डबल बीन : (डफळ हिं. सेम इं. लिमा बिन, बर्मा बीन, रंगून बीन लॅ. फॅसिओलस ल्युनॅटस कुल-लेग्युमिनोजी-पॅपिलिऑनेटी). मोठ्या शहरांच्या आसपास विक्रीसाठी आणि बंगाल बगीच्यात भाजीसाठी शेंगा आणि बियांसाठी लागवड करण्यात येणारी वनस्पती. मूल्यस्थान द अमेरिका. यात दोन प्रकार आहेत. एक वेलीप्रमाणे वाढणारा आणि दुसरा झुडुपवजा. पाने एकाआड एक, संयुक्त त्रिदली फुले सर्वसाधारणपणे पांढरी शिंबा ( शेंगा) ५ ते ७·५ सेंमी. लांब व १·८ सेंमी. रुंद, चपट्या, टोकदार चोचीच्या आणि काहीशा लवदार, बिया काहीशा चौकोनी, १·२० सेंमी. पेक्षा जास्त लांब, सपाट आणि पातळ असतात. बियांचा रंग पांढरा, तपकिरी, लाल अथवा ठिपकेदार असतो. हे सु. ९ महिन्यांचे बागायती पीक आहे.
हवामान, लागवड, मशागत इत्यादी : ही उष्ण कटिबंधात सर्वत्र वाढणारी वनस्पती असली, तरी विशिष्ट हवामानातच तिची वाढ चांगली होत असल्यामुळे या पिकाची लागवड मर्यादित क्षेत्रातच आहे. थंड व कोरडी हवा या पिकाला चांगली मानवते. वाढीच्या काळात कडाक्याची थंडी मानवत नाही. वार्षिक पर्जन्यमान ५०–७५ सेंमी. असावे लागते. या पिकाला भरपूर पाणी व खताची भरपूर मात्रा या गोष्टी आवश्यक आहेत. आसाम, प. बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब येथे या पिकाची लागवड होते.
या पिकाला मध्यम अथवा भारी काळी वा पोयट्याची, चांगल्या निचऱ्याची जमीन असावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला नांगरून व कुळवून तयार केलेल्या जमिनीत सु. १·७५ मी. अंतरावरील ओळीत सु. १·२५ मी. अंतरावर प्रत्येक जागी दोन बिया लावतात. हेक्टरी १०–१२ किग्रॅ. बी लागते. जमिनीची मशागत करतेवेळी हेक्टरी १८–२४ टन चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत आणि लागणीनंतर ६–८ आठवड्यांनी हेक्टरी ४४ किग्रॅ. नायट्रोजन वरखत म्हणून देतात. पुष्कळ वेळा हे पिक उसानंतर घेतले जाते. अशा वेळी या पिकाला खत देत नाहीत. पावसाळ्यात जरुरीप्रमाणे आणि ऑक्टोबरपासून पुढे पीक संपेपर्यंत दर ८–१० दिवसांनी पिकाला पाणी द्यावे लागते.
वेली प्रकारचे पीक सु. दीड-दोन महिन्यांचे झाल्यावर प्रत्येक ओळीत ३–३·५ मी. अंतरावर २·५ ते ३ मी. उंचीचा बांबू रोवतात व या उभ्या बांबूंना दर ४५–६० सेंमी. अंतरावर ३ ते ४ आडवे बांबू बांधतात व त्यांवर वेल चढवितात. झुडपाप्रमाणे वाढणाऱ्या प्रकारांना आधार लागत नाही.
भारतात एकेरी पांढरा, दुहेरी पांढरा, सुलतानी स्पेकल्ड (ठिपकेदार), फ्लॉरिडा बटर चॅलेंज, होपी, हेडरसन बुश, बर्पी बुश इ. प्रकार लागवडीत आहेत.
उत्पन्न : लागणीपासून ४ महिन्यांनी पूर्णपणे पोसलेल्या शेंगांची पहिली तोडणी करतात. कोवळ्या शेंगा तोडीत नाहीत. शेंगा तोडण्याचा हंगाम यापुढे ४–५ महिने म्हणजे मार्च अखेरपर्यंत टिकतो. महिन्यातून २ अथवा ३ वेळा शेंगा तोडतात. शेंगांचे एकूण १०–१२ तोडे मिळतात. हेक्टरी २०,००० ते ३०,००० शेंगा अथवा २५०–३७५ किग्रॅ. दाणे मिळतात. पहिले सहा तोडे मिळून सु. ५० टक्के उत्पन्न आणि सातव्या ( डिसेंबर महिन्यातील) तोड्याचे उत्पन्न सर्वात जास्त म्हणजे ४० टक्के असते.
रोग : मूळकूज, करपा, तांबेरा हे कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे होणारे) आणि व्हायरस (पिवळा चित्रवर्ण) हे रोग या पिकावर पडतात परंतु त्यांमुळे विशेष नुकसान होत नाही. श्रावण घेवड्यापेक्षा या पिकावर रोगाचे मान कमी असते.
रासायनिक संघटन : वाळलेल्या बियांमध्ये जलांश १३·३%, प्रथिन १९·७%, कार्बोहायड्रेट ५७·८%, वसा (स्निग्ध पदार्थ) १·२%, तंतू ४·३%, राख ३·७ % असते. बियांमध्ये एक प्रकारच्या ग्लुकोसाइडापासून हायड्रोसायानिक अम्ल तयार होते. बिया विस्तवावर भाजणे अगर शिजवणे यामुळे हायड्रोसायानिक अम्ल निघून जाते. बियांचे पीठ पाण्यात भिजवून वाळविल्यासही तोच परिणाम होतो.
संदर्भ : 1. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.