ट्रिनिटी : ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा धर्मसिद्धांत. पुत्र (येशू ख्रिस्त) आणि पवित्र आत्मा (होली घोस्ट किंवा स्पिरिट) हे ‘पर्सन्स’ म्हणजे व्यक्ती वा विभूती असून परमेश्वर वा पिता (फादर) हा ‘बीइंग’ म्हणजे सत्ता आहे. परमेश्वराचे देवत्व विभक्त न होता हे तिन्ही मिळून एकच देव आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या त्रयदेवाचा (ट्रायून गॉड) सिद्धांत हा ख्रिस्ती चर्चचा ऐतिहासिक व मूलभूत महत्त्वाचा धर्मसिद्धांत आहे. इंग्रजीत पवित्र आत्म्याला ‘इट’ असे न संबोधता ‘ही’ असे संबोधतात आणि एच् हे अक्षर कॅपिटल ठेवतात. परमेश्वराने येशू ख्रिस्तात स्वतःला प्रगट केले व पवित्र आत्म्याद्वारे ‘इल्यूमिनेशन’ म्हणजे आध्यात्मिक प्रकाश प्राप्त करून घेतला.
टर्टल्यन (सु. १६०–सु. २३०) नावाच्या धर्मशास्त्रवेत्त्याने तिसऱ्या शतकाच्या प्रारंभी हा धर्मसिद्धांत मांडला. नायसीआ येथे ३२५ मध्ये व कॉन्स्टँटिनोपल येथे ३८१ मध्ये भरलेल्या ख्रिस्ती धर्माच्या दोन सार्वत्रिक परिषदांमध्ये ह्या धर्मसिद्धांतास मान्यता मिळाली. त्यामुळे ह्या सिद्धांतास ‘चर्चचा अधिकृत सिद्धांत’ म्हणून दर्जा प्राप्त झाला.
नव्या करारात ह्या सिद्धांताचा प्रत्यक्ष उल्लेख कोठेही नाही तथापि काही ठिकाणी तो केवळ सूचित केला आहे. येशूने आपल्या शिष्यांना असा आदेश दिला, की ‘बापाच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा करा’ (मत्तय–२८·१९). पॉलने करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात (१३·१४) असा आदेश दिला, की ‘प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या बरोबर असो’.
पहा : ख्रिस्ती धर्म.
2. Richardson, C. C. The Doctrine of the Trinity, Nashville, Tenn., 1958.