ट्रफल : (सं. कंदकवक लॅ. ट्यूबर वर्ग-ॲस्कोमायसिटीज). सदैव जमिनीतच वाढणाऱ्या शवोपजीवी (मृत जीवांच्या अवशेषांवर जगणाऱ्या) व खाद्य धानीकवकांना [ॲस्कोमायसिटीज ⟶ कवक] हे इंग्रजी नाव असून ट्यूबर या लॅटिन नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवकवंशातील काही जातींचा त्यात समावेश होतो. धानीकवकांतील ट्यूबरेलीझ गणात सु. तीस वंश आणि एकशे चाळीस जाती असून त्यांत ट्यूबर वंश अंतर्भूत आहे. त्यांतील अनेक जाती समशीतोष्ण कटिबंधात आढळतात. भारतात काश्मीर व कांग्रा येथे आणि प. बंगाल मधील बांकुरा येथे साल वृक्षाखाली त्या विपुल आढळतात. उघड्यारानातील चुनखडीची जमीन यांना विशेष मानवते. यांच्या कवकतंतूंचा (हरितद्रव्यहीन वनस्पतींच्या तंतूंचा) संबंध जवळच्या वृक्षांच्या (उदा., ओक, बीच, बर्च इ.) मुळांशी असतो [संकवक ⟶ कवक]. या वनस्पतींच्या धानीफलांचा आकार काहीसा लंबगोल असतो व आकारमान वाटाण्यापासून ते नारिंगापर्यंत भिन्न असते. त्यातील मगज प्रथम पांढरा व नंतर काळपट होतो व त्यात इतस्ततः काही रेषा दिसतात. एका धानीफलात अनेक धानी स्कंभोतकाप्रमाणे विखुरलेल्या असून प्रत्येक धानीत एक ते चार मोठी धानीबीजुके असतात. जे. पी. टूर्नफॉर यांनी १७१०–११ मध्ये यांचे प्रथम वर्णन केले.
ट्यूबर वंशातील खाद्य जाती रुचकर असल्याचे फार पूर्वीपासून दिसून आले आहे. पंधराव्या शतकाच्या शेवटापासून पेरिगोर्ड (ट्यूबर मेलॅनोस्पोरम) ही जाती फ्रेंच स्वयंपाकात लोकप्रिय झाली आहे. सर्वच जातींना विशिष्ट वास असतो. फ्रेंच सरकारने मोठ्या प्रमाणावर नापिक माळरान जमिनीवर या कवकाची वाढ होण्यास सोयीस्कर म्हणून ओक वृक्षांची लागवड केली आहे. इतरत्रही तसे प्रयत्न झाले आहेत. परंतु ते पिकविण्याचे (लागवडीने) प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत बहुधा रानटी अवस्थेत वाढलेले कवक जमा करतात. ट्रफल जमिनीखाली दहा ते तीस सेंमी. खोलीवर असतात आणि ते शोधून काढणे सोपे नसते. भूपृष्ठाजवळ वाढून फुटल्यास वास लागलीच येतो. डुकरे व कुत्रे यांच्या साहाय्याने ते शोधून काढतात. फ्रान्समध्ये व इटलीत ट्रफल गोळा करून विकणे हे किफायतशीर ठरले आहे. इंग्लंडमध्ये ट्यू. एस्टिव्हम बीचच्या जंगलांत सापडते. ते निळसर काळे व खरबरीत असते. भारतात ट्यू. सिबेरियम आढळते. ह्या दोन्ही जाती खाद्य आहेत. अमेरिकेत ऑरेगन व कॅलिफोर्निया येथे ट्रफल आढळतात.
परांडेकर, शं. आ.
“