डच भाषा : डच ही हॉलंड व त्यांच्या आसपासचा काही प्रदेश यांची भाषा असून ती इंडो-यूरोपीय भाषाकुटुंबाच्या जर्मानिक शाखेची आहे. हॉलंड हे राष्ट्र कित्येक शतके दर्यावर्दीपणात फार आघाडीवर होते. त्याने आशिया व आफ्रिका खंडात वसाहती स्थापन करून मोठे साम्राज्य उभारले होते. त्यामुळे या देशाची भाषा द. आफ्रिका, जावा, सुमात्रा, बाली इ. प्रदेशांत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. दक्षिण आफ्रिकेतील तिचे रूप ‘आफ्रिकान्स’ या नावाने ओळखले जाते. मात्र साम्राज्यवादाचा अस्त झाल्यापासून द. आफ्रिका सोडल्यास, इतर सर्व ठिकाणी डचची फार मोठी पीछेहाट झाली आहे. हॉलंडमध्ये डच बोलणारांची संख्या जवळजवळ सव्वा कोटी आहे. डच भाषा लेखनासाठी रोमन लिपीचा उपयोग करते. वरवर पाहिले तरी डचचे जर्मनशी असणारे साम्य स्पष्ट आहे. इंग्रजीलाही ती बरीच जवळची आहे.

ध्वनिविचार : स्वर : आ, इ, इ‍ॅ, ए, ऍ, उ, ओ.                    व्यंजने : स्फोटक : क, ग, त, द, प, ब.                                                     घर्षक : ख, स, झ, फ, व, ह.                                                             अनुनासिक : म, न.                                                                  अर्धस्वर : य, व.                                                                  कंपक : र.                                                                    पार्श्विक : ल.

स्वरचिन्ह लागोपाठ दोनदा लिहून दीर्घ स्वर दाखवला जातो. इतर काही स्वरांचा संयोग वेगळे ध्वनी दाखवतो: eu ऍ, eeu ऍव, ie इ‍ॅ इत्यादी.

व्याकरण :  नाम : नामात तीन लिंगे व दोन वचने आहेत. प्रथमा, द्वितीया, चतुर्थी व षष्ठी या चार विभक्त्या आहेत.

विशेषणे : जर्मन, इंग्रजीप्रमाणे निर्गुण विशेषण निश्चित व अनिश्चित आहे. ते व इतर विशेषण नामाप्रमाणे चालविली जातात.                                           सर्वनाम                        प्र. पु.            द्वि. पु.             तृ. पु.ए. व.                        ik             du                hij, zij, het.अ. व.                      wij             gij                 zij

क्रियापद : क्रियापदात सौम्य व तीव्र असा भेद आहे. सौम्य क्रियापदे नियमित आहेत, तर तीव्र क्रियापदांना स्वरविकार होतो. काही कालवाचक रूपे सहायक क्रियापदांच्या मदतीने होतात.

लिखित डच भाषा आणि बोलभाषा (शिष्टांचीही) यांत फार मोठे अंतर आहे. लिखित रूपे बोलण्यात वापरली, तर पुस्तकी वाटतील इतकी ती वेगळी आहेत. मराठीत ‘त्याच्या अनुपस्थितीमुळे मला माझे जाणे स्थगित करावे’ लागले व ‘तो न आल्यामुळे मी गेलो नाही’ यात ज्या प्रकारचा फरक आहे तसाच तो वाटेल.

संदर्भ : Pei, Mario A. Languages for War and Peace, New York, 1943.

कालेलकर, ना. गो.