ट्रिकोमोनियासिस : एक ⇨गुप्तरोग. ट्रिकोमोनास व्हजिनॅलिस नावाच्या प्रजीवामुळे (प्रोटोझोआमुळे) जननेंद्रियांना होणाऱ्या संभोगजन्य रोगाला ट्रिकोमोनियासिस म्हणतात.
हे आदिजीव लंबवर्तुळाकृती वा नासपतीच्या (पिअरच्या) आकाराचे असून त्यांना चार चाबकासारख्या कशामिका (हालचालीस उपयोगी पडणारे शेपटीसारखे अवयव) असतात आणि त्यांची हिसका दिल्यासारखी हालचाल होत असते. रोगी स्त्रीच्या जननेंद्रियातील स्राव लगोलग काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास हे प्रजीव स्पष्ट दिसतात. निरनिराळ्या संवर्धन माध्यमांमध्ये ते सहज वाढतात आणि म्हणून त्यांच्या निदानाकरिता संवर्धन पद्धतीही उपयुक्त असते.
या रोगाचे पुरुषातील व स्त्रीतील असे दोन प्रकार ओळखले जातात.
पुरुषातील ट्रिकोमोनियासिस : गौरवर्णीयांपेक्षा कृष्णवर्णीयांमध्ये अधिक प्रमाणात आढळणारा हा रोग एक प्रकारचा मूत्रमार्गशोथच (मूत्रमार्गाची दाहयुक्त सूज) असतो. ज्या वेळी मूत्रमार्गशोथ प्रमेह गोलाणूंमुळे (परम्याच्या सूक्ष्मजंतूमुळे) झालेला नसतो त्या वेळी बहुधा तो ट्रिकोमोनास व्हजिनॅलिसमुळे झाल्याचे आढळून येते. रोगाचा परिपाक काल (रोगकारक जीव शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ) १ ते ३ आठवड्यांचा असतो. निदानाकरिता सूक्ष्मदर्शकीय तपासणी अथवा संवर्धन पद्धती वापरतात. कधीकधी रोग लक्षणे अती सौम्य प्रकारची असून मूत्रात स्वल्पविरामाच्या आकाराचे धागे सापडतात. पुरुषातील मूत्रमार्गशोथाच्या रोग्यांपैकी १५% रोगी ट्रिकोमोनियासिसचे असतात. पुरुषामध्ये हे प्रजीव शिश्नमणिच्छद (शिश्नाच्या बोंडीवरील त्वचेचे आच्छादन), अष्ठीला ग्रंथीचा (पुरुषाच्या मूत्राशयाखाली असणाऱ्या, स्नायू आणि ग्रंथिल ऊतक म्हणजे समान व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह मिळून बनलेल्या ग्रंथीचा) स्राव, वीर्य व मूत्र यांमध्येही सापडतात. हा रोग काही वेळा आपोआप बरा होतो. जसजसा तो जुनाट होतो तसतसे सूक्ष्मदर्शीय तपासणीत प्रजीव ओळखता येत नाहीत. या रोगापासून इतर उपद्रव सहसा होत नाही.
स्त्रीतील ट्रिकोमोनियासिस : पुरुषातील रोगाप्रमाणेच परिपाक काल १ ते ३ आठवड्यांचा असून ज्या वयात स्त्रीची लैंगिक क्रियाशीलता परमोच्च असते त्या वयातील स्त्रियांना हा रोग अधिक प्रमाणात होतो. संक्रामण (रोगसंसर्ग) बहुधा संभोगजन्य असते. कधीकधी दूषित कपडे, तपासणीकरिता वापरण्यात येणारी वैद्यकीय हत्यारे, रबरी हातमोजे वगैरेंपासून संसर्ग होण्याची शक्यता असते. योनिच्छद (कौमार्यावस्थेत योनिमार्गात असणारा पडदा) फाटलेला नसतानाही, केवळ लिंग सान्निद्यामुळे, म्हणजे शिश्न योनिमार्गात न शिरता बाह्य स्पर्शानेही, स्त्रियांना हा रोग होण्याची शक्यता असते. स्त्रियांतील ट्रिकोमोनियासिस इतर संभोगजन्य रोगांबरोबर झाल्याचे आढळते. प्रमेह झालेल्या स्त्री रोग्यांपैकी ५०% स्त्रियांमध्ये ट्रिकोमोनियासिस असतोच.
योनिस्राव पातळ, पिवळा व दुर्गंधीयुक्त असतो. स्रावाधिक्यामुळे योनिमार्गशोथ होतो. बाह्य जननेंद्रियावरील व मांड्यावरील त्वचेला लाली येऊन सूज येते. संभोगाच्या वेळी किंवा तपासणीकरिता एखादे उपकरण (स्पेक्यूलम) योनिमार्गात घालताना वेदना होतात. अशा तपासणीत गर्भाशय ग्रीवेवर (गर्भाशयाच्या चिंचोळ्या भागावर) तांबडे ठिपके दिसतात व तिचा योनिमार्गातील भाग स्टॉबेरी फळासारखा दिसतो. योनिमार्ग स्रावाचे pH मूल्य [→ पीएच मूल्य] नेहमीच्या ४ ते ५ ऐवजी ६ ते ८ झालेले असते. एक चतुर्थांश रोग्यांमध्ये मूत्रमार्गशोथही आढळतो. त्यामुळे मूत्रोत्सर्जनाचे प्रमाण वाढते व प्रत्येक वेळी वेदना होतात. प्रमेह गोलाणूप्रमाणे हे प्रजीव गर्भाशय व अंडवाहिन्या यांवर परिणाम करू शकतात किंवा नाही याविषयी दुमत आहे. निदानाकरिता सूक्ष्मदर्शकीय तपासणी आणि संवर्धन पद्धती उपयुक्त असतात. प्रमेह नसल्याची खात्री करून घेणे जरूरीचे असते.
चिकित्सा : मेट्रोनिडाझॉल (पेटंट औषधी नाव ‘फ्लॅजिल’) हे औषध अत्यंत गुणकारी ठरले आहे. २०० मिग्रॅ. दिवसातून तीन वेळा सात दिवस किंवा ४०० मिग्रॅ. दिवसातून दोन वेळा पाच दिवस जेवणानंतर पोटात देतात. विवाहित जोडप्यापैकी एकास रोग झाल्यास दुसऱ्याची तपासणी अपरिहार्य असते. तसे न केल्यास झालेला रोग दुसऱ्यापासून पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते.
वरील औषधे तोंडाने घेणे काही कारणामुळे अशक्य झाल्यास स्त्री रोग्यांच्या योनिमार्गात औषधी गोळ्या (पारा किंवा सोमल यांपासून बनविलेल्या) दररोज १४ दिवस ठेवतात. उपचार कालात मद्यसेवन वर्ज्य करावे लागते.
भालेराव, य. त्र्यं.
पशूंतील ट्रिकोमोनियासिस : ट्रिकोमोनास फीटस या प्रजीवामुळे गायीमध्ये गर्भपात होतो व वंध्यत्व येते. पाश्चात्त्य देशांत हा रोग बऱ्याच प्रमाणात आढळतो. संसर्गित गायीत गर्भपाताचे प्रमाण ५ ते ३०% असू शकते. भारतात प. बंगाल व बिहार या राज्यांमध्ये असे गर्भपात झाल्याची नोंद आहे [→ गाय].