डॅनियल (डॅन्येल), जॉन फ्रेडरिक : (१२ मार्च १७९०–१३ मार्च १८४५). इंग्रज रसायनशास्त्रज्ञ आणि वातावरणवैज्ञानिक. त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा डॅनियल विद्युत् घट सुप्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म लंडन येथे झाला व शिक्षणही तेथेच झाले. ते काही काळ काँटिनेंटल गॅस कंपनीचे कार्यकारी संचालक होते. लंडन येथे नुकत्याच स्थापन झालेल्या किंग्ज कॉलेजमध्ये मध्ये रसायनशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची १८३१ साली नेमणूक झाली.

टर्पेंटाइनात विरघळविलेल्या रेझिनाचे उर्ध्वपातन ( वाफ तयार करून व मग ती थंड करून तिच्यातील घटकद्रव्ये अलग करण्याची क्रिया) करून प्रकाश देणारा वायू तयार करण्याची पद्धत डॅनियल यांनी शोधून काढली. ही पद्धत अमेरीकेतील न्यूयॉर्क व इतर काही शहरांत काही काळ वापरत होती. १८२० मध्ये त्यांनी दवबिंदू आर्द्रतामापकाचा [⟶ आर्द्रता ] शोध लावला आणि हे उपकरण लवकरच आर्द्रता मोजण्याचे एक प्रमाणभूत उपकरण म्हणून मान्यता पावले. वातावरणविज्ञानातील आपले निबंध एकत्रित करून आणि त्या काळी या विषयातील उपलब्ध असलेल्या माहितीचा विस्तार करून त्यांनी १८२३ मध्ये मिटिओरॉलॉजिकल एसेज  हा ग्रंथ प्रसिद्ध केला. हॉर्टिकल्चरल सोसायटीला १८२४ मध्ये सादर केलेल्या एका निबंधात त्यांनी उष्ण कटिबंधीय वनस्पती वाढविणाऱ्या वनस्पतीगृहांत योग्य आर्द्रता व तापमान राखण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. १८३० साली त्यांनी रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्स  मध्ये भट्ट्यांचे तापमान मोजणाऱ्या एका उत्तापमापकाचे ( उच्च तापमान मोजणाऱ्या उपकरणाचे) वर्णन प्रसिद्ध केले. या कार्याकरिता त्यांना रॉयल सोसायटीचे रम्फर्ड पदक मिळाले (१८३२). रॉयल सोसायटीच्या अनुज्ञेवरून त्यांनी १८३० मध्ये एक पाण्याचा वायुभारमापक उभारला आणि त्याच्या साहाय्याने अनेक निरीक्षणेही केली. जस्ततांब्याच्या विद्युत् घटातील तांब्याच्या पत्र्यावर निर्माण होणाऱ्या हायड्रोजन वायूला सच्छिद्र पटलाच्या साहाय्याने प्रतिबंध करून दीर्घकाल टिकणाऱ्या विद्युत् घटाचा शोध त्यांनी १८३६ मध्ये लावला. या कार्याकरिता त्यांना रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक १८३७ मध्ये मिळाले. रॉयल सोसायटीने त्यांची वयाच्या तेविसाव्या वर्षीच सदस्य म्हणून निवड केली होती. १८३९ पासून रॉयल सोसायटीचे परदेशी सचिव म्हणून त्यांनी काम केले. इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ केमिकल फिलॉसॉफी  (१८३९) हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. ते लंडन येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.