अशक्त होतो. ही आवेगावस्था २ ते ४ आठवडे टिकते. (३) उपशमावस्था : (रोगाला उतार पडून रोग बरा होत असलेली अवस्था). या अवस्थेत उबळीचा जोर हळूहळू कमी होतो. उलट्यांचे प्रमाणही कमी होत जाते व साधारणमानाने आणखी २-३ आठवड्यांत रोगी संपूर्णपणे बरा होतो.
सांसर्गिकता : या रोगाची सांसर्गिकता पहिले २ ते ३ आठवडे असते व पुढे कमीकमी होत जाते म्हणून या मुदतीत रोग्याच्या जवळ दुसऱ्या लहान मुलांना जाऊ न देणे श्रेयस्कर असते. तसेच मुलांना शाळेत पाठवू नये.
उपचार : या रोगावर टेट्रासायक्लीन, क्लोरँफिनिकॉल आणि आयसोनियाझीड (आयसोनिकोटिनीलहायड्रॅझीन) ही औषधे विशेष गुणकारी आहेत. त्यांचा लवकर वापर केल्यास रोगाची तीव्रता कमी होऊन त्वरित उतार पडतो. कफ पडणे सुलभ होण्याकरिता रोग्याच्या पायगताची बाजू उचलून द्यावी. उलट्यांचा जोर फार असेल, तर एका वेळेला अगदी थोडे थोडे अन्न अथवा दूध द्यावे म्हणजे ते उलटून पडण्याचा संभव कमी होतो. असे केल्याने मूल अशक्त होत नाही. वर उल्लेख केलेल्या उपद्रवांत त्या त्या उपद्रवाला योग्य असे उपचार करतात. क्वचित उबळीच्या जोराच्या काळात ऑक्सिजनही द्यावा लागतो. खोकल्याचा जोर कमी करण्यासाठी शामक (मज्जायंत्रणेची कार्यशीलता कमी करणारी) औषधे द्यावी लागतात. अलीकडे पाश्चात्य देशांत रोग होऊन गेलेल्या व्यक्तीचा रक्तरस (रक्तातील घन पदार्थ विरहित रक्तद्रव) अथवा गॅमाग्लोब्युलीन (रक्तद्रवातील एक प्रकारचे प्रथिन) देतात.
केवळ डांग्या खोकल्याने रोग्याचा मृत्यू क्वचित होतो, परंतु त्यापासून उत्पन्न होणाऱ्या उपद्रवांमुळे व आत्यंतिक अशक्ततेमुळे कित्येक वेळा रोगी दगावतो.
एकदा हा रोग होऊन गेला म्हणजे पुन्हा तो होत नाही. प्रतिकार शक्ती जन्मभर राहते.
प्रतिबंध : रोग होऊन त्यावर उपचार करण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करण्याकडे अलीकडे विशेष लक्ष देण्यात येते. या रोगजंतूंपासून तयार केलेली प्रतिबंधक लस मुलाच्या चौथ्या महिन्यापासून दर महिन्यास एकदा याप्रमाणे तीन वेळा टोचली व पुढे साथ आली असता अथवा वयाच्या तिसऱ्या वर्षी पुन्हा दिली असता रोगाचा प्रतिबंध होतो अथवा रोग झालाच तर फार सौम्य प्रमाणात होतो.
अलीकडे घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या तीनही रोगांकरिता एकत्रित प्रतिबंधक लस (ट्रिपल) तयार करण्यात आली आहे. तिचा फार मोठ्या प्रमाणात जगभर वापर करण्यात येतो.
रानडे, म. आ.
आयुर्वेदिक चिकित्सा : डांग्या खोकला वातज खोकल्यामध्ये (कासामध्ये) समाविष्ट होतो. प्रथम गुडुच्यादी सिद्ध तूप, क्षारादी घृत, रास्नादी घृत, विदार्यादी सिद्ध तूप, वातघ्न द्रव्यांनी सिद्ध घृते रोग्याला देत असावी. अशोकाचे बीज, आघाडा, रसांजन, पद्मकाष्ठ आणि बिडलवण ह्यांचे चूर्ण तुपाबरोबर चाटवून वर शेळीचे दूध पाजावे. जुना गूळ आणि तेल, सुंठ व पिंपळी किंवा सुंठ आणि भार्गी दह्याबरोबर निर्गुडीच्या बीचे चूर्ण किंवा बोराच्या बीच्या मधला मगज, पिंपळीची चटणी तुपामध्ये भाजून सैंधव घालून चाटवावी. पेज, कुळथाचे पाणी, मांसरस ही वातघ्न द्रव्ये घालून खाण्यामध्ये उपयोगात आणावीत. गळा आणि छाती ह्यांना नारायण तेलासारखे वातघ्न तेल लावून शेकावे. मात्र हृदयाचा भाग शेकू नये. छाती, पाठ आणि घसा ह्यांवर देवदार, सुंठ इत्यादींचा काढा शिंपडावा. ओवा, देवदारू, एरंडाचे बी निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर तोंडाने ओढावा वा तो श्वासाबरोबर आत घ्यावा. नारायण तेल इत्यादिकांचा बस्ती द्यावा.
पहा : आतुर चिकित्सा.
संदर्भ : Nelson, W. E. Textbook of Pediatrics, London, 1959.
“