टोकिओ विद्यापीठ : जपानमधील पहिले राष्ट्रीय विद्यापीठ. त्याची स्थापना १८७७ मध्ये टोकिओ येथे झाली. त्यात काही जुन्या व काही नव्या शैक्षणिक संस्थांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्याचा परिसर सु. ६० हे. आहे. १८७७ मध्ये या विद्यापीठात  दोन महाविद्यालये व विधी, भौतिकविज्ञाने आणि वैद्यक यांच्या विद्याशाखा उघडण्यात आल्या. त्यांत पुढे अभियांत्रिकी (१८८६), कृषी (१८९०), अर्थशास्त्र (१९१९), शिक्षणशास्त्र (१९४९) आणि औषधविज्ञान (१९५८) या विद्याशाखांची वाढ करण्यात आली. विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी असून विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता इंग्रजी वा कोणतीही एक परकीय भाषा अवगत असावी, अशी अट आहे. प्रत्येक महाविद्यालयाचा चालक व एक प्राध्यापक असे मिळून विद्यापीठाचे संचालक मंडळ बनते. विद्यापीठाशी विश्वकिरण, भूकंप, इतिहासलेखनपद्धती, अणुकेंद्रीय अभ्यास, घनावस्था भौतिकी, अनुप्रयुक्त जीवशास्त्र, औद्योगिक विज्ञान, वृत्तपत्र व्यवसाय, वैद्यक, प्राच्यविद्या, समाजशास्त्र, अवकाश व वैमानिकी विज्ञान आणि महासागरीय संशोधन या विषयांवर लेखन व संशोधन करणाऱ्या संस्था संलग्न आहेत. १८८७ साली विद्यापीठाच्या प्रमुख ग्रंथालयाची स्थापना झाली. ग्रंथालयात ३३,००,२४६ ग्रंथ (१९७३) व विद्यापीठात ३,५५८ प्राध्यापक आणि १५,८०८ विद्यार्थी होते (१९७३).

संकपाळ, ज. बा.