ट्रायनायट्रोटोल्यूइन : हे एक स्फोटक कार्बनी संयुग असून हे प्रामुख्याने टीएनटी या संक्षिप्त रूपात तसेच २, ४, ६–ट्रायनायट्रोटोल्यूइन किंवा आल्फाट्रायनायट्रोटोल्यूइन या नावांनीही ओळखण्यात येते. या संयुगाचे रेणुसूत्र (संयुगाच्या रेणूतील अणू आणि त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) C7H5O6N3, संरचनासूत्र (संयुगातील अणू एकमेकांस कसे जोडले गेले आहेत याची कल्पना देणारे सूत्र) H3C–C6H2–(NO2)3, संरचना (संयुगातील अणूंची जोडणी स्पष्ट करणारी आकृती) पुढीलप्रमाणे आहे. त्याचा रेणुभार २२७·१३ आहे.
हा पिवळसर स्फटिकी घन पदार्थ असून त्याचा वितळबिंदू ८०·१० से. आहे. २८०० से. या तापमानास तो स्फोट होऊन उकळतो. हा पाण्यात विरघळत नाही, पण कार्बनी विद्रावकात (विरघळविणाऱ्या द्रव्यात) विरघळतो. याच्या स्फटिकांची सापेक्ष घनता १·६५४ आहे, पण दाब देऊन बनविलेल्या ठोकळ्यांची १·४ ते १·६ असते.
जे. व्हिलब्रांट या रसायनशास्त्रज्ञांनी १८६३ मध्ये हे प्रयोगशाळेत प्रथम बनविले. याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन १९०१ च्या सुमारास जर्मनीने सुरू केले.
⇨ टोल्यूइन (C6H5–CH3) संयुगावर सल्फ्यूरिक व नायट्रिक अम्लांच्या मिश्रणाची विक्रिया करून हे बनवितात. तीन टप्प्यांत ही विक्रिया घडवून आणण्याची पद्धत उतारा आणि शुद्धता या दृष्टींनी समाधानकारक आहे. विक्रियेच्या पहिल्या टप्प्यात टोल्यूइन रेणूतील एका हायड्रोजन अणूची जागा एक नायट्रो गट (–NO2) घेतो. दुसऱ्या टप्प्यात दुसरा व तिसऱ्यात तिसरा नायट्रो गट जागा घेतो व विक्रिया पूर्ण होते. या प्रकारे मिळणाऱ्या मिश्रणात प्रथम टीएनटीबरोबर २, ३, ४–ट्रायनायट्रोटोल्यूइन ३, ४, ६ – ट्रायनायट्रोटोल्यूइन इ. नायट्रोसंयुगेही असतात म्हणून टीएनटी शुद्ध करण्यासाठी हे मिश्रण सोडियम सल्फाइट आणि सोडियम हायड्रोजन सल्फाइट यांच्या उष्ण विद्रावाबरोबर मिसळून खळबळतात. नंतर वितळलेल्या स्थितीत टीएनटी वेगळे करुन पाण्याने धुतात. अशा प्रक्रियेने मिळणाऱ्या टीएनटीचा उतारा सु. ८० टक्के पडतो. स्फटिकरूपात किंवा पत्रीच्या रूपात हे मिळविले जाते. शुद्धता अजमावण्यासाठी याचा गोठणबिंदू काढतात. शुद्ध नमुन्याचा गोठणबिंदू ८०·७° से. ते ८०·८° से. असतो. भेसळ असल्यास हे तापमान कमी होते.
हा पदार्थ एक स्फोटक द्रव्य आहे. विसाव्या शतकात सुरुवातीपासून मुख्यतः लष्करी उपयोगासाठी हे इतर स्फोटकांपेक्षा जास्त प्रमाणात वापरले जात आहे. दुसऱ्या महायुद्धात दोन्ही पक्षांचे मिळून टीएनटीचे दर दिवशीचे उत्पादन कित्येक हजार टन इतके होते. बाँब व तोफगोळे यांमध्ये भरण्यासाठी पूर्वी पिक्रिक अम्ल वापरीत. त्याचा वितळबिंदू १२२° से. आहे. त्याऐवजी टीएनटी वापरणे जास्त सोईचे आणि बिनधोक आहे कारण याचा वितळबिंदू पिक्रिक अम्लापेक्षा बराच कमी असल्यामुळे वाफेने तापविलेल्या पात्रात वितळवून ते (किंवा त्यात अमोनियम नायट्रेटासारखी संयुगे मिसळून केलेले मिश्रण) ओतून गोळ्यात सुलभतेने भरता येते.
एक-दोन अपवाद सोडल्यास टीएनटी हे सर्व ज्ञात स्फोटकांत कमी संवेदी आहे. माफक स्वरूपाचा आघाताचा, घर्षणाचा किंवा अग्निस्पर्शाचा परिणाम त्यावर होत नाही. उच्च तापमानास त्याचा स्फोट होतो. याची स्फोटनशक्ती मध्यम आहे. ती प्रमाण धरून इतर स्फोटकांच्या अथवा अणुबाँबच्या स्फोटनशक्तीचे मापन करतात. विविध उपयोगांसाठी टीएनटी एकटेच किंवा इतर पदार्थांबरोबर मिसळून वापरतात. उदा., अमोनियम नायट्रेटासह (ॲमॅटॉल), अमोनियम नायट्रेट आणि ॲल्युमिनियमाची पूड यांसह (ॲमोनल), सायक्लोनाइटासह (सायक्लोटॉल) इत्यादी.
ह्याच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे टोल्यूइन आणि नायट्रिक व सल्फ्युरिक अम्ले, ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तथापि सर्वच राष्ट्रांच्या शस्त्रसामग्रीत आर. डी. एक्स. (सायक्लोनाइट) यासारखी अधिकाधिक शक्तिशाली स्फोटके हळूहळू टीएनटीची जागा घेत आहेत.
भारतात याचे उत्पादन खडकी येथील हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीमध्ये होते.
पहा : स्फोटक द्रव्ये.
संदर्भ :
1. Riegel, E. R. Industrial Chemistry, Bombay, 1959.
2. Taylor, W. Modern Explosives, London.
काजरेकर, स. ग.
“