ट्रंपेट व्हाइन : (म. तुतारी वेल लॅ. टेकोमा रॅडिकँस कुल बिग्नोनिएसी). मुळांच्या मदतीने जलद चढत जाणारी ही वेल मूळची उ. अमेरिकेतील असून हल्ली उष्ण प्रदेशांत सर्वत्र आढळते. हिची पाने संयुक्त, विषमदली दले नऊ ते अकरा व अंडाकृती-आयात, दंतुर व लांबट टोकाची असतात. नारिंगी किंवा शेंदरी फुले विशेषतः ऑगस्ट–नोव्हेंबरमध्ये फांद्याच्या टोकांस झुबक्यांनी येतात. संवर्त नळीसारखा व संदले पाच असून पुष्पमुकुट तुतारीसारखा व द्व्योष्ठक असतो (त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे). पाकळ्या पाच, टोकाशी पसरट व फणीप्रमाणे असतात. केसरदले चार व दीर्घद्वयी (दोन लांब व दोन आखूड) असतात. किंजपुट वलयाकृती बिंबावर [⟶ फूल] असून बोंड फुटीर व अनेकबीजी असते. बिया सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेल्या) असतात. ही वेल फुले व पान शोभिवंत असल्याने लोकप्रिय झाली आहे. हिची नवीन लागवड कलमांनी करतात.
पहा: बिग्नोनिएसी.
देशपांडे, सुधाकर