ठिपके भुंगेरा : कीटकांच्या कॉक्सिनिलिडी (कोलिऑप्टेरा गण) कुलातील एपिलाक्ना वंशातील कीटकांना ठिपके भुंगेरे असे संबोधिले जाते. त्यांच्या ४६६ जाती असून त्यांचा प्रसार जगभर सर्वत्र आहे. हे
भुंगेरे गोलाकार, फिकट तपकिरी रंगाचे असून त्यांवर काळे ठिपके असतात. ठिपक्यांचा रंग, आकार व संख्या यांवरून त्यांच्या निरनिराळ्या जाती ओळखल्या जातात. भुंगेऱ्याची लांबी ५–६ मिमी. व रुंद ४ मिमी. असते. त्यांच्या अळ्या धडधाकट व पिवळसर रंगाच्या असून त्यांच्या अंगावर राठ केस असतात. पूर्ण वाढळलेली अळी सु. ६–७ मिमी. लांब असते.
मादी पानांच्या पाठीमागे पिवळसर, लांबट अंडी पुंजक्याच्या रूपात घालते. त्यांची टोके वरच्या बाजूकडे असतात. २–४ दिवसांत अंडी फुटून त्यांतून अळ्या बाहेर पडतात व एका आठवड्यात पानांवरच कोषावस्थेत जातात. कोष अर्धगोलाकृती असून पानांना चिकटलेले असतात. सु. सात दिवसांच्या कोषावस्थेनंतर भुंगेरे बाहेर पडतात. भुंगेऱ्याच्या सर्व अवस्था फक्त झाडांवरच आढळतात.
भुंगेरे व अळ्या पानांच्या शिरांमधील हिरवा भाग खातात त्यामुळे पानांवर विशिष्ट प्रकारचे चट्टे दिसतात. एपिलाक्ना डोडेकॅओटिग्मा व ए. व्हिजिकंटा या दोन जातींचा पिकांना उपद्रव होतो, त्यामुळे त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांचा उपद्रव बटाटा, वांगे, टोमॅटो, कारले, भोपळा इ. पिकांना होतो. त्यांचे प्रमाण कमी असल्यास अळ्या व भुंगेरे वेचून नष्ट करतात. तसेच १० टक्के कार्बारिल किंवा ५ टक्के लिंडेन भुकटी मारूनही त्यांचे नियंत्रण करतात.
पोखरकर, रा. ना.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..