टोलमन, एडवर्ड चेस : (१४ एप्रिल १८८६–१९ नोव्हेंबर १९५९). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. जन्म वेस्ट न्यूटन (मॅसॅचूसेट्स) येथे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण वेस्ट न्यूटन तसेच मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केंब्रिज येथे झाले. १९१५ मध्ये त्याने हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्.डी. घेतली व प्रथम नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात मानसशास्त्राचे अध्यापन केले. कॅलिफोर्नियात बर्क्ली येथे त्याचे निधन झाले.
टोलमनला वॉटसनप्रणीत वर्तनवाद जसाच्या तसा मान्य नव्हता. मात्र वस्तुनिष्ठनिरीक्षण पद्धतीचा व तंत्रांचाच अवलंब करण्याबाबत त्याचाही आग्रह असल्यामुळे, त्याची विचारसरणी तशी वर्तनवादाचाच एक विशिष्ट प्रकार म्हणून गणली गेली. स्वतःच्या विचारसरणीला त्याने ‘हेतुगर्भ किंवा सांघातिक वर्तनवाद’ (पर्पसिव्ह ऑर मोलर बिहेव्हियरिझम) असे नाव दिले. आपल्या ह्या हेतुगर्भ वर्तनवादावर सी. डी. ब्रॉड आणि राल्फ बार्टन पेरी यांच्या तात्त्विक विचारसरणींचा, विल्यम मॅक्डूगलच्या प्रेरणावादाचा, व्होल्फगांग कलरच्या समष्टिवादाचा व कुर्ट ल्यूइन आणि एगोन ब्रन्झविक यांच्या मानसशास्त्रीय प्रणालींचा प्रभाव असल्याचे स्वतः टोलमननेच नमूद करून ठेवले आहे. कलरच्या समष्टिवादी मानसशास्त्राकडून त्याने आकृतिबंधाची (पॅटर्न) कल्पना उचलली आणि वॉटसनप्रणीत वर्तनवादातील वस्तुनिष्ठ कसोटीचा पुरस्कार केला. साहजिकच त्याच्या विचारसरणीत वर्तनवाद, हेतुवाद व समष्टिवाद यांचा समन्वय झालेला दिसतो.
टोलमनने रेणवीय (मॉल्यूक्यूलर) वर्तन आणि सांघातिक (मोलर) वर्तन यांत भेद केला. प्राण्यांच्या वर्तनात भिन्न भिन्न यंत्रणा (अवयव) आपापली विविध कार्ये करीत असतात त्यास त्याने रेणवीय वर्तन म्हटले. उलट सांघातिक वर्तन म्हणजे काही एका हेतू किंवा उद्दिष्टाप्रीत्यर्थ सुरू होणारी आणि हेतुपूर्तीनंतर समाप्त होणारी वर्तनक्रिया. सांघातिक वर्तन हे हेतुगर्भ, उद्दिष्टान्वेषी असते. रेणवीय वर्तनाचा अभ्यास शरीरविज्ञान करते, तर मानसशास्त्रात सांघातिक वर्तनाचा अभ्यास केला जातो.
‘सांघातिक वर्तन’ह्यासंकल्पनेप्रमाणेच टोलमनची मध्यस्थ चल वा परिवर्ती (इंटरव्हेनिंगव्हेरिएबल) ही संकल्पनाही प्रख्यात आहे. उद्दीपक व त्याला घडून येणाराप्रतिसाद या दोहोंच्या दरम्यान प्राण्याच्या ठिकाणी बोधन व प्रेरण याआंतरिक घटना घडतात आणि त्यांवरही त्या प्राण्याच्या प्रतिसादांचे स्वरूप अवलंबून असते, असे टोलमनचे प्रतिपादन आहे. उदा., ‘अन्न’ ह्या उद्दीपकाने प्राण्याची वेदक इंद्रिये उद्दीपित झाली असता, अन्न भक्षण करण्याबाबतचा त्या प्राण्याचा प्रतिसाद कसा राहील, हे ‘भूक’ ह्या मध्यस्थ चलावर अवलंबून राहील. भुकेच्या तीव्रतेच्या प्रमाणातच तो प्राणी त्या अन्नावर तुटून पडेल. या मध्यस्थ चलाचा एकीकडे उद्दीपकाशी व दुसरीकडे प्रतिसादाशी मापनीय संबंध जोडता येतो. टोलमनच्या मते, वर्तनाच्या स्पष्टीकरणासाठी दोन प्रकारचे मध्यस्थ चल उपयोगी ठरतात : (१) प्राण्यास होणारे बोधन आणि (२) त्याच्या प्रेरणा वा गरजा.
मध्यस्थ चल ही संकल्पना टोलमनने आपल्या उपपत्तीच्या विवरणासाठी आवश्यक म्हणून निर्माण केली. व्यक्तीस होणारे बोधन व तिच्या गरजा वा प्रेरणा ह्या इंद्रियगोचर घटना नसल्या, तरी अणू, रेणू, गुरुत्वाकर्षण यांसारख्या विज्ञानमान्य संकल्पनांप्रमाणेच त्यांची सत्यता दृश्य परिणामांद्वारे प्रतीत होते, असे त्याने म्हटले आहे. इतर वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या दरम्यान प्राण्यांमध्ये ज्या सूक्ष्म शारीरिक स्वरूपाच्या घडामोडी होतात त्यांकडेच लक्ष पुरवीत परंतु टोलमनने ह्या शरीरव्यापारांकडे कमी लक्ष दिले आणि बोधन (कॉग्निशन), प्रेरण (मोटिव्हेशन) यांसारख्या अगोचर मनोव्यापारांना आपल्या प्रणालीत मान्यता दिली. त्यामुळे त्याच्या वर्तनवादास (हेतुगर्भ–वर्तनवादास) व्यापक स्वरूप प्राप्त होऊन वर्तनवादी नसलेल्या कित्येक मानसशास्त्रज्ञांशीही टोलमनला सहमत होता आले.
टोलमनचे उल्लेखनीय ग्रंथ पर्पजिव्ह बिहेव्हियर इन अँनिमल्स अँड मेन (१९३२), ड्राइव्ह्ज टोवर्ड वॉर (१९४२), कलेक्टेड पेपर्स इन सायकॉलॉजी (१९५१), अ हिस्टरी ऑफ सायकॉलॉजी इन ऑटोबायग्राफी (१९५२) हे होत.
केळशीकर, शं. हि.